कृषी विद्यापीठाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:27 AM2019-03-05T11:27:20+5:302019-03-05T11:29:03+5:30
अतुल जोशी धुळे - राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून धुळ्यात कृषी विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी गेल्या ...
अतुल जोशी
धुळे- राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून धुळ्यात कृषी विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी गेल्या १० वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र त्याला प्रतिसाद न देता मुख्यमंत्र्यांनी भुसावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठ उभारण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी घोषणा करून धुळे जिल्ह्याच्या मागणीला हरताळ फासण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे. मात्र नियोजीत कृषी विद्यापीठासाठी आवश्यक असलेली जमीन, सुविधा धुळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने, कृषी विद्यापीठ धुळ्यातच होणे गरजेचे आहे. शासनानेही हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून धुळे जिल्हावासियांना दिलासा देणे गरजेचे आहे.
१९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन झाले. त्यावेळी संभाव्य कृषी विद्यापीठ धुळ्यात होणे अपेक्षित होते. १९६३-६४ मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतांना राहूरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करून, नवीन विद्यापीठ निर्माण करण्यााठी शासनाने डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. यात ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा समितीचा अहवाल आहे. त्यात धुळ्याचे नाव प्राधान्यक्रमावर आहे. धुळे जिल्हयात कृषी विद्यापीठ होण्यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे २००९ पासून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार वर्षात विविध आंदोलने करण्यात आली. आता विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे या बाबत न्याय मागण्यांसाठी विषय प्रलंबित आहे. धुळ्याच्या शासकीय कृषी शासकीय महाविद्यालयात विद्यापीठ स्थापन करण्यासाठी असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याठिंकाणी ७०० एकरपेक्षा जास्त जमिन उपलब्ध असल्याने, आजच विद्यापीठ स्थापन होऊ शकते. असे सर्व अनुकूल वातावरण असतांना मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणा करून धुळेकरांच्या अपेक्षांना हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर धुळ्यातील नियोजित कृषी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे यासाठी युवासेनेने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने केली, बंद पुकारला. बंदला धुळेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
कृषी विद्यापीठ शेजारच्या जिल्ह्यात गेले तर धुळे जिल्हा विकासापासून पुन्हा वंचीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कृषी विद्यापीठासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावण्याची आवश्यकता आहे. तरच कृषी विद्यापीठ धुळ्याच्या पदरात पडू शकेल. तसेच शासनानेही जिल्हावासियांची अनेक वर्षांची कृषी विद्यापीठाची असलेली मागणी पूर्ण करून या प्रश्नाला पूर्णविराम द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.