...आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:46 AM2017-08-09T00:46:18+5:302017-08-09T00:46:53+5:30
९ आॅगस्ट १९४२. तब्बल ७५ वर्षे झाली त्या घटनेला. ती घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचे पाऊल. तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक लढे झाले, होत होते. अनेक नेत्यांचा त्यात मोठा वाटा होता; पण ९ आॅगस्ट १९४२ हा त्या आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा.
- संजीव साबडे
९ आॅगस्ट १९४२.
तब्बल ७५ वर्षे झाली त्या घटनेला. ती घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचे पाऊल. तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक लढे झाले, होत होते. अनेक नेत्यांचा त्यात मोठा वाटा होता; पण ९ आॅगस्ट १९४२ हा त्या आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा. या आंदोलनामुळेच येथील ब्रिटिश साम्राज्याला हादरे बसायला लागले. आपल्याला फार वर्षे इथे सत्ता गाजवता येणार नाही, असे ब्रिटिशांच्या तेव्हा लक्षात आले.
काय होती नेमकी ही घटना?
वर्धा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत महात्मा गांधी यांनी अंतिम लढ्याचे सूतोवाच केले होते. अंतिम लढा म्हणजे त्यांच्या डोक्यात ‘छोडो भारत’ हेच आंदोलन होते; पण त्यांनी वर्ध्यात सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे आवाहन सर्व भारतीयांना, विशेषत: तरुणांना केले होते. सविनय कायदेभंग म्हणताना, त्यांच्या मनात ब्रिटिशांचे कोणतेही कायदे पाळू नका, असेच होते. म्हणजे ब्रिटिश सत्तेला हे आव्हानच होते. त्या आंदोलनाचे स्वरूप मात्र तितकेसे स्पष्ट झाले नव्हते.
त्यानंतर मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या कार्यकारिणीची ७ व ८ आॅगस्ट रोजी बैठक आणि ९ आॅगस्ट रोजी खुले अधिवेशन ठरले होते. कार्यकारिणीच्या बैठकीत गांधीजींनी प्रथमच, ‘छोडो भारत’ ही घोषणा दिली. सोबतच ‘करा वा मरा’ (डू आॅर डाय), ‘छोडो भारत’ म्हणावे की ब्रिटिशांनो माघार घ्या (विड्रॉ किंवा रीट्रीट) असे म्हणावे, यावर मतभेद होते. तेव्हा युसुफ मेहेरअली यांनी क्विट हा शब्द सुचवला आणि गांधीजींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अशा साºयाच नेत्यांनीही बैठकीत त्यास मान्यता दिली. गांधीजी ९ आॅगस्टच्या खुल्या अधिवेशनात ‘छोडो भारत’चा नारा देणार आणि मग देशभर आंदोलन सुरू होणार, हे ठरले होते.
पण ब्रिटिशांनी त्याआधीच काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांवर अचानक बंदी घातली. गांधीजींसह सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्यांना ८ आॅगस्टच्या रात्रीच अटक करण्यात आली. गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये बंद करण्यात आले आणि अन्य सर्व नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे ९ आॅगस्टचे खुले अधिवेशन गवालिया टँकवर होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला; पण अटक न झालेल्या अनेक लहान नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यायचेच असा निश्चय केला.
...आणि ९ आॅगस्ट रोजी सकाळी गवालिया टँक मैदानावर अरुणा असफअली यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन सुरू झाले. जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, डॉ. उषा मेहता तसेच डॉ. राम मनोहर लोहिया हे तरुण तुर्क त्यांच्यासमवेत होते. त्यांनी मैदानात तिरंगा ध्वज फडकावला आणि सर्व नेत्यांनी मिळून ‘छोडो भारत’चा नारा देशाला दिला. तोपर्यंत मैदानाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस आणि लष्कराने मैदानाला घेरले होते. त्यांनी तो ध्वज खाली उतरवला आणि जोरदार लाठीमार करून सर्व काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना तिथून पांगवण्याला सुरुवात केली. तिथे गोळीबारही करण्यात आला.
ही बातमी तेव्हाही देशभर पसरायला फार वेळ लागला नाही. थोड्या वेळातच देशाच्या ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध मोर्चे, मिरवणुका निघू लागल्या. पुरुष, स्त्रिया, लहान मुले, वृद्ध सारेच त्यात वय विसरून सहभागी होऊ लागले. देशभर जणू ब्रिटिशविरोधाचा वणवाच पेटला. तो कसा विझवावा, हे ब्रिटिशांनाही कळेना. मग पोलीस आणि लष्कराची मदत घेत लाठीमार, गोळीबार, धरपकड या मार्गांचा अवलंब ब्रिटिशांनी केला. तरीही वणवा इतका पेटला होता की, ब्रिटिशांना काहीच सुचेना. महाराष्ट्रात सातारा तर मोठे केंद्र होतेच; पण बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश अशा साºया ठिकाणी आंदोलन प्रचंड वेगात पसरत होते. ते केवळ एका दिवसापुरते नव्हते. रोजच्या रोज सकाळ होताच लोक ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईसाठी बाहेर पडू लागले. किती लोकांना मारायचे, कितींना अटक करायची, काहीच ब्रिटिश सरकारला सुचेना. सारी यंत्रणाच ‘छोडो भारत’ आंदोलन मोडून काढायला सज्ज झाली.
