कुछ तो लोग कहेंगे... धोनी, तू खेळत राहा!
By namdeo kumbhar | Published: July 19, 2018 06:07 PM2018-07-19T18:07:28+5:302018-07-19T18:08:32+5:30
धोनी आपल्या नेहमीच्या थाटात निश्चिंत असतो. अशाच थंड डोक्याने तो टीकाकारांना अप्रत्यक्षपणे आपल्या खेळीतून सुनावतो देखील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात 'कॅप्टन कूल' हे बिरूद अभिमानानं मिरवणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गेल्या काही दिवसांमध्ये टीकेचा धनी ठरतोय. भारतीय क्रिकटेला नवी दिशा आणि नव्या उंचीवर पोहोचवणाऱ्या या हिऱ्याला आजच्या घडीला चारही बाजूंनी टीकेचा धनी व्हावे लागतेय. पण धोनीचा आतापर्यंतचा प्रवास आणि कामगिरी आपण विसरता कामा नये. एखाद्या मालिकेत धावा काढण्यात अपयशी ठरला म्हणजे त्या खेळाडूची कारकीर्द संपली असे होत नाही. कठीण अशा यो-यो टेस्टमध्ये धोनी तरुणांना लाजवेल असे गुण मिळवून संघात स्थान मिळवतोय. धोनीने आपल्या फलंदाजीमध्ये बदल करावा हे मला मान्य आहे. त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी. जम बसल्यानंतर फटकेबाजी करावी. दुसऱ्या सामन्यात अखेरच्या षटकात धोनीची फलंदाजी पाहिली. कर्णधार विराट कोहलीने धोनीला फलंदाजीत बढती द्यायला हवी. धोनीच्या अनुभवाचा विराट कोहली आणि संघाला किती फायदा होतो हे आपण अनेकवेळा पाहिले आहे.
महाभारतात कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने युद्ध जिंकले होते. तसेच धोनीच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहली 2019 मध्ये होणारा विश्वचषक घेऊन येऊ शकतो. धोनी आपल्या नेहमीच्या थाटात निश्चिंत असतो. अशाच थंड डोक्याने तो टीकाकारांना अप्रत्यक्षपणे आपल्या खेळीतून सुनावतो देखील. त्यामुळे पुढच्या वन-डे मालिकेत धोनी आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंडे बंद करू शकतो.
फक्त माजी कसोटीपटूच नव्हे, तर जाणकारांनीही धोनीच्या टी-20 आणि वन-डेमधील कामगिरीबाबत, खास करून फलंदाजीत होत असलेल्या उघड बोलायला सुरुवात केली आहे. पण कोणत्याही खेळात विजय किंवा पराजय कोणा एका खेळाडूमुळे होत नसतो हे टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे. धोनी भारतासाठी 500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. धोनीने आतापर्यंत घेतलेले सर्वच निर्णय संघाच्या हितासाठी होते. धोनीला जेव्हा जाणवले की आपण कसोटी खेळात फिट बसत नाही, त्याचवेळी त्याने राजीनामा दिला. त्याचप्रमाणे विश्वचषकाचा विचार करून टी-20 आणि वन-डेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. माझ्या मते येणाऱ्या विश्वचषकात धोनीला संधी द्यायला हवी.
धोनीने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. पण वय आणि खेळाचा संबंध आहे असे मला वाटत नाही. काही अपयशी खेळींनंतर काही लोक धोनीच्या मागे हात धुवून लागले आहेत. फार दूर कशाला जायचे 2011 मध्ये आपण वनडे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सचिन तेंडुलकर 38 वर्षांचा होता. तेव्हा कुणीच काही बोलले नाही. मग धोनीच्या वेळी अशी ओरड का? विश्वचषक आठ-दहा महिन्यांवर येऊन ठेपला आहे अन् धोनीला वगळून कुणाला घेणार आहोत? ह्याचा विचार पण करायला हवा. फक्त टीका करून उपयोग नाही. धोनीचे भारतीय क्रिकटेमधील योगदान अनन्यसाधारण आहे. आयसीसीच्या तिन्ही मानांकित स्पर्धांचे जेतेपद धोनीने भारताला मिळवून दिले आहे. यामध्ये ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धांच्या जेतेपदाचा समावेश आहे, त्याचबरोबर चॅम्पियन्स करंडकही धोनीने पटकावला होता. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल.
धोनीला पर्याय शोधू नये, असं माझं म्हणणं नाही. कितीही मोठा खेळाडू असला तरी त्याला रिप्लेस केले जाते हा खेळाचा नियमच आहे. पण माझ्या मते धोनीला पर्याय शोधण्याची ही योग्य वेळ नाही. आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे आपल्याकडे पंत, संजू सॅमसन आणि इशान किशनसारखे तरुण तडफदार खेळाडू तयार झाले आहेत. पण विश्वचषकाला खूप कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे हे युवा शिलेदार विश्वचषकाचा भार पेलू शकतील का? आणि कार्तिक, साहा आणि पार्थिव धोनीचा पर्याय असू शकतात का? हेही तपासून पाहावे. शेवटी एकच सांगेन, धोनीने आताच निवृत्त होऊ नये. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना... हे ओळखून त्यांने संयम बाळगायला हवा