गुगल मॅप, ड्रोन कॅमेराचा आधार घेत शोधून काढली गांजाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 01:09 PM2020-06-28T13:09:01+5:302020-06-28T13:09:33+5:30
लाकड्याहनुमान येथील कारवाई। रात्रीच्या अंधारामुळे दगडफेकीची होती भीती
देवेंद्र पाठक
धुळे : गुगल मॅप आणि ड्रोन कॅमेराचा आधार घेऊन गांजाची शेती स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त केली़ यात २ कोटी १५ लाखांचा गांजाही मोठ्या शिताफिने हस्तगत करण्यात आला़
लाकड्या हनुमान हे गाव शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी दुर्गम भागामध्ये वसलेले आणि संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव आहे़ गावाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूस लहान मोठ्या स्वरुपातील टेकड्या, जंगल भागाचे अस्तित्व आहे़ २००५ मध्ये शासनाने आणलेल्या वनजमिनीसंबंधी कायद्यानुसार गावातील ग्रामस्थांनी आपल्या सोयीनुसार दुर्गम जंगलामधील जमिनीवर ताबा मिळून शेती करण्यास सुरुवात केली आहे़ सदर गावाच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत काही आदिवासी शेतकऱ्यांनी गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड सुरु केली होती़ हे ठिकाण दुर्गम असल्याने संबंधित शेतकºयाव्यतिरिक्त कोणीही पोहचत नसल्याने अशा प्रकारे अंमली वनस्पतींची लागवडीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर येत नव्हती़ तसेच गावानजिक मध्यप्रदेश गावाची सीमा असल्याने तस्करीच्या मार्गाने सदर मालाची विल्हेवाट लावणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होते़ अशा अंमली वनस्पतीची लागवड ही बेकायदेशीर असल्याबाबत अनेक शेतकºयांना माहित नव्हते़ कालांतराने सदर ही बाब गैर कायदेशीर असल्याचे समजून देखील काही शेतकºयांनी स्वत:च्या फायद्यासाठी अशी लागवड करणे चालूच ठेवले़ पोलीस अथवा वन कर्मचारी कारवाईसाठी गेल्यास गोफण व तिरकामट्याच्या सहाय्याने लपूनछपून हल्ला करीत होते़ दुखापतीच्या भीतीेने परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता़ त्यामुळे हा परिसर प्रशासनाकरीता कुख्यात ठरला होता़ पण बातमीदाराने दिलेली बातमी आणि ठोस कारवाईचे नियोजन केल्यामुळे इतकी मोठी गांजाची कारवाई करणे शक्य झाले़
चिखल अन नाल्यामुळे ट्रॅक्टरचा घेतला आधार
आदिवासीच्या भागात जावून कारवाई करणे इतके सोपे नव्हते़ हा भाग इतका दुर्गम आणि जंगलात आहे की तेथे ठिकठिकाणी नाले आहेत़ रस्ताच नाही़ आहे ती केवळ पाऊलवाट़ पावसामुळे चिखल झालेला़ अशावेळी कोणतेही वाहन जाणे शक्य नसल्यामुळे ट्रॅक्टरचा आधार घेण्यात आला़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नियोजनानुसार मोहीम राबविण्यात आली़ त्यात एका पथकाने आतमध्ये शिरायचे आणि दुसºया पथकाने त्यांना संरक्षण द्यायचे़ अशा रितीने ही मोहीम यशस्वी करुन जिल्ह्यात पहिल्यांदाच २ कोटी १५ लाखांचा गांजा शोधून काढला़