नियोजन केल्यास टंचाईवर मात शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:01 PM2019-01-28T23:01:02+5:302019-01-28T23:02:44+5:30
पुरेशा पावसाअभावी टँकरची संख्या वाढण्याची भीती
- सुरेश विसपुते
धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे त्याचे विपरित सर्वदूर झाल्याचे पहावयास मिळत आहेत. खरीपात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून साक्री तालुक्यातील आठ मंडळांमध्येही दुष्काळसदृश स्थिती जाहीर करून सवलती लागू करण्यात आल्या आहेत. पावसाअभावी रब्बी हंगामही जेमतेम येणार आहे. लागवडीत मोठी घट झाली. आता पिकांची बºयापैकी वाढ झाली असून सध्या संभाव्य अवकाळी पावसाचे वादळ घोंगावत आहे. जानेवारी महिना संपत असून फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ्यास सुरूवात होईल. मकर संक्रांतीपासूनच उन्हाची तीव्रता वाढायला सुरूवात होते. त्या सोबत यंदा टंचाई अधिक जाणवणार असल्याचे संकेत आताच मिळू लागले आहेत. हिवाळ्यातच बहुतांश गावांना टंचाई सोसावी लागत आहे. सध्या जिल्ह्यात ९ टॅँकर व ६० पेक्षा जास्त खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाईची झळ सर्वत्र जाणवत असली तरी धुळे व शिंदखेडा या तालुक्यांमध्ये प्रमाण जास्त आहे. जानेवारी महिना संपत नाही तोच अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्यासह पांझरा नदीकाठी असलेल्या गावांचे सरपंचही आग्रही आहेत. पिण्यासाठी अक्कलपाडा धरणात पाणी आरक्षित करण्यात आले असून त्यातून हे आवर्तन देण्याची मागणी होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनाही या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली. त्यांनी प्रशासनास आवर्तन सोडण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे आवर्तन कधी सोडले जाते याकडे लक्ष लागले आहे. आरक्षित जलसाठा जुलैपर्यंत वापरण्याचे नियोजन आहे. जून महिन्यात पाऊस होतोच असे नाही. त्यामुळे प्रशासनाला या उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तरच जुलैअखेरपर्यंत हे पाणी पुरू शकणार आहे. प्रशासनाच्या पातळीवर आवर्तन सोडण्याबाबत अद्याप काही हालचाल झालेली नाही. परंतु फेब्रुवारी महिन्यात आवर्तन सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे दीड-दोन महिने ग्रामस्थांची टंचाईतून मुक्तता होऊ शकते. त्यानंतर पुढील आवर्तन एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यात सोडले जाऊ शकते. त्यामुळे जूनअखेरपर्यंत पाण्याची टंचाई राहणार नाही, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे. जानेवारी संपताच टॅँकरच्या मागणीतही वाढ होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने नियोजन करणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. गेल्या वर्षी टॅँकरची संख्या १२ पर्यंत सीमित राहिली होती. परंतु यंदा पुरेसा पाऊसच झालेला नाही. त्यामुळे संख्या कदाचित वाढेल, असा कयास व्यक्त होतो. धुळे तालुक्यात फागणे गावाला सध्या टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. हे गाव लोकसंख्येने मोठे असल्याने उन्हाळ्यात गरज वाढणार असल्याने टॅँकरच्या फेºयांत वाढ किंवा दुसºया टॅँकरची सोय करावी लागेल. गेल्यावेळीच तशी मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्याप्रमाणे उपाययोजना झाल्यास पाणी टंचाईची झळ कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होते.