भाष्य - अखेर ‘संजय’ सुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:25 AM2017-08-12T00:25:08+5:302017-08-12T00:25:15+5:30
निकालांचे ग्रहण सुटेनासे झाल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ही कारवाई आहे, की कारवाईचे संकेत हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही़ देशमुख यांना रजा दिल्याने निकाल लवकर लागतील, याची मात्र अद्यापही शाश्वती नाही़
निकालांचे ग्रहण सुटेनासे झाल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ही कारवाई आहे, की कारवाईचे संकेत हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही़ देशमुख यांना रजा दिल्याने निकाल लवकर लागतील, याची मात्र अद्यापही शाश्वती नाही़ पावसाळी अधिवेशन, विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल, विरोधकांची टीका यातून मार्ग काढत राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलला, यावर मात्र कुणाचे दुमत नसावे. निकाल म्हणजे विद्यार्थ्यांवर टांगती तलवार तर पेपर तपासणाºया शिक्षकांसाठी हे तर शिवधुनष्य, अशी परिस्थिती दरवर्षाचीच असते़ यावर तोडगा म्हणून यंदा संजय देशमुख यांनी आॅनलाईन पेपर तपासणीचा निर्णय घेतला. हा पर्याय वास्तवात उतरणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर खुद्द राज्यपाल यांनीच वेळेत निकाल लावण्याचा दम विद्यापीठाला भरला. मात्र अजूनही सगळे निकाल लावण्यात विद्यापीठ पास झालेले नाही़ संजय देशमुख यांची कारकीर्द त्यामुळे वादपूर्ण ठरतेय. संजय देशमुख यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांवर आधीच तीव्र आंदोलने झाली असती, तर कारवाईही तेव्हाच झाली असती, मात्र तसे घडले नाही. त्यामुळे कदाचित त्यांच्यावर उशिरा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारवाईत देखील ही दिरंगाईच म्हणावी लागेल़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील ही तिसरी नियुक्ती वादग्रस्त ठरली आहे. याआधी महाधिवक्ता सुनील मनोहर, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी खासगी कारण सांगत पदत्याग केला आहे. सुनील मनोहर यांनी गोवंश हत्याबंदीच्या सुनावणीत वादग्रस्त विधान केले, तर श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दाच उचलून धरला़ या दोघांनंतर संजय देशमुख यांनी आॅनलाईन तपासणीचा धाडसी निर्णय घेतला़ हा निर्णय घेण्याआधी त्यांनी पुरेसा अभ्यास केला असावा, तसेच तज्ज्ञांचा सल्लाही घेतला असावा, असे म्हणता येऊ शकते. तरीही मग हा निर्णय फसला कसा? हा मंथनाचा विषय आहे़ पण, महत्त्वाचे म्हणजे संजय देशमुख यांच्यावरील कारवाईसाठी निवडलेला दिवसही लक्षात राहण्यासारखा आहे़ मराठा मोर्चा मुंबईत दाखल झाला असतानाचा ही कारवाई झाली, परिणामी या कारवाईवर हवी तेवढी टीका अथवा प्रकाशझोत माध्यमांकडूनही टाकला गेला नाही. या निर्णयाचे पुरेसे विश्लेषणही झाले नाही़ या सर्वांत भरडलेला विद्यार्थी व पालक मात्र अजूनही निकालाच्या चिंतेतच आहेत़ कारवाई तर झाली आहे, यापुढे काय? या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांना हवे आहे़ तूर्तास तरी उत्तराची तयारी न करता प्रशासनाने निकाल कसे लवकर लागतील, याकडे लक्ष दिले तरी पुरे आहे, असेच म्हणावे लागेल.