मनपा निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागणार पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:34 PM2018-12-08T15:34:17+5:302018-12-08T15:35:05+5:30
महापालिका स्थापन झाल्यापासून मनपाची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक
अतुल जोशी
धुळे- महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार थांबला असून, रविवारी मतदान होणार आहे. निवडणुकीत अनेक पक्षांचे उमेदवार असल्याने त्यातल्या त्यात भाजपाचे दोन गट एकमेकांसमोर उभे असल्योन धुळे महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. मात्र प्रथमच स्वबळावर निवडणुकीचे शिवधनुष्य उचलणाºया शिवसेनेची या निवडणुकीत चांगलीच कसोटी लागण्याची चिन्हे आहेत.
महानगरपालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वचजण सज्ज झालेले आहेत. महापालिका स्थापन झाल्यापासून मनपाची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे. गेल्या तीन निवडणुका भाजपाला सोबत घेऊन लढणाºया शिवसेनेने आगामी काळात लोकसभा, विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीतून शिवसेनेला शहरात आपली ताकद किती आहे, याचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळेच धुळ्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. स्वबळाचा नारा देणाºया शिवसेनेला १९ प्रभागांमध्ये पूर्ण ७४ जागांवर उमेदवार मिळू शकलेले नाही. त्यांचे केवळ ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुस्लिम बहूल भागात पक्षाला उमेदवारही मिळालेले नाही. अशा स्थितीत स्वबळाचे शिखर गाठणे म्हणजे कसरतच आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाचे दोन गट समोरासमोर आहेत. कॉँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झालेली आहे. या सर्वांमध्ये शिवसेनेचा किती टिकाव लागतो हा उत्सुकतेचा विषय आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी संपर्क प्रमुख के.पी.नाईक हे गेल्या आठ दिवसांपासून शहरातच थांबून होते. तर पालकमंत्री दादा भुसे यांनीही दोन दिवस प्रचारासाठी दिले. खासदार संजय राऊत, सहकार मंत्री गुलाबराव पाटील, यांनीही शहरात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. खासदार राऊत यांनी तर धुळे महानगरपालिकेचा महापौर हा शिवसेनेचाच असेल असे जाहीर करून टाकले आहे.
शहरातील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत आहे. मात्र गेल्या तीन निवडणुकांपासून शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख हा घसरता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत सुधारणा सुरू झाली तरच शिवसेनेचे आगामी काळातील निवडणुकांचे यश अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेला मिळणाºया यशाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.