अल्पशा पावसामुळे शेतकºयांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:45 AM2018-06-22T11:45:29+5:302018-06-22T11:45:29+5:30
अतुल जोशी, धुळे
रोहिणी नक्षत्राच्या शेवटी शेवटी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने, शेतकºयांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मृग नक्षत्रातील प्रत्येक दिवस कोरडा जात असल्याने, शेतकºयांची चिंता वाढलेली आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात अद्याप खरिपाच्या पेरण्यांना सुरवातही झालेली नाही.
यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने, पाऊस दमदार होईल अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने, शेतकºयांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. जिल्ह्यात ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. त्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. मात्र यावर्षी कपाशीचे हे प्रमाण घटण्याचा अंदाज कृषी विभागानेच व्यक्त केलेला आहे. पावसाळी स्थिती बघून जिल्ह्यातील काही शेतकºयांनी कपाशीची पेरणी केली. त्याचे क्षेत्र ७ हजार ८०० हेक्टर एवढे आहे. रोहिणी नक्षत्राच्या शेवटी शेवटी दमदार पाऊस झाला. त्यामुळे मृग नक्षत्रातही असाच पाऊस होईल असा शेतकºयांचा अंदाज होता. मात्र मृग नक्षत्रातही अगदी रिमझिम पाऊस पडत आहे. जमीन पुरेशा प्रमाणात ओली देखील झालेली नाही. त्यामुळे पेरणीही करता येत नाही. २० जून अखेरपर्यंत जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना सुरवातही झालेली नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दरवर्षी जून अखेरपर्यंत सरासरी ११६.६ मी.मी. पाऊस पडत असतो. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकºयांनी शेत तयार करून ठेवली आहेत. बियाणे, खतांचा साठा करून ठेवलेला आहे. प्रतीक्षा फक्त पेरणीयोग्य पावसाची आहे. गेल्यावर्षी २१ जूनपर्यंत ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. यावर्षी मात्र ती स्थिती नाही. दुबार पेरणीचे संकट नको म्हणून शेतकरी अल्पशा पावसावर पेरणी करायला तयार नाही. किमान ७० ते ८० मी.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिल्याने, शेतकरी कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही.
पाऊस लांबल्याने, खरिपाच्या पेरण्याही लांबण्याची शक्यता आहे. आता अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठायला सुरवात केलेली आहे. त्यामुळे ज्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या केल्या होत्या, त्यांची पेरणी वाया जाण्याची धास्ती शेतकºयांना सतावू लागलेली आहे. पावसाअभावी गुरांच्या पाण्याचा, चाºयाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. खरिपाच्या पेरण्या लांबल्यास त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवरही होणे अपरिहार्य आहे.