Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार?

By स्वदेश घाणेकर | Published: May 28, 2023 04:03 PM2023-05-28T16:03:16+5:302023-05-28T16:03:51+5:30

महेंद्रसिंग धोनी हे समीकरणच वेगळं आहे... ९० दशकात जन्मलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी सचिन तेंडुलकरच सर्व काही होता... आहे... पण, याच चाहत्यांच्या मनात धोनीनेही घर केलंय, हेही खरंय...

IPL 2023 Blog :Will Mahendra Singh Dhoni retire after winning the fifth IPL title today or will he play IPL 2024? | Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार?

Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार?

googlenewsNext

लांबलचक वाढलेले केस असलेला माही जेव्हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरला, तेव्हा त्याच्याकडून फार कुणी अपेक्षाही केली नसावी... अशी हेअरस्टाईल म्हणजे छपरी... असा विचार कदाचित अनेकांनी तेव्हा केला असावा अन् धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवातही फार चांगली न झाल्याने, हा भाई काय फार काळ टिकत नाही, असे अनेकांनी जाहीरही करून टाकले होते. पण, आज २०२३ मध्येही महेंद्रसिंग धोनीच्या नावाची चर्चा सुरूय... भारतीय क्रिकेट जेव्हा स्थित्यंतराच्या काळात होता, तेव्हा धोनीने आपल्या कल्पक नेतृत्वाने जगावर मोहीनी घातली... २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपने तर धोनीला सुपर डुपर स्टार बनवले... भारताच्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ धोनीच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आला अन् त्यानंतर २०१३ मध्ये आपण चॅम्पियन्स ट्रॉफीही उंचावली... आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे... पण, हा आंतरराष्ट्रीय प्रवास २०१९च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये संपला अन् कॅप्टन कूलने २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केली...


हे सर्व आठवण करून देण्याचं कारण म्हणजे, आज धोनी कदाचित इंडियन प्रीमिअर लीगमधूनही निवृत्ती जाहीर करू शकतो... २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल ही चर्चा सुरू झाली. पण, मागील २ वर्षांत त्याने निवृत्तीचा हा चेंडू सीमापार उडवून लावला, अगदी तसाच जसा तो चेंडू आपल्या मनगटाच्या जोरावर स्टेडियमबाहेर तटवतो... पण, आता त्याचं वय झालंय... ४१ वर्षाचा धोनी गुडघ्याला दुखापत असूनही आयपीएल २०२३ खेळला... दोन चेंडू खेळण्यासाठी का होईना तो मैदानावर फलंदाजीला आल्यावर TRPचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले... आयपीएल २०२३ मध्ये महेंद्रसिंग धोनी हेच समीकरण दिसले....

चेन्नई सुपर किंग्साच सामना चेपॉकसोडून कुठेही झाला, तरी स्टेडियमवर CSKच्या जर्सीची पिवळी लाट दिसली... मुंबई, बंगळुरू, राजस्थान, अहमदाबाद, लखनौ, पंजाब जिथे जाऊ तिथे धोनीचे चाहते मोठ्या संख्येने त्याला शेवटची आयपीएल खेळताना पाहण्यासाठी जमले होते.. आजही तेच होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर धोनीचेच चाहते दिसतील, यात शंकाच नाही...


आज महेंद्रसिंग धोनी २५० वा आयपीएल सामना खेळण्यासाठी जेव्हा मैदानावर उतरेल... तेव्हा धोनी... धोनी... धोनी नावाचा गजर दुमदुमलेला जाणवेल... धोनीने आणखी एक वर्ष आयपीएल खेळावं अशा आशयाचे फलक घेऊन चाहते मैदानावर दिसले... धोनीने खेळतच रहावं ही त्यांची इच्छा प्रेमापोटी असली तरी धोनी हाही एक माणूस आहे, हे विसरता कामा नये... ४१ वय हे क्रिकेटसाठी फार जास्त नाही, परंतु इतकी वर्ष सातत्याने क्रिकेट खेळल्यानंतर आता थांबायला हवं, हे त्याचे शरीरही त्याला सांगतंय... चेपॉकवरील एका सामन्यात माही लंगडत लंगडत पॅव्हेलियनमध्ये जाताना पाहून मनाला खूप वेदना झाल्या. असा धोनी कधीच कुणी पाहिला नव्हता.

चेपॉकवरील शेवटच्या सामन्यात निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून ८-९ महिने शिल्लक आहेत, मग आताच कशाला टेंशन घेऊ, असे धोनी म्हणालेला... त्यामुळे आजच्या सामन्यात तो कदाचित निवृत्ती जाहीर करणार नाही. पण, आज चेन्नई सुपर किंग्सने पाचवे जेतेपद जिंकले, तर निवृत्तीसाठी हिच योग्य वेळ असेल, हे धोनीलाही माहित्येय... त्यामुळे परफेक्ट टायमिंगसाठी ओळखला जाणारा धोनी आज निवृत्ती घेतो की लोकाग्रहास्तव आणखी एक आयपीएल खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल... 


२०१०, २०११, २०१८ आणि २०२१ अशी चार जेतेपदं धोनीच्या नावावर आहेत... स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घातली गेली अन् त्यानंतर कमबॅक करताना CSK ने जेतेपद उंचावले... ही धोनीची जादू आहे... २०२०मध्ये गुणतालिकेत तळाला राहिलेला CSKचा संघ संपला असे अनेकांना वाटले, पण we come back stronger असे धोनीने सांगितले अन् खरे करून दाखवले... पुढच्या वर्षी धोनी खेळला अन् तो निवृत्ती घेणार असेल, तरी चाहत्यांचं मन नक्की नाही भरणार... त्यामुळे ये दिल मांगे मोर कायम असेल... शेवटी तो माही आहे, त्याचा अंदाज बांधणे अवघडच आहे. 

Web Title: IPL 2023 Blog :Will Mahendra Singh Dhoni retire after winning the fifth IPL title today or will he play IPL 2024?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.