‘नो एंट्री’तील गोटेंची ‘एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:43 PM2018-11-11T18:43:42+5:302018-11-11T18:43:57+5:30
- राजेंद्र शर्मा
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे शहरातील जमनालाल बजाज रोडवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, धुळयाचे प्रभारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पहिली प्रचार सभा घेण्यात आली. या सभेत आमंत्रित नसतांना, ‘नो एंट्री’ असतांना पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी सभा स्थळी केलेली ‘एंट्री’ ही सर्वांनाच अंचबित करणारी होती. सभेत धुळ्याचे प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरु असतांना आमदार अनिल गोटे त्याठिकाणी आले. सरळ व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बाजुला जाऊन बसले. दानवे यांच्याशी काही वेळ चर्चाही केली. महाजन यांचे भाषण संपल्यावर कोणाच्या बोलण्याची प्रतिक्षा न पाहता माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना विरोध झाला. व्यासपीठावर दोन मंत्री, स्वत: प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अनिल गोटे यांच्यात चर्चा झाली. सभेतून गोटे आणि विरोधी समर्थकांमध्ये गोंधळ झाला. काहींनी खुर्च्याही फेकल्या. त्यानंतर काही न बोलता आमदार गोटे आपल्या समर्थकांसह तेथून निघून गेले. हा वाद काही मिनिटातच मिटला. परंतु त्यावेळी जो गोंधळ झाला, तो सर्व धुळेकरांनी आणि भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहिला. एका शिस्तप्रिय पक्षातील गटबाजी आणि नेत्यांमधील वाद एवढ्या शिगेला पोहचला आहे की, त्यातून पक्षातील शिस्त आणि निष्ठा यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतर पक्षाप्रमाणे सत्तेसाठी याठिकाणीही कुठलीही तडजोड होऊ शकते, असे आता सर्वांचे मत बनत चालले आहे.
पक्षातील या गटबाजीकडे वेळीच लक्ष देऊन पक्षश्रेष्ठींनी दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणणे गरजेचे होते. परंतु त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. धुळे भाजपत गेल्या चार वर्षापासून उघडपणे दोन गट कार्यरत आहे. त्यात एकीकडे शहराचे आमदार अनिल गोटे तर दुसरीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, राज्यातील पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि धुळे शहर महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांचा गट आहे. या दोन्ही गटातील गटबाजी पक्षाच्या अनेक कार्यक्रमात उघड झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी डॉ.भामरे यांच्या गटात निवडणुकीचे प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे नवीन नाव जुळले आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दोन्ही गटाकडून समांतरपणे सुरु होता. पक्षात अशा पद्धतीने दोन गटात उघडपणे गटबाजी सुरु असतांनाही याबाबत कोणीही काहीच बोलायला तयार नव्हते. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व नेतेमंडळींपुढे तर कोणासोबत जावे, असा यक्षप्रश्न उभा होता, नव्हे तर आजही उभा आहे. कारण अद्यापसुद्धा चित्र स्पष्ट झालेले नाही. कारण दोन्ही पक्ष आजही आपणच भाजपचे अधिकृत उमेदवार जाहीर करणार असे दावे करीत आहे. कोणीही नेता पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही, हे जर सत्य आहे. तर मग पक्षात अशापद्धतीने आरोप - प्रत्यारोप आणि गटबाजी पक्षश्रेष्ठींनी खपवून कशी घेतली. दोन्ही गटात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न का झाले नाही. तसेच पक्षशिस्त तोडणाºया लोकांविरुद्ध कारवाई का झाली नाही, असे अनेक प्रश्न पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात विचारले जात आहेत. त्याचे उत्तर आजतरी कोणाचकडे नाही, हे स्पष्ट आहे. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला तर त्याला जबाबदार कोणास धरणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
शिस्तप्रिय पक्ष आणि सत्तेसाठी पक्षाच्या तत्त्वांशी समजोता न करणारा पक्ष, अशी स्वच्छ प्रतिमा असणाºया पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच पक्षातील अंतर्गत गटबाजी व वाद जनतेसमोर जाहीर सभेत समोर आल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट आहे.