‘इंटेलिजन्स’ हरवलेली पोलीस यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:19 PM2018-08-22T17:19:01+5:302018-08-22T17:20:18+5:30

विश्लेषण : विवेकशील समाजाच्या निर्मितीसाठी काम करणारे डॉ. दाभोलकर यांचे संशयीत मारेकरी या शहरात मागील पाच वर्षांपासून सुखनैव राहत आहेत. समाजात उजळमाथ्याने उघड वावरत होते व स्थानिक पोलिसांना त्याची काहीही गंधवार्ता लागत नाही, हे मुर्दाड यंत्रणेचेच लक्षण म्हणावे लागेल. 

Police force lost 'intelligence' | ‘इंटेलिजन्स’ हरवलेली पोलीस यंत्रणा

‘इंटेलिजन्स’ हरवलेली पोलीस यंत्रणा

googlenewsNext

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयात म्हणजे चक्क कार्यालयातच ६ डिसेंबर १९९८ रोजी दंगल उसळली व पोलीस हादरले. तेव्हा पोलिसांचे इंटेलिजन्स डिपार्टमेंट सुस्तावलेले होते. त्यातून पुढे सिमी या दहशतवादी संघटनेचा चेहरा समोर आला. बरोबर २० वर्षांनंतर पुन्हा शहर व ग्रामीण पोलिसांचे इंटेलिजन्स हरवल्याचे दिसत आहे. खदखदत्या सामाजिक जाणिवेची स्पंदणे जोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून सनातनी भस्मासुरांच्या दहशतवादी मेंदूने या शहरात हातपाय पसरल्याचे समोर येते आहे. 

४०० वर्षांचा इतिहास मिरवणाऱ्या औरंगाबाद शहराने अलीकडच्या काळात अगदी वेगाने आपली गुण वैशिष्ट्ये बदलणे सुरू केले आहे. नव्वदीच्या दशकात आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून जगभरात नावलौकिक कमवणारे हे शहर पुढच्याच दशकात दहशतवादी कारवायांचे माहेरघर ठरू लागले. सिमीच्या कारवाया या शहरात वाढल्या. आझम घौरीसारख्या खतरनाक दहशतवाद्यांचा मुक्काम या शहरात झाला; परंतु पोलीस आयुक्तालयात दंगल होईपर्यंत पोलिसांना याचा सुगावा लागला नाही. पुन्हा तीच अवस्था या शहरावर आली असून निद्रिस्त पोलीस यंत्रणेमुळे सामान्य नागरिकांच्या जीविताची चिंताच प्रशासन विसरले आहे. 

एकविसाव्या शतकात पाऊल टाकताना पहिले दशक या शहराने विकासाचे व शांततेचे अनुभवले; परंतु आता शहराची ही शांती एखाद्या लहान सहान घटनेनेही भंगते असल्याचे दिसते. सन २०१७ मध्ये राज्यात पहिला निघालेला मराठा मूक मोर्चा व त्याला प्रत्युत्तर म्हणून निघालेल्या बहुजन मोर्चाने जातीय चिरफळ्या उडाल्या. विशेषत: १९९८ च्या धर्तीवरच सन २०१८ उगवल्याचे भासते आहे. हे वर्ष उगवले ते भीमा-कोरेगावच्या घटनेचे हिंसक पडसाद घेऊनच. नव्या वर्षाचे सुरुवातीचे दोन-तीन दिवस  दगडफेकीच्या घटना व त्यानंतर पोलिसांचे जबरदस्त कोम्बिंग आॅपरेशन शहराने अनुभवले. आतापर्यंत असहिष्णुतेचे कवच धारण केलेल्या शहराने  फेब्रुवारी महिन्यात कचराकोंडीच्या रूपाने सुविधांसह गैरव्यवस्थापनाची मोठी घसरण पाहिली. त्यात पोलीस नापासच ठरले. कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या मिटमिटा येथील नागरिकांवर लाठीहल्ला चढवत पोलिसांनी मर्दुमकी गाजविली. त्यात पोलीस आयुक्तांची गच्छंती शहराला पाहावी लागली. 

सामाजिक, राजकीय व साधनसुविधांअभावी शहर धुमसत असतानाही आपला इंटेलिजन्स सुधारावा असे पोलिसांना वाटले नाही. शहागंजात आंबे देण्याघेण्याचा क्षुल्लक वाद चिघळून ११ मे रोजी रात्री शहराला मोठ्या दंगलीस सामोरे जावे लागले. ही दंगलही पूर्वनियोजित होती. यादंगलीत शहरातील मुख्य बाजारपेठ बेचिराख झाली. तब्बल चार तास सैनिकांनी युद्ध लढावे तशा रचनेने ही दंगल सूत्रबद्ध झालेली दिसली. जातीय दंगलीत दोघांचे प्राण गेले; पोलिसांना हस्तक्षेप सोडाच पण दंगल प्रवण क्षेत्रात चार तासांहून अधिक वेळ प्रवेशसुद्धा मिळवता आला नाही, एवढी असाहाय्य पोलीस यंत्रणा याआधी शहराने कधीही पाहिली नव्हती.  

यासर्व घटनांवर कडी झाली ती सकळ मराठा समाजाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या बंदच्या दिवशी. त्या दिवशी तब्बल आठ तास शहरात पोलिसांचे अस्तित्वच पुसले गेले. वाळूज औद्योगिक परिसरातील ७० हून अधिक कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी धुडगुस घालीत तोडफोड केली. त्यामुळे या औद्योगिक नगरीतील उद्योजकही घाबरले, ही अपकिर्ती देशविदेशात पोहचली. सतत ढासळती कायदा सुव्यवस्था, चोरी, घरफोड्यांचे वाढलेले प्रकार व आपसी कारणातून झालेल्या अनेक खुनाचे प्रकार पोलिसांना अद्यापही उघडकीस आणता आलेले नाहीत. तपास तरबेज पोलीस अधिकारी नेमके गेलेत तरी कुठे, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांत सीबीआय व एटीएसने शहरात सनातनी दहशतीचे जाळे हुडकून काढण्यासाठी केलेल्या झंझावाती कारवाईने सुजाण नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. औरंगाबादेतील ही शांतता केवळ अभासीच आहे, त्यावर पोलीस यंत्रणेचे काहीही नियंत्रण नाही, हे देखील सखेद नमुद करावेच लागते. विवेकशील समाजाच्या निर्मितीसाठी काम करणारे डॉ. दाभोलकर यांचे संशयीत मारेकरी या शहरात मागील पाच वर्षांपासून सुखनैव राहत आहेत. समाजात उजळमाथ्याने उघड वावरत होते व स्थानिक पोलिसांना त्याची काहीही गंधवार्ता लागत नाही, हे मुर्दाड यंत्रणेचेच लक्षण म्हणावे लागेल. 

Web Title: Police force lost 'intelligence'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.