सर्वच मुद्दे ठरले फोल, भाजपचा ‘क्लिन स्वीप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 08:20 PM2018-12-10T20:20:51+5:302018-12-10T20:21:31+5:30
धुळे महानगर पालिका निवडणूक
राजेंद्र शर्मा
धुळे : महापालिका निवडणुकीत भाजपने क्लिन स्वीप मिळविला आहे. शहरातील गुंडगिरी, निष्ठा या मुद्यांकडे दुर्लक्ष करीत धुळेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले. धुळे महापालिकेच्या स्थापनेनंतर दुसºयांदा भाजपचा महापौर बसणार आहे. याआधी २०११ मध्ये निवडून आलेल्या भाजपच्या महापौर मंजुळा गावीत या तीन नगरसेवकांच्या बळावर केवळ आरक्षणामुळे बिनविरोध निवडून आल्या होत्या. परंतु यंदा पहिल्यांदाच भाजपचा स्वबळावर महापौर बसणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी, पक्ष निष्ठा हे मुद्दे गाजले. आमदार अनिल गोटे यांनी तर या मुद्यावर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. शेवटी - शेवटी तर या मुद्यावर भाजपविरुद्ध सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र होते. परंतु धुळेकरांनी हे सर्वच मुद्दे फोल ठरवित भाजपला महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता दिली आहे. आमदार अनिल गोटे हे निकालाचे खापर पैसे वाटप आणि ईव्हीएम मशिनवर फोडत असले तरी भाजपच्या या विजयाचे खरे शिल्पकार हे भाजपचे प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो मंत्री जयकुमार रावल अणि धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल हेच आहे. त्यांनीच राष्टÑवादीचे विजयी उमेदवार आपल्या पक्षात आणून विजयाचे हे गणित जुळवून आणले. त्यामुळे तीन वरुन भाजप ५० च्या जादुई आकडयापर्यंत पोहचला.
लोकसंग्राम- आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांचा विजय सोडला तर आमदारांचे चिरंजीव तेजस गोटे यांच्यासह सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. धुळेकरांनी आमदारांच्या सभेला गर्दी केली असलीतरी मतदान विरोधात करुन आमदारांचे मुद्दे त्यांना पटले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्टÑवादी - काँग्रेस आघाडी - निवडणुकीत राष्टÑवादी - काँग्रेस यांचा एक वॉर्ड एक चिन्ह हा फॉम्युला देखील फेल गेला. प्रथमच दोन्ही पक्षाचे नेते हे एकदिलाने प्रचार करीत असल्याचे दिसले. परंतु निकालानंतर दोन्ही पक्षांच्या या नेत्यांना सपशेल पराभव पत्कारावा लागला. काँग्रेसला तर गेल्यावेळेपेक्षाही एक जागा कमी मिळाली तर सत्ताधारी राष्टÑवादीला यंदा दोन आकडी संख्याही पार करता आली नाही. केवळ ८ जागा मिळाल्या आहे.
शिवसेनेला जबर हादरा - शिवसेनेला निवडणुकीत जबर हादरा बसला आहे. सेनेच्या विद्यमान दोन महानगरप्रमुखांसह आजी- माजी पदाधिकारी पराभूत झाले आहेत. पक्षातून ज्योस्रा पाटील याच केवळ त्यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांच्या बळावर निवडून आल्या आहेत. या पराभवाला सेनेचे स्थानिक नेतेमंडळीतील मतभेद कारणीभूत ठरले आहेत.
एमआयएमचा प्रवेश - महापालिकेत प्रथमच एमआयएमचे चार उमेदवार निवडून आले आहे. त्यापैकी तीन उमेदवार देवपुरातील एकाच प्रभागातून निवडून आले. याठिकाणी काँग्रेस - राष्टÑवादीच्या मुस्लिम पदाधिकाºयांमधील मतभेदाचा फायदा त्यांना मिळाला. एकूणच निकालानंतर विरोधी पक्षातर्फे पराभवाची विविध कारणे सांगितली जात असली तरी शेवटी विजय हा महत्वाचा असतो. तो कोणत्या पद्धतीने मिळविला हा भाग नंतर गौण ठरतो.