सीईओंनी उगारला कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:36 AM2019-03-19T11:36:48+5:302019-03-19T11:37:34+5:30
जलयुक्त शिवारची कामे न करताच काढली बिले
अतुल जोशी
धुळे- जलयुक्त शिवारचे काम न करताच बिले लाटणाऱ्या लघुसिंचन विभागातील दोन अधिकाऱ्यांनी परस्पर बिले लाटल्याचे समोर आले. त्याचबरोबर धुळे व पंचायत समितीतील दोन कर्मचाऱ्यांनी कामात कुचराई केल्याचे निदर्शनास आले. या चौघांविरूद्ध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र केवळ एवढ्यावरच न थांबता ‘जलयुक्त’च्या कामाचा मलिदा लाटणाºया मोठ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही योजना विविध विभागातर्फे राबविण्यात येते. त्यात लघुसिंचन विभागाचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फेही जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली. मात्र या कामाचे ई-टेंडरिंग करतांना या विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एल.एम.शिंंदे व उपअभियंता एन.पी.निकुंभ या दोन अधिकाºयांनी ठेकेदारासाठीच लॉबिंग केल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. तसेच कामाच्या टेंडरमध्ये परस्पर बदल केल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले.एवढ्यावरच हे अधिकारी थांबले नाही, तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर असलेली कामे न करतांच त्या कामाची बिले काढल्याचा आरोप आहे. दोन्ही अधिकाºयांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. दोघ अधिकाºयांना नोटीसा बजावून त्यांच्यावर वसुलीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली असली तर सीईओंनी केलेल्या कारवाईचे काहींनी स्वागतच केले आहे.
गेल्या तीन वर्षात लघुसिंचन विभागातर्फे जलयुक्त शिवाराची अनेक कामे झाली असून, त्या सर्व कामांची आॅडीट झाले पाहिजे. टेंडरमध्ये ज्या प्रमाणे कामे नमूद होती, तशीच झाली की त्यातही फेरफार झाला आहे, हे तपासून कामात अजुन कुठे-कुठे पाणी मुरले आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. यात केवळ हे दोनच अधिकारी सहभागी असतील असे नाही, या प्रकरणात अजून काही जणांचा समावेश असतो. त्यामुळे खोलवर पाळेमुळे खोदून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लघुसिंचन विभागानंतर सीईओंनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला. धुळे पंचायत समितीतील कनिष्ठ सहायक तुषार बोरसे याच्यावर पंचायत समितीत बसून ग्रामपंचायतीच्या निविदा प्रकाशित करणे, ठेकेदारांच्या फायद्यासाठी निविदा ब्लॉक करणे, असा ठपका ठेवण्यात आला. तर शिरपूर पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक भारत माळी यांच्यावर विविध कामांचे धनादेश दडवून ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले.