पोलिसांची अशीही जनजागृती़़़़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:49 PM2018-07-21T22:49:13+5:302018-07-21T22:50:45+5:30
- देवेंद्र पाठक
अफवा पसरल्याने किती मोठी किंमत मोजावी लागते, हे साक्री तालुक्यातील राईनपाड्याच्या सामुहिक हत्याकांडाच्या घटनेनंतर प्रकर्षाने समोर आले आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी जनजागृती होत असताना पोलीस प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण भागात अफवा विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे़ खरोखरच हा पोलीस प्रशासनाकडून टाकलेले एक विकासात्मक असे स्तुत्य उपक्रम आहे़ हे यापुर्वी कधीही झालेले नव्हते़ याशिवाय पोलीस स्टेशनबाहेर इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून स्ट्रीप लावण्यात आली असून अफवा कोणी पसरु नका, पोलिसांचे याकडे बारकाईने लक्ष आहे, अफवा पसरविल्याचे आणि त्यातून काही विपरीत प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, नागरीकांनी सहकार्य करावे अशा प्रकारचे स्लोगन सध्या पोलिसांकडून प्रसारीत करण्यात येत आहे़
मागील काही दिवसापासून काही समाजकंटक व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वत:हून कायदा हातात घेऊ नये. असे देखील वेळोवेळी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे़ नागरीकांनी पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्याची गरज आहे़
जिल्ह्यात सर्वात अगोदर धुळे तालुका पोलिसांनी पुढाकार घेत अफवा पसरू नये, येणाºया सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने ग्रामीण भागात शांतता ठेवावी़ अशा प्रकारची जनजागृती सुरु करण्याचे काम सुरु केले आहे़ त्यासाठी सुरुवातीला तालुक्यातील मोठ्या गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला जात आहे़ गावकरी देखील सायंकाळी उशिरा सुरु होणाºया या बैठकीला आर्वजून हजेरी लावत आहेत़ या पाठोपाठ आता सर्वच पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांकडून याबाबतीत लक्ष दिले जात आहे़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या माध्यमातून होणाºया या उपक्रमाला नागरीकांनीही देखील साथ देण्याची आवश्यकता आहे़