भाष्य - चटका लावून झालेली एक्झिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:16 AM2017-08-10T00:16:55+5:302017-08-10T00:17:32+5:30
वेगाचा बादशाह उसेन बोल्टकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्याचप्रमाणे कमावण्यासारखेही काहीच नव्हते. अॅथ्लेटिक्सची अशी कोणती स्पर्धाच उरली नव्हती, ज्यात त्याने बाजी मारली नव्हती. पण तरीही चाहत्यांना यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा विजय पाहिजे होता, कारण ही स्पर्धा त्याची अखेरची स्पर्धा होती. परंतु, दुर्दैवाने या महान अॅथ्लिटला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
वेगाचा बादशाह उसेन बोल्टकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्याचप्रमाणे कमावण्यासारखेही काहीच नव्हते. अॅथ्लेटिक्सची अशी कोणती स्पर्धाच उरली नव्हती, ज्यात त्याने बाजी मारली नव्हती. पण तरीही चाहत्यांना यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा विजय पाहिजे होता, कारण ही स्पर्धा त्याची अखेरची स्पर्धा होती. परंतु, दुर्दैवाने या महान अॅथ्लिटला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आणि नेहमी ‘गोल्डन’ कामगिरीच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो चाहत्यांना त्याचा चटका लागला.
मुळात, बोल्टला जिंकताना पाहण्यासाठीच त्याचे करोडो चाहते श्वास रोखून शर्यत पाहत असतात. शर्यत पहिल्या क्रमांकाने पूर्ण केल्यानंतर बोल्टच्या शानदार पोझला पाहण्यासाठी चाहते जास्त उत्सुकता बाळगून असतात. जागतिक स्पर्धेतही बोल्टच्या याच पोझची संपूर्ण जगाला उत्सुकता होती. ही हटके पोझ घेऊनंच बोल्ट आपल्या कारकिर्दीचा निरोप घेईल, याची सर्वांना खात्री होती. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. एक मात्र नक्की, प्रत्येक महान खेळाडूच्या कारकिर्दीची सांगता ही चटका लावूनंच होते हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांना आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात अवघ्या ४ धावांची आवश्यकता होती, जेणेकरुन त्यांच्या कारकिर्दीत फलंदाजी सरासरी १०० होणार होती. परंतु, ते शून्यावर बाद झाले आणि त्यांच्या अशा एक्झिटने क्रिकेटविश्व हळहळले. त्याचप्रमाणे, महान बॉक्सर मोहम्मद अली यांनाही आपल्या अखेरच्या लढतीत तुलनेत अगदी नवख्या असलेल्या खेळाडूविरुध्द हार पत्करावी लागली होती. शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरही आपल्या अखेरच्या कसोटीत शतक झळकावण्यापासून थोडक्यात चुकला होता. आता, या दिग्गजांमध्ये भर पडली ती उसेन बोल्ट या अवलियाची.
या सर्व दिग्गजांमध्ये एक साम्य होतं ते म्हणजे या सर्वांकडे आपल्या अखेरच्या सामन्यामध्ये, अखेरच्या स्पर्धामध्ये मिळवण्यासारखे काहीच नव्हते. पण, तरीही ते त्वेषाने खेळले ते आपल्या देशासाठी, आपल्या चाहत्यांसाठी. परंतु, अनपेक्षित कामगिरीने झालेली त्यांची एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. कारण, प्रत्येक क्रीडाप्रेमीसाठी त्यांचा विजय हा स्वत:चा विजय होता आणि त्यामुळेच या दिग्गजांच्या अखेरच्या लढतीतील अपयश प्रत्येक चाहत्याला स्वत:चे अपयश वाटत होते. हीच या महान खेळाडूंची खरी कमाई.