धुळे लोकसभा निवडणूक इच्छुकांमध्ये चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:36 PM2019-01-14T22:36:25+5:302019-01-14T22:36:25+5:30
राजकीय हालचालींना वेग : पक्षांच्या बैठकीत चर्चा
- राजेंद्र शर्मा
धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतू दोन पंचवार्षिकपासून धुळे लोकसभेवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसला हा मतदारसंघ परत आपल्या ताब्यात घेण्याची संधी या निवडणुकीत आली आहे. काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांची नावे चर्चेत आघाडीवर आहे. मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण पट्टाही जोडला असल्याने तेथील डॉ.तुषार शेवाळे यांचे नावसुद्धा चर्चेत आहे. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी वामसी चांदरेड्डी यांच्या बागलाण पट्टयातील पक्षाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकाºयांनी डॉ.तुषार शेवाळे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. दुसरीकडे धुळे तालुक्यातील मेळाव्यात पदाधिकाºयांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. या तीन नावांशिवाय पक्षातील एक गट आजसुद्धा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नावाची मागणी करीत असल्याचे समजते. पण आमदार अमरिशभाई पटेल हे लोकसभेसाठी इच्छूक नसून ते आजतरी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत दिसत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळाल्याने शिवाजीराव दहिते अध्यक्षपदी कायम आहेत. त्यामुळे ते तिकिटासाठी फारसे आग्रही भूमिका घेतील, असे वाटत नाही. त्यामुळे ते सुद्धा सध्या माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत दिसतात. एकूणच उमेदवारीसाठी पाटील आणि शेवाळे यांची नावे चर्चेत आहे. तसेच पक्षाने जर तरुण चेहºयाचा विचार केला तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर आणि हर्षवर्धन दहिते यांचीही नावे ‘रेस’मध्ये आहेत. आतापर्यंत तरी काँग्रेसचे अँकर व जवाहर गट एकत्र दिसत आहेत, ही पक्षाची जमेची बाजू समजावी. याशिवाय भाजपचे धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी ते पक्षाचे विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. गोटेंनी जरी काँग्रेसला पाठिंबा दिला नाहीतरी भाजप विरोधी प्रचाराचा फायदा काँग्रेस उमेदवाराच्या पथ्थ्यावरच पडणार आहे. या सर्व काँग्रेसच्या जमेच्या बाजू आहे. मात्र दुसरीकडे पक्षातील छुपी गटबाजी मारक ठरणारी आहे.
भाजपातर्फे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येते. परंतु पक्षाच्या सर्व्हेत डॉ.भामरे हे ‘डेंझर झोन’ मध्ये असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर आल्या, पण त्याचे खंडन स्वत: डॉ. भामरे यांनीच केले आहे. याशिवाय डॉ. भामरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी मंत्री पदावर असतांना मतदारसंघात केलेली विकास कामे या सर्व त्यांच्या जमेच्या बाजु आहे. मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमीपूजन हे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच होईल, असे सांगितले जात आहे. तसे झाले तर त्याचाही फायदा निश्चित त्यांनाच मिळेल. पण गेल्यावेळेस प्रचारात त्यांच्यासोबत असलेले पक्षाचे आमदार अनिल गोटे हे आता उघडपणे त्यांच्या विरोधात गेले आहे. तसेच गेल्या आठवडयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत धुळ्यात झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यास मालेगाव परिसरातील पदाधिकाºयांची अनुपस्थिती या गोष्टी विचार करण्यास लावणाºया आहेत. याशिवाय यंदा शिवसेनेशी युती होण्याची शक्यता दिसत नाही. जर शिवसेनेने उमेदवार दिला तर मते विभाजनाचा फटका बसणार, ही गणिते लक्षात घेऊन डॉ.भामरे यांना निवडणुकीतील राजकीय गणिते आखावी लागणार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आव्हान केले. त्यामुळे जर युती झाली नाही तर शिवसेनेतर्फे लोकसभेसाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मालेगावचे दादा भुसे यांचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील पक्षाचे कार्यक्रम, शासकीय बैठका आणि शासकीय ध्वजारोहण समारंभपुरताच संपर्क राहिला आहे. त्यामुळे लोकसभेत त्यांना धुळे शहर व ग्रामीण आणि शिंदखेडा मतदारसंघातून किती पाठिंबा मिळतो, हे सांगणे आजतरी कठीण आहे. परंतु महापालिका निवडणुकीत जसा आमदार अनिल गोटे यांनी सेनेला पाठिंबा दिला तसा लोकसभा निवडणुकीतही दिला तर त्याचा फायदा सेनेला मिळू शकतो. सेनेकडे दादा भुसे यांच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय माजी आमदार प्रा.शरद पाटील असू शकतात. पण ते धुळे शहर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. या सर्व युती नाही झाली तरच्या गोष्टी आहे. त्यामुळे युतीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
या तीन प्रमुख पक्षांना सोडले तर अन्य पक्षसुद्धा निवडणुकीत उमेदवार देणार का, हे सर्व लोकसभा निवडणुकीआधी स्थापन होणाºया आघाडया आणि युतीच्या निर्णयावरच ठरेल. कारण निवडणुक जाहीर होईपर्यंत नवीन राजकीय समीकरणे तयार होतील किंवा बिघडतील, त्यावरच लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित होतील, हे मात्र तेवढेच खरे.