भाष्य - छाप पाडलेल्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:57 AM2017-08-08T00:57:14+5:302017-08-08T00:57:34+5:30
भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी दिव्यांग भालाफेकपटू देवेंद्र झांझरियाच्या नावाची झालेली शिफारस ऐतिहासिक बाब ठरली. क्रीडा म्हणजे क्रिकेट असे समीकरण असलेल्या भारतामध्ये काही वर्षांपासून चित्र बदलत होते आणि झांझरियाची झालेली शिफारस पाहता भारताच्या क्रीडाविश्वाची यशस्वी वाटचाल दिसून येत आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी दिव्यांग भालाफेकपटू देवेंद्र झांझरियाच्या नावाची झालेली शिफारस ऐतिहासिक बाब ठरली. क्रीडा म्हणजे क्रिकेट असे समीकरण असलेल्या भारतामध्ये काही वर्षांपासून चित्र बदलत होते आणि झांझरियाची झालेली शिफारस पाहता भारताच्या क्रीडाविश्वाची यशस्वी वाटचाल दिसून येत आहे. यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी झांझरियासोबत भारताचा हॉकी स्टार सरदार सिंग याचीही शिफारस झाली आहे. परंतु, झांझरियाने सर्वांचे लक्ष वेधले. दिव्यांगांच्या तुलनेत हॉकीला मिळालेल्या प्रसिध्दीमुळे सरदार नवखा नव्हता. परंतु, गतवर्षी झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेला पहिल्यांदाच मोठी प्रसिध्दी मिळाली आणि या स्पर्धेत भालाफेकीमध्ये भारताला सुवर्ण मिळवून देत झांझरिया स्टार झाला. त्यात, हे त्याचे दुसरे वैयक्तिक पॅरालिम्पिक सुवर्ण असल्याचे कळाल्यानंतर भारतीयांनी त्याला डोक्यावरच घेतले. एकीकडे, आॅलिम्पिकमध्ये भारत पदकांसाठी झगडत असताना, पॅरालिम्पिकमध्ये मात्र आपले दिव्यांग खेळाडू असामन्य कामगिरी करत अभिमानाने तिरंगा फडकवित होते. त्यामुळेच झांझरिया व इतर दिव्यांग खेळाडू हीरो बनले.
दुसरीकडे, महिला क्रिकेटपटूंनीही यंदा चांगलाच भाव खाल्ला. विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाचे योगदान दिलेली हरमनप्रीत कौर अर्जुन पुरस्काराची हक्कदार होती. परंतु, बीसीसीआयकडून झालेल्या दिरंगाईमुळे कर्णधार मिताली राजची शिफारस खेलरत्नसाठी होऊ शकली नाही. मिताली यंदा पुरस्काराला मुकली असली, तरी भारतीयांच्या मनात मिळवलेली जागा ती कधीच गमावणार नाही. तसेच चेतेश्वर पुजारा, साकेत मिनेनी, एसएसपी चौरासिया यांनीही आपआपल्या क्रीडा प्रकारात अभिमानास्पद कामगिरी करत चमक दाखवली. एकूणंच यंदा अभिमानास्पद कामगिरी केलेल्या सर्व खेळाडूंना योग्य सन्मान देण्यात आला आहे. तरी, पुरस्कारांची अंतिम नावे जाहीर करण्याचा अधिकार क्रीडा मंत्रालयाकडे असून चेंडू अद्याप त्यांच्याच कोर्टात आहे.