सचिन तेंडुलकर... कसं जगायचं, कसं वागायचं हे शिकवणारा BFF!
By कुणाल गवाणकर | Published: April 24, 2018 12:54 PM2018-04-24T12:54:57+5:302018-04-24T12:54:57+5:30
विक्रमवीर, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव यापेक्षा सचिन खूप काही होता, आहे आणि राहील... खेळाडू म्हणून सचिन जितका ग्रेट आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही ग्रेट आहे...
45 वर्षांपूर्वी याच दिवशी एक मूल जन्माला आलं.. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात.. पण हे मूल मोठं झाल्यावर कोट्यवधी लोकांसाठी देव झालं.. कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं या मुलानं त्याच्या खांद्यावर अगदी यशस्वीपणे वाहिलं.. इतकं यशस्वीपणे की त्याला या जगात पाठवणाऱ्या देवालादेखील त्याचा हेवा वाटावा.. भारतीयांच्या आशा, अपेक्षांचं ओझं समर्थपणे पेलणाऱ्या त्या मुलाचं नाव सचिन तेंडुलकर.. आपण अनेकदा संकटात देवावर भरवसा ठेवतो, त्याच्यावर अवलंबून राहतो.. सचिनच्या बाबतीत तरी वेगळं काय व्हायचं? एका बाजूनं फलंदाज माघारी परतत असायचे तरीही टीव्ही सुरू असायचा, कारण मैदानावर सचिन असायचा... सचिन संघाची नैय्या पार करेल, हा विश्वास असायचा...
विक्रमवीर, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव यापेक्षा सचिन खूप काही होता, आहे आणि राहील... खेळाडू म्हणून सचिन जितका ग्रेट आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही ग्रेट आहे... त्यातून तो मराठी असल्यानं आपल्याला त्याचा प्रचंड अभिमान... सचिनची हीच माणूस म्हणून असलेली बाजू लहानपणापासून ऐकत आलोय... सचिनच्या नम्रपणाचे, त्याच्या वागण्या-बोलण्याचे दाखले घरचे द्यायचे, तेव्हा राग यायचा... पण, त्या रागाची जागा आदरानं कधी घेतली आणि सचिन गळ्यातला ताईत कधी झाला, हे कळलंच नाही...
सर्वात आधी समोर आलं ते सचिनचं कुटुंबवत्सल असणं.. सचिनसारखा माणूस इतका बिझी असूनही त्याच्या कुटुंबाला वेळ देतो.. आईसोबत, भावासोबत इतका कनेक्टेड राहतो, मित्रांच्या कायम संपर्कात राहतो, याचं माझ्या घरच्यांना कोण कौतुक! आभाळाला हात लागले तरी पाय कायम जमिनीवर राहायला हवेत, ही शिकवण सचिननं दिली आणि तीही त्याच्या कृतीतून..
ज्यांनी घडवलं त्यांना सचिन कधीही विसरला नाही.. त्याचं वानखेडेवरचं भाषण तेच तर सांगून गेलं.. एका सचिनला घडवण्यात, त्याच्या खेळाला आकार देण्यात किती असंख्य हात आहेत.. सचिननं त्या सर्वांची आठवण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यानंतर आवर्जून काढली.. त्यांचे आभार मानले.. आजच्या मी-मी च्या जगात हेच तर महत्त्वाचं.. तुमच्या चांगल्या काळात कायम इतरांची आठवण ठेवा.. मग तुमच्या वाईट काळात तुम्ही एकटे नसता.. त्यांची साथ तुम्हाला हमखास मिळते, हेच सचिनची कारकीर्द आपल्या सगळ्यांना शिकवते..
ज्यावेळी डोनाल्डसारखे गोलंदाज फक्त एक चौकार मारला म्हणून अपशब्द काढायचे... तिथे सचिन चुकीच्या पद्धतीने बाद दिलं तरी शांत राहायचा.. त्यानं कधी बॅट आदळली नाही की चीडचीड केली नाही. मॅच जिंकण्यासाठी काहीही केलं जात असताना, सचिन कायम प्रामाणिकपणे खेळला.. त्यामुळे काहीही करणारे विस्मरणात गेले तरी सचिनचं कोट्यवधी लोकांच्या मनातलं स्थान अढळ आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा असल्यावर काय होऊ शकतं, हे सचिननं दाखवून दिलंय..
आपल्या गरजा भागल्या, खरंतर त्या कधीच भागत नाहीत.. मात्र तरीही तुमचं व्यवस्थित सुरू असेल तर कायम इतरांच्या मदतीला धावून जा, हे सचिनमधल्या माणसामधून शिकण्यासारखं आहे.. विशेष म्हणजे याचा सचिननं कधीही बडेजाव केला नाही.. एका हातानं दान द्यावं आणि ते दुसऱ्या हातालाही समजू नये, हे सचिन कित्येक वर्षांपासून करतोय.. तुमच्याकडे फार पैसा नाही, हरकत नाही.. तुमचा वेळ गरजूंना द्या.. सचिननं सांगून नव्हे, तर प्रत्यक्ष जगून हे सगळं अप्रत्यक्षपणे आपल्याला शिकवलंय.. यातल्या निम्म्या गोष्टी जरी आपण आचरणात आणल्या, तरी माणूस म्हणून आपण समृद्ध होऊ..
क्रिकेटच्या विश्वात भारताची पताका डौलाने फडकवणाऱ्या, कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं यशस्वीपणे पेलणाऱ्या आणि लोकांनी देवत्व बहाल करूनही स्वतःमधल्या माणसाला कसोशीने जपणाऱ्या सचिनला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!