त्यातच अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. रेल्वे अडवून त्यातील सरकारी पैसा व शस्त्रे ताब्यात घे, कुठे अधिकाºयांना मारहाण कर, कुठे बँक लूट, सरकारी कार्यालयांना, टपाल पेट्यांना आगी लाव, असे सारे प्रकार. या प्रकारांमुळे पोलिसांना गोळीबार करायला आयते कोलीतच मिळाले. सरकारी आकड्यानुसार त्या गोळीबारात ४0 लोक मेले; पण त्यात सहभागी झालेल्यांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या याच्या किती तरी पट अधिक होती. त्या वर्षात अटक करण्यात आलेल्यांची संख्या एक लाख होती. तब्बल ५३८ वेळा पोलीस व लष्कराने ठिकठिकाणी गोळीबार केला. त्यातील जखमींची संख्या होती १६३0. शिवाय आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल २६ हजार जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८ हजार लोकांना तात्पुरते ताब्यात घेण्यात आले. ज्यांना दंड करण्यात आला, त्यातून तब्बल अडीच कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले.
आंदोलन कायम सुरू राहावे, यासाठी डॉ. उषा मेहता यांनी अज्ञात ठिकाणाहून एक रेडिओ स्टेशन (४२.३२) सुरू केले. (ते गिरगावात होते, असे नंतर स्पष्ट झाले.) त्या वेळचे ते पहिले खासगी रेडिओ स्टेशन. त्यावरून देशभक्तीची भाषणे, गाणी सादर केली जात. काँग्रेसच्या इतिहासातील उल्लेखाप्रमाणे डॉ. लोहिया यांची अनेक भाषणे यावर प्रसारित करण्यात आली.
याच काळात गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा आणि सचिव महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. गांधीजींची प्रकृतीही चांगली नव्हती; पण आंदोलन फारच हिंसक होत आहे, हे पाहून त्यांनी उपोषण सुरू केले. तब्बल २१ दिवस उपोषण सुरू होते. एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे गांधीजींचे उपोषण असे दोन्ही बाजूंनी तडाखे बसत होते ब्रिटिश सत्तेला. व्हाइसरॉय लिनलिथगो यांना हे हाताळण्यात अपयश येत आहे, असे ब्रिटिशांना जाणवले. त्यामुळे लॉर्ड व्हॅवेल यांच्याकडे सूत्रे आली. गांधीजींच्या उपोषणामुळे हादरलेल्या नव्या व्हॉइसरॉयने त्यांची ६ मे १९४३ रोजी सुटका केली.
गांधीजींच्या नंतर अनेक नेत्यांनी सुटका करण्याची पाळी ब्रिटिशांवर आली. तोपर्यंत गांधीजींनी काँग्रेसची पुनर्रचना करण्याचे आवाहन केले. राज्याराज्यांत ती अधिक सक्रिय व्हावी, असे प्रयत्न सुरू झाले; पण ९ आॅगस्ट १९४२ या दिवसाने ब्रिटिश साम्राज्याचा पाया पुरता खचला होता. आपण या देशावर आता राज्य करू शकत नाही, हे ब्रिटिशांनाही जाणवले. मग काँग्रेस व ब्रिटिश यांच्यात चर्चेच्या फेºया सुरू झाल्या. पुढचा इतिहास सर्वांना ठाऊ कच आहे; पण तो या एका दिवसाने घडवला, म्हणून ९ आॅगस्टचे महत्त्व!
छोडो भारत आंदोलनाला मुस्लीम लीग,
हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला होता. या आंदोलनामुळे भारत हिंदूंच्या ताब्यात जाईल, असे महमदअली जिना यांनी बोलून दाखवले होते. या आंदोलनात सहभागी होऊ नका, असे उघड आवाहन
वि. दा. सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केले होते. काँग्रेसच्या छोडो भारत आंदोलनाला कसे तोंड द्यावे, असे पत्रच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटिशांना लिहिले होते. गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या आंदोलनात सहभागी होता कामा नये, अशी भूमिका घेतली होती. दुसºया महायुद्धात जर्मनीच्या विरुद्ध मित्रराष्ट्रे लढत होती; पण रशियानेही त्यात उडी घेतली आणि कम्युनिस्टांनी ब्रिटिशांबद्दलची भूमिका तात्पुरती बदलत ‘छोडो भारत’ आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला; पण मुंबई आणि देशभरातील अनेक कामगार त्यांच्या संघटनांमध्ये होते. त्यांनी मात्र पक्षाची भूमिका अमान्य करीत ‘छोडो भारत’ आंदोलनात भाग घेतला.