औरंगाबादमध्ये जिवंत बॉम्ब सापडण्यामागील गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 07:20 PM2018-07-30T19:20:44+5:302018-07-30T19:22:16+5:30
विशेल्षण : असे म्हणतात की, पोलिसांच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. मात्र, या शहरात काही गोष्टी पोलिसांच्या नजरेतून सुटत असल्याचे चित्र आहे. बारुदगर नाला येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर हे भरवस्तीमध्ये आहे. ते कोणत्याही शेतात किंवा आडोशाच्या ठिकाणी नाही. त्यामुळे ते पोलिसांना माहीत नाही, अशातला प्रकार नसावा.
- बापू सोळुंके
बारुदगर नाला येथे अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर धाड मारून गुन्हे शाखेने गुरुवारी तब्बल ८८ गॅस सिलिंडर जप्त केले. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून (किंवा वर्षांपासून) या सेंटरवर हे बेकायदेशीर काम चालू होते आणि ते पोलिसांना कळलेलेच नव्हते. काही दिवसांपूर्वी विजयनगर आणि हर्सूल येथेही अनधिकृत गॅस रिफिलिंग करताना काहींना पोलिसांनी पकडले. आता आणखी काही दिवसांंनी, आणखी कुठेतरी असे सेंटर सापडेल. शहरात राजरोसपणे अनेक ठिकाणी असे जिवंत बॉम्ब तयार करण्याचे काम होत असताना पोलिसांना त्याची उशिरा खबर लागते, हे आश्चर्यच आहे.
असे म्हणतात की, पोलिसांच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. मात्र, या शहरात काही गोष्टी पोलिसांच्या नजरेतून सुटत असल्याचे चित्र आहे. बारुदगर नाला येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर हे भरवस्तीमध्ये आहे. ते कोणत्याही शेतात किंवा आडोशाच्या ठिकाणी नाही. त्यामुळे ते पोलिसांना माहीत नाही, अशातला प्रकार नसावा. पोलीस ‘नजरअंदाज’ करीत असावेत, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. सामान्य कष्टकरी किंवा मजूर असेल, तर त्याला एखादे सिलिंडवर आणण्यासाठी दोन-चार खेटा माराव्या लागतात. आठ ते दहा दिवस आधी गॅस एजन्सीकडे बुकिंग करावी लागते. अर्जंट सिलिंडर हवे असेल, तर एजन्सीच्या गोडाऊनवरून स्वत:च दुचाकीवरून ओढाताण करीत घरापर्यंत आणावे लागते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना एका अनधिकृत सेंटरवर तब्बल ८८ सिलिंडर आले कुठून, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढायचा आणि तो वाहनांमध्ये भरायचा अथवा व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरण्याचे काम अशा सेंटरवर चालते. शहरातील वेगवेगळ्या भागांत असे अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याचे निवेदन पंधरा दिवसांपूर्वी एका संघटनेने पोलीस आयुक्तांना दिले होते. त्या निवेदनावर त्यांनी त्या सेंटरचे पत्तेही दिले होते. एखाद्या सिलिंडरमधील गॅस काढून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये अथवा वाहनांच्या गॅस टाकीत टाकण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. हे काम इलेक्ट्रिकल मोटार पंपाच्या साहाय्याने ही मंडळी बिनधास्तपणे करीत असतात. कोणत्याही प्रकारचा गॅस अत्यंत स्फोटक पदार्थ म्हणून ओळखला जातो. असे असताना अशा अड्ड्यावर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस भरून देण्याचे काम केले जाते.
अनधिकृतपणे सिलिंडर रिफिलिंगचे चाललेले हे काम म्हणजे जिवंत बॉम्ब तयार करण्यासारखेच आहे. हे जिवंत बॉम्ब तयार होत असताना त्याची खबर पोलिसांना दिलेली असताना केवळ एका सेंटरवरच पोलीस धाड टाकतात, हे त्याहून अधिक आश्चर्य आहे. दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडली, तर अशा सेंटरच्या परिसरातील नागरिकांच्या जिवालाही धोका होऊ शकतो, याचे भान पोलिसांना नसल्याचे दिसते. ठराविक दिवसांनंतर अशा अनधिकृतपणे सिलिंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई होताना दिसत असल्याने त्याचा नक्कीच वेगळा ‘अर्थ’ जनता घेऊ शकते. बारुदगरनाल्यावरील कारवाईही अर्थपूर्ण वाटाघाटी फिसकटल्यानेच झाली, अशी आता चर्चा आहे.
पुरवठा विभागही झोपेतच
गॅसचा काळाबाजार होत असेल, तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा पुरवठा विभागाला आहे. त्याबाबतचा स्वतंत्र कायदाच अस्तित्वात आहे. असे असताना पुरवठा विभागाकडून मात्र अशा गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर स्वत:हून कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांना कारवाई करायची असेल, तर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घ्यावे लागते, तरच ती कारवाई कायदेशीर ठरते. असे असले तरी गुन्हे शाखेने महिनाभरात हर्सूल परिसर, विजयनगर आणि बारुदगरनाला येथे अनधिकृत गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड मारून कारवाई केली.
हजारो रुपयांची कमाई
अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरचालक पोलीस कारवाईला न जुमानता आणि जीव धोक्यात घालून असे अड्डे चालवितात. आता एलपीजी रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एलपीजी पंपांची संख्या केवळ दोनच आहे. तेथे गॅस भरण्यासाठी गेल्यानंतर रिक्षाचालकासह चारचाकी वाहनचालकांना तासभर रांगेत उभे राहावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी वाहनचालक अशा सेंटरवर स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर नेतात आणि सिलिंडरमधील गॅस वाहनात भरून घेतात. त्याचा मोबदला म्हणून अड्डाचालकास रोख रक्कम देतात. यातून रोज हजारो रुपयांची कमाई ही मंडळी करीत असतात.