कोणाचा पत्ता गुल्ल? कोण ‘पॉवरफुल्ल’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:42 PM2018-12-07T21:42:59+5:302018-12-07T21:44:26+5:30
निखील कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महापालिका निवडणूकीत यंदा एका मराठी चित्रपटातील गीताने चांगलाच रंग भरला़ ‘जो पत्ता ...
निखील कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीत यंदा एका मराठी चित्रपटातील गीताने चांगलाच रंग भरला़ ‘जो पत्ता करतो गुल्ल, पॉवरफुल्ल’ हे ते गाणे़ आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी प्रचारात आणलेले हे गीत कालांतराने प्रत्येक पक्षाच्या प्रचारात आले़ त्यामुळे प्रचाराची मुदत संपुष्टात आली असली तरी या गीताचे बोल अजूनही नागरिकांच्या स्मरणात आहेत़ धुळे महापालिका निवडणूकीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आधीच मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालेली असतांना दुसरीकडे प्रचारात आलेल्या या गीताने राजकीय परिस्थितीत आणखी रंग भरले़ परंतु या गीताच्या बोलांनुसार कोणाचा पत्ता गुल्ल होतो व कोण पॉवरफुल्ल ठरतो, हे मात्र सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे़ महापालिका निवडणूक यंदा रंगतदार ठरणार हे गेल्या काही महिन्यांपासूनच दिसू लागले होते़ त्यामुळे महापालिका निवडणूकीकडे केवळ स्थानिकांचेच नव्हे तर राज्यातील राजकीय नेते, नागरिकांचेही लक्ष असणार हे स्पष्टच होते़ त्यातच केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये निवडणूकीच्या तोंडावर उद्भवलेल्या अंतर्गत कलहामुळे ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरली व पर्यायाने राज्याचे लक्ष आज धुळे महापालिका निवडणूकीकडे लागले आहे़ परिणामी, मुख्यमंत्र्यांपासून अनेक पक्षांचे राज्य पातळीवरील नेत्यांना धुळयात प्रचारसभांसाठी यावे लागले़ गुंडगिरीचा मुद्दा निवडणूकीच्या केंद्रस्थानी राहिला असला तरी धुळेकरांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांचीही निवडणूकीच्या निमित्ताने चर्चा झाली़ आरोप-प्रत्यारोपांमुळे धुळेकरांचे चांगलेच मनोरंजनही झाले़ सोशल मीडियाबरोबरच प्रचाराच्या एलईडी व्हॅन्स, एयर बलून, बॅनर्स व होर्डिंग्ज, प्रचाररॅली व सभा यांमुळे प्रचारात रंगत भरली गेली़़ या प्रचाराच्या केंद्रस्थानी ‘पॉवरफुल्ल’ हे गीत राहिले़ आकर्षक शब्दरचना व संगीतामुळे हे गीत अगदी घराघरात पोहचले़ एकूणच रंगतदार ठरलेल्या प्रचार प्रक्रियेमुळे महापालिका निवडणूकीची चर्चा चौकाचौकात रंगत असून वेगवेगळे ठोकताळे वर्तवले जात आहेत़ कुणाला किती यश मिळणार, कोणता उमेदवार विजयी होणार तर कोणाचा पराभव होणार याची गणिते मांडली जात आहेत़ परंतु प्रचार प्रक्रियेमुळे निवडणूकीत भरलेली ही रंगत आता थांबली असली तरी या सर्वाचे फलित काय होणार, याची उत्सुकता धुळेकरांना असणार आहे़ प्रत्येक पक्षाकडून आपापल्या विजयाचा दावा केला जात असला तरी कोण किती ‘पॉवरफुल्ल’ ठरणार, हे धुळेकर मतदार ठरवतील़ धुळे व अहमदनगर महापालिकांसाठी रविवारी मतमोजणी होणार असून सोमवारी मतमोजणी होणार आहे़ पण धुळे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले असून निवडणूक प्रक्रियेला कुठलेच गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे़ मतदान प्रक्रियेत वाढ व्हावी, यासाठी चांगले प्रयत्न झाले आहेत़ त्यामुळे आता येणारे दोन ते तीन दिवस सर्वाधिक महत्त्वाचे राहणार असून मतदार राजाचा कौल सोमवारी स्पष्ट होईल़ त्यावरून कोण किती ‘पॉवरफुल्ल’ ठरले हे देखील समोर येईल़ पण धुळेकरांना केवळ विकासाची अपेक्षा असल्याने कुणीही विजयी झाले तरी त्यांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवावे़ प्रलंबित प्रश्न, योजना मार्गी लावून शहराचा विकास करावा व नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, हीच अपेक्षा सर्वसामान्य मतदार बाळगून आहेत, यात शंका नाही़