आरटीई नोंदणीसाठी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:52 AM2019-03-26T11:52:18+5:302019-03-26T11:52:45+5:30
अतुल जोशी धुळे - शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज नोंदणी सुरू असून, ...
अतुल जोशी
धुळे- शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज नोंदणी सुरू असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेवढ्या जागा आहे, त्यापेक्षा अर्जांची संख्या जास्त आहे. मात्र अर्ज जास्त येवूनही प्रवेश पूर्ण का होत नाहीत हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
शिक्षण हक्क कायदा अंतर्गत १४ वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण देण्याचा कायदा आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांत मोडणाऱ्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एकूण प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागा या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून भरण्यात येतात. जिल्ह्यात २०१३-१४ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वंचीत घटकातील बालकांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी शाळांची त्याचबरोबर विद्यार्थी संख्याही वाढत आहेत. मात्र सात वर्षात एकाही वर्षी २५ टक्के अंतर्गत प्रवेश पूर्ण झालेले नाहीत.
यावर्षीही २५ टक्के प्रवेशासाठी ५ मार्चपासून आॅनलाइन अर्ज नोंदणी सुरूवात झालेली आहे. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात सर्वत्र ५ मार्चपासून सुरू झालेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन आहे. जिल्ह्यातील ९७ इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये १ हजार २३७ विद्यार्थ्यांना आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र सुरवातीला संबंधित वेबसाइटवर धुळ्याचे नावच दिसत नसल्याने, अनेक पालकांना आपले अर्ज दाखल करता आले नाहीत. दरम्यान सुरवातीला आॅनलाइन अर्ज नोंदणीसाठी २२ मार्चपर्यंत मुदत होती. या कालावधीत आॅनलाइन अर्ज नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. २२ पर्यंत १ हजार २३७ जागांसाठी २ हजार ५६३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात सर्वाधिक ७७० अर्ज हे धुळे महानगरपालिका क्षेत्रातून नोंदविले गेले. त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यातून६३६, धुळे तालुक्यातून ५१२, साक्री तालुक्यातून ३९५ व शिरपूर तालुक्यातून २५० आॅनलाइन अर्ज दाखल झाले. यावर्षी अवघ्या १७ दिवसात अडीच हजार अर्जांची नोंदणी झाल्याने, आरटीई प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता आॅनलाइन अर्ज करण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे आॅनलाइन अर्ज नोंदणीचा आकडा तीन हजारचा आकडा पार करू शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रवेशासाठी अनेकांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा प्रवेश घेण्याची वेळ येते तेव्हा नामवंत इंग्रजी शाळेत प्रवेश मिळत नसल्यास अनेक पालक आपल्या पाल्याचा प्रवेश घेत नाही. त्यामुळे शंभरटक्के प्रवेश पूर्ण होऊ शकत नाही, ही गेल्या सात वर्षांची स्थिती आहे. यावर्षी ही परिस्थिती बदलायची असल्यास त्यासाठी शिक्षण विभागानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी पालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सर्वच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते हेपालकांना पटवून देणे गरजेचे आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास यावर्षी निश्चितच आरटीईच्या जेवढ्या जागा आहे, त्याचे प्रवेश पूर्ण होऊ शकतील. अन्यथा नेहमीप्रमाणे जागा रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.