बेमोसमी पावसामुळे शेतक-यांपुढे विवंचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:16 PM2018-11-10T15:16:49+5:302018-11-10T15:17:49+5:30
- सुरेश विसपुते जिल्ह्यात यंदा पुरेसा व जोरदार पाऊस न झाल्याने शेतकºयांवर दुष्काळाचे अरिष्ट कोसळले आहे. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती, ...
- सुरेश विसपुते
जिल्ह्यात यंदा पुरेसा व जोरदार पाऊस न झाल्याने शेतकºयांवर दुष्काळाचे अरिष्ट कोसळले आहे. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती, गंभीर दुष्काळ, मध्यम दुष्काळ अशी विगतवारी करून राज्य सरकारकडून अन्याय होत असल्याची भावना जिल्ह्यात तीव्र आहे. तो अन्याय दूर करण्याची मागणीही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शेतक-यांनी जेमतेम जगविलेली, वाढविलेली, काढणी केलेली व काढणीवर आलेली पिके रविवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर हाती आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी निराश झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे साक्री तालुक्यातील कासारे, मालपूर, धुळे तालुक्यातील संपूर्ण नेर परिसरासह शिरूड, विंचूर परिसरात पिकांची मोठी हानी झाली. विशेषत: कांद्याचे बी टाकून जीवापाड वाढविलेली रोपे भुईसपाट झाली. त्यामुळे आता कांद्याची लागवड कशी करावी, असा यश प्रश्न शेतक-यांपुढे उभा राहिला आहे. काही शेतकºयांनी कांद्याची लागवड पूर्ण केली आहे. परंतु ज्या शेतक-यांची राहिली आहे ते आता कांदा लागवड करणार तोच बेमोसमी पावसाने या रोपांवर नांगर फिरविला आहे. वादळी पावसासोबत बारीक गाराही पडल्याने नेर परिसरात यामुळे सर्वाधिक हानी झाली. यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना दुहेरी भूर्दंड सोसावा लागणार आहे. कांद्याची लागवड करायची तर दुसरीकडून तयार रोपे मागवावी लागणार असून त्यासाठी त्यांना पैशांची तरतूद करावी लागणार आहे. काढणीवर आलेला कांदा, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतांमध्ये काढणीसाठी उपटलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला आहे. त्यामुळे तो सडण्याच्या मार्गावर आहे. कित्येक दिवसांनंतर चांगल्या दराच्या रूपाने कांद्याला चांगले दिवस आले असताना कांद्याचे झालेले नुकसान शेतकºयांच्या जिव्हारी लागले आहे. या वादळी पावसामुळे केवळ कांद्याचेच नव्हे तर फुटलेल्या कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस वेचायचा कसा, अशा संकटात असलेल्या शेतक-यांच्या विवंचना आणखी वाढल्या आहेत. बोंडातून उमललेला कापूस भिजल्याने कडक झाला आहे. भिजल्याने कपाशीचा दर्जा घसरला असून तो विक्रीलायक राहिलेला नाही. मका, ज्वारी, बाजरी या पिकांचीही तीच गत झाली आहे. ऐन काढणीवर आलेली ही पिके वादळ, गारा व पावसामुळे जमीनदोस्त झाली. त्यामुळे हे धान्य काळे पडण्याचा (डिस्को होण्याचा) धोका आहे. त्यामुळे त्याला अपेक्षित दर मिळू शकणार नाही. गुरेही असे धान्य खात नाही. त्यामुळे शेतक-यांची मेहनत पाण्यात गेली आहे. सरकार असे धान्य खरेदी करते, परंतु तेही पडेल भावात. त्यामुळे दिवाळी आनंदात साजरी करण्याचे स्वप्न पाहणारे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे नागवले गेले आहेत. नेर परिसरात तर वादळी पावसाचा जोर जास्त होता. त्या मुळे घरे, दुकानांवरील पत्रे उडाल्याने ऐन दिवाळीत काही कुटुंबांचा संसार उघड्यावर आला. पपई उत्पादकांनाही या वादळी पावसामुळे फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडल्याने किंवा वाकून मोडल्याने पपईच्या बागा उदध्वस्त झाल्या आहेत. या पावसाने चाºयाचीही वाताहत केली. शेतक-यांना तो चारा आता शेतातच जाळून टाकावा लागणार आहे. कारण गुरे अशा चाºयाला तोंडही लावत नाही. या पावसाने कांदा उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काढणीवर आलेला कांदाही या पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे या कांद्याला चांगला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त ठरणार आहे. एकूणच या बेमोसमी पावसामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच शेतक-यांची गत झाली आहे. सरकारने अशा परिस्थितीत मदतीचा हात द्यावा, अशी या अपेक्षा नुकसानग्रस्त शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे.