तारांकित मानांकनासाठी तरी शहर कचरामुक्तीचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:33 AM2018-06-19T11:33:16+5:302018-06-19T11:33:16+5:30
शासनाने आता कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शहराने स्वयंघोषणा करून तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावयाचा असून त्रयस्थ समितीच्या अहवालानुसार राज्य शासन तारांकित मानांकने जाहीर करेल. धुळे महापालिका देखील स्वयंघोषणा करून प्रस्ताव सादर करेल पण शहर प्रत्यक्षात कचरामुक्त होणार कधी? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. मात्र शासनाच्या तारांकित मानांकनासाठी तरी शहर कचरामुक्त करण्याचे आव्हान मनपाला पेलावे लागणार आहे़
गेल्या वर्षभरात धुळे महापालिकेत कचरा संकलनाचा विषय वादासह चर्चेत राहिला आहे. कचरा संकलनाच्या ठेक्यात नगरसेवक पार्टनर असल्याची पोलखोल करून आयुक्तांनी एकच खळबळ उडवून दिली होती, त्याबाबत बरीच चर्चाही झाली. कचरा संकलनाचा ठेका रद्द करण्यात आल्यानंतर चर्चा कमी झाली असली तरी कचºयाचा विषय अजूनही अंतर्गत चर्चिला जात असतोच. महापालिकेत कचरा संकलन हा पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरलेला विषय आहे. पूर्वी कचरा संकलन टनावर केले जात असतांना तो ओला करून वजन वाढविण्याचे प्रकार झाले. त्यानंतर कचरा संकलनासाठी मनुष्यबळ वाढविणे, भाडे तत्वावर वाहने लावण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकणे असे अनेकविध प्रकार महापालिकेत घडत आले आहेत. त्यामुळे एकूणच अत्यंत वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या या विषयावर आता आयुक्तांना मार्ग काढावा लागणार आहे. कचरा संकलन व प्रक्रियेसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मंजूर झालेल्या २५ कोटी रूपयांच्या निधीतून आयुक्तांनी ७९ घंटागाड्या विकत घेण्याचा निर्णय घेत पहिले पाऊल टाकले आहे. त्याचप्रमाणे कचरा प्रक्रियेसाठी यापूर्वी काढलेली निविदा रद्द करून आता कचरा प्रक्रियेवर नियंत्रण राखण्यासाठी सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. एकिकडे कचरा संकलन व प्रक्रिया व दुसरीकडे त्यावर काटेकोर नियंत्रण ठेवल्यास शहर कचरामुक्त होऊ शकते, असा आयुक्तांचा कयास आहे. कचरा संकलन व प्रक्रियेचा ठेका देण्यापूर्वी कचरा डेपो व गांडूळ खत प्रकल्पात वषार्नुवर्षे साचलेल्या कचºयावरही प्रक्रिया होणे आवश्यक आहे. कारण वषार्नुवर्षे साचलेल्या या कचºयाला आग लागल्यामुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कचºयाची विल्हेवाट लावल्यानंतरच नवीन प्रकल्प उभारणे संयुक्तिक ठरेल. शहर कचरामुक्त करण्यासाठी देखील वषार्नुवर्षे साचलेल्या कचºयावर प्रक्रिया करावीच लागणार आहे. शहरातील सर्व कचºयाचे संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाईल, त्याच दिवशी शहर खºया अर्थाने कचरामुक्त होईल. अर्थात त्यासाठी मनपा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी तूर्तास तरी धुळे महापालिका शासनाच्या कचरामुक्त तारांकित मानांकनापासून चार हात लांबच आहे, ही वस्तुस्थिती असली तरी येत्या काळात धुळे शहरही या मानांकनापासून अधिक दूर राहणार नाही़ केवळ धुळयातच नव्हे तर राज्यभरात कचरा संकलनाची अवस्था सारखीच असल्याने हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शासनाचा देखील प्रयत्न आहे़ त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचरा संकलन असो, नवीन वाहनांची खरेदी असो, कचºयावरील प्रक्रिया, निरीक्षण व नियंत्रणासाठी शासनाने प्रत्येक शहराचे सविस्तर ‘डीपीआर’ मागवून घेत त्यानुसार पुरेसा निधीही वितरीत केला आहे़ शिवाय वारंवार त्याबाबत विचारणा करून चालना देण्याचाही प्रयत्न सुरू आहे़ त्यामुळे येत्या काळात धुळे शहरही कचरामुक्त होईल, यात शंका नाही़
- निखिल कुलकर्णी, धुळे