पैठणीचा झटका.... भल्यांना लागला ठसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:11 PM2018-07-02T12:11:51+5:302018-07-02T12:12:02+5:30
जिल्हा वार्तापत्र : राजेंद्र शर्मा
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे यांनी विजय मिळवित अनेकांचे राजकीय गणित चुकविले. नाशिक शिक्षक मतदारसंघात टीडीएफचा बोलबाला राहिला आहे. पण आता या निवडणुकीचे महत्व दिवसागणिक वाढत चालले असून त्यात आता राजकीय पक्षांचा प्रभाव वाढला आहे. निवडणुक म्हटली तर पैशांचे वाटप, मतदारांना अमिष हे प्रकार होतातच. पैशाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, हे सुद्धा वास्तव आहे. पण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत हे होणार याची कल्पनाही शक्य नाही. पण यंदा ते झाले आणि ते सुद्धा खुलेआम झाले. ज्यांच्यावर देशाचे भवितव्य आणि सुज्ञ नागरिक घडविण्याची जबाबदारी आहे. जे स्वत:ही सुज्ञ आणि वैचारिकदृष्टया प्रगल्भ आहेत. ज्यांना मत विकणे हे पाप आहे हे समजते. त्यांच्या शिक्षक मतदारसंघात एका पैठणी व पाकिटावर मत विकले जावे, याच्यापेक्षा वाईट काय असू शकते.
शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात काय बदल व्हावे या गोष्टी शासन दरबारी पोहचविण्यासाठी शिक्षकांमधीलच सुज्ञ एक प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून यावा, या स्वच्छ हेतूने शासनाने शिक्षक मतदारसंघाची निर्मिती केली. या जागेसाठी शिक्षक संघटनेतील अभ्यासू व्यक्ती निवडून दिला जात होता. परंतु आता यात राजकीय हस्तक्षेप वाढला असून राजकीय प्रभाव असलेले व्यक्ती उमेदवार ठरवू लागले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आता अन्य निवडणुकीप्रमाणेच साम, दाम, दंड, भेद यांचा वापर होऊ लागला आहे. या निवडणुकीचे महत्व किती वाढले आहे, याचे उदाहरण द्यावयाचे म्हटले तर निवडणुकीतील काही उमेदवारांचे ८ ते १० प्रतिनिधी हे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्याच्या ठिकाणी तळ ठोकून बसले होते. त्यांना त्याठिकाणी एक घर भाडयाने घेऊन देण्यात आले होते. त्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांची यादी घराच्या पत्यासह तयार करुन त्यांच्या संपर्कात राहून पूर्ण नेटवर्क तयार केले. त्या नेटवर्कच्या मदतीने मग शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली. सोबतच काही उमेदवारांनी पाकिटेही वाटली. पैठणी वाटपाचा एवढा गवगवा झाला की काही शिक्षकांनी तर त्या पैठणी जाळून त्याचा निषेधही केला. मात्र त्यामुळे ही गोष्ट उघडकीस आली की मतदारांना पैठणी आणि पाकिट वाटप होत आहेत. हे सर्व खुलेआम सुरु होते. शिक्षक मतदारसंघातील सुज्ञ मतदार या प्रलोभन आणि गिफ्टला बळी पडले, असे निवडणुकीच्या निकालातून स्पष्टही झाले. पण अशापद्धतीने जर शिक्षक मतदारसंघातील उमेदवार निवडून येणार असेल तर मग समाजाने यांच्याकडून काय आदर्श घ्यावा, हा मोठा प्रश्न आहे.
शिक्षकांची टीडीएफ संघटनेची परिस्थितीही फारच वाईट झाली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण या संघटनेचे उमेदवारच एकमेकाविरुद्ध उभे होते. शिक्षकांच्या संघटनेत आमदाराच्या तिकिटावरुन फूट पडत असेल तर मग आपण राजकीय पक्षांना नाव ठेवण्याचे कारण काय, असाही प्रश्न आहे. निवडणुकीत टीडीएफचे संदीप बेडसे हे उमेदवार का पडले, याचे प्रमुख कारण म्हटले तर टीडीएफमधील फूट आणि जे त्यांच्यासोबत फिरत होते, त्यापैकीच काही नंतर दुसºया उमेदवारांसोबतही फिरताना दिसले, काहींनी प्रचार बेडसेंचा केला. पण पैठणी आणि पाकिटाचे गिफ्ट घेऊन मतदान दुसरीकडेच केल्याचेही आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. एकूणच बेडसे यांच्याबाबत म्हणता येईल की, त्यांना ‘घर के भेदी’ लोकांचाच त्रास भोगावा लागला. या सर्व प्रकारामुळे मात्र पुन्हा एकदा धुळे व नंदुरबार जिल्ह्याची मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची चालून आलेली संधी हूकली.