प्रभारी आरोग्य अधिका-यांसमोर आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:09 PM2018-06-27T17:09:35+5:302018-06-27T17:10:27+5:30
- मनीष चंद्रात्रे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रभारी आरोग्य अधिकारी पदाची धूरा जि.प. सीईओ गंगाथरन देवराजन यांनी नुकतीच जि.प. च्या कुष्ठरोग विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. शैलेश पालवेंकडे सोपविली आहे. या विभागाचा गाडा पुढे रेटण्यात डॉ.पालवे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगरच राहणार आहे. ते कशापद्धतीने हे आव्हान पेलतात. ते येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचेच ‘आरोग्य’ बिघडलेले आहे. या विभागाचा इलाज प्रशासकीय स्तरावरून होत नसल्याने या विभागाची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत आहे. त्यात या विभागात कार्यरत कर्मचारी व अधिकारी एकमेकांविषयी रचत असलेली कटकारस्थाने, एकमेकांवर निनावी पत्राद्वारे आरोपांची चिखलफेक, प्राप्त तक्रारींवरून या विभागाच्या सुरू असलेल्या चौकशा. या सर्व प्रकारामुळे या विभागात प्रामाणिकपणे काम करणाºयांना नाहक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या विभागाला लागलेला हा ‘रोग’ सर्वश्रुत झाल्यामुळे येथे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी म्हणून येण्यास कोणी राजी नाही. डॉ. शैलेश पालवे यांच्याकडे प्रभारी आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यापूर्वी या पदावर डॉ. बाळासाहेब चव्हाण काम पाहत होते. मात्र, त्यांनीही हे पद सांभाळण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ गंगाथरन देवराजन यांनी या विभागाची जबाबदारी डॉ. पालवे यांच्याकडे सोपविली. त्यांनीही नुकताच पदभार स्वीकारला. यापूर्वी दोन वर्षापासून जिल्हा परिषदेत पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नाही. ‘प्रभारी’वरच सर्व सुरू आहे. गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषदेत ुआरोग्य अधिकारी म्हणून तीन अधिकाºयांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाºयांनी त्यांची बदली रद्द करून घेतली. सुरुवातीला सांगली येथून डॉ. राम हंकारे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले होते. मात्र हंकारे यांनी त्यांची धुळ्यात झालेली बदली नाकारली. गेल्यावर्षी नाशिकचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. विशेष बाब म्हणजे डॉ. वाघचौरे यांनी धुळे जिल्हा परिषदेत अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून कामाचा अनुभव असताना त्यांनी बदली नाकारण्यासाठी थेट मॅटमध्ये धाव घेतली. या नंतर पुणे येथील डॉ. सुधाकर मोरे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. मात्र, डॉ. सुधाकर मोरे यांनीदेखील बदली रद्दसाठी मॅटमध्ये धाव घेतली. परिणामी, गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य अधिकारी पदाचा प्रभारी पदभार हा चव्हाण यांच्याकडेच होता. मात्र, त्यांनीही आता हे पद सांभाळण्यास असमर्थता दर्शविली. आरोग्य विभागाच्या या सर्वंकष परिस्थितीचा विचार करता नव्याने प्रभारी आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारणारे डॉ.पालवेंना आरोग्य विभागात सुसूत्रता आणून आरोग्य विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या विभागाच्या बिघडलेल्या आरोग्यातून ते कशाप्रकारे मार्ग काढतात; हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.