जळगाव पॅटर्न धुळ्यात शक्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 05:58 PM2018-10-28T17:58:14+5:302018-10-28T17:58:30+5:30
- राजेंद्र शर्मा धुळे महानगरपालिका निवडणुकीची धुरा भाजपाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यानंतर धुळ्यातही ‘जळगाव पॅटर्न’ राबविण्यात येईल, ...
- राजेंद्र शर्मा
धुळे महानगरपालिका निवडणुकीची धुरा भाजपाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यानंतर धुळ्यातही ‘जळगाव पॅटर्न’ राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून धुळ्यात ‘जळगाव पॅटर्न’ यशस्वी होईल का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. नियुक्तीनंतर अद्याप गिरीश महाजन यांनी धुळ्यात राजकीय बैठक अथवा सभा घेतलेली नाही. पण त्यांच्या उपस्थितीत जळगावप्रमाणे धुळ्यातही मोठ्या प्रमाणावर भाजपात महापालिकेतील सत्ताधारी राष्टÑवादी आणि अन्य पक्षातील विद्यमान नगरसेवक आणि आजी व माजी पदाधिकाºयांचे ‘इनकमिंग’ (पक्ष प्रवेश) सुरुच आहे.
आमदार अनिल गोटे यांच्या विरोधास न जुमानता शेवटी राष्टÑवादीतील त्यांचे कट्टर विरोधक मनोज मोरे यांना धुळ्याचे महानगरपालिका प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देण्यात आला. यावेळी मनोज मोरेेंसह माजी स्थायी समिती सभापती चंद्रकांत सोनार, शिवसेनेचे भगवान गवळी यांनाही भाजपात प्रवेश दिला. भाजपमधील या सर्व राजकीय घडामोडी धुळयात ‘जळगाव पॅटर्न’ धुळ्यात राबविण्याच्या दृष्टीने पडणारे एक - एक पाऊल आहे, असेच आजतरी म्हणावे लागेल.
महापालिका निवडणुकीसाठी सात निवडणूक निर्णय अधिकाºयांसह २८ अधिकाºयांच्या नियुक्तीचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढले़ नियुक्त केलेल्या २८ पैकी १२ अधिकारी जळगाव जिल्ह्यातील आहेत. या नियुक्तीला आमदार अनिल गोटे यांनी आव्हान दिले आहे. अधिकाºयांची नियुक्ती करतांना नंदुरबार, नाशिक, मालेगाव येथील अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून या सुनावणीत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे आमदारांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भाजपचे आमदार व भाजपचे प्रभारी व जलसंपदा मंत्री पुन्हा एकदा आमने - सामने आले आहेत. यावेळी आमदार गोटेंच्या आव्हानाला जलसंपदा मंत्री महाजन उत्तर देतील की नेहमीप्रमाणे मौन ठेवतील, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आमदारांच्या विरोधाला न जुमानता मनोज मोरे यांना अखेर भाजपमध्ये प्रवेश मिळालाच. या प्रवेशामुळे एकेकाळी एकमेकाला पत्रकातून आव्हान व प्रतिआव्हान देणारे दोन कट्टर राजकीय विरोधक मनोज मोरे आणि आमदार अनिल गोटे हे जेव्हा पुढे पक्षाच्या कार्यक्रमात अथवा सभेत एकाच व्यासपीठावर पाहण्याचा योग लाभू शकतो का, असा प्रश्न धुळेकरांच्या मनात आहे.
भाजपमध्ये आज आमदार अनिल गोटे हे महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार कार्यालय उघडून त्याठिकाणी पक्षातर्फे प्रभागनिहाय इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. दुसरीकडे पक्षाने नियुक्त केलेले प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे धुळ्यात न येता बाहेरुन पक्षाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्या मदतीने पक्षाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून असल्याचे पक्षात धडाक्यात सुरु असलेल्या ‘इनकमिंग’वरुन स्पष्ट दिसते. हा सुद्धा कदाचित जळगाव पॅटर्नचा एक भाग असू शकतो, असे सांगितले जात आहे. परंतु भाजपात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीमुळे अन्य पक्षांच्या राजकीय हालचालीसुद्धा खूपच हळूहळू सुरु आहेत. कारण भाजपातील चित्र स्पष्ट झाल्याशिवाय महापालिका निवडणुकीतील अन्य सर्वच पक्षांचे राजकीय गणित सुटू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या धुळ्यात ‘जळगाव पॅटर्न’ शक्य आहे का, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घोंघावतो आहे, एवढे मात्र निश्चित!