शांताबार्इंची हातभट्टीविरुद्धची लढाई !
By गजानन दिवाण | Published: January 21, 2018 06:52 PM2018-01-21T18:52:13+5:302018-01-21T18:53:11+5:30
हातभट्टीच्या दारूत विषबाधेसारखे धोके जास्त असतात. म्हणूनच सरकारने त्यावर ‘देशी दारू’चा उतारा शोधला. यात उसाच्या मळीपासून तयार होणारे अल्कोहोल विरळ करून त्यात मोसंबी किंवा संत्र्याचा अर्क टाकला जातो म्हणे. त्यालाच आपण मोसंबी किंवा नारंगी देशी दारू म्हणतो. प्रत्यक्षात त्यात कोणत्याच फळाचा रस राहत नाही. कोणी म्हणेल, प्रमाणात दारू प्यायल्याने हृदयरोगाची शक्यता कमी होते. ते खरेच आहे. कारण माणूस यकृताच्या आजाराने तरुणपणातच दगावतो. म्हातारा होण्याची वेळच येत नाही.
गजानन दिवाण
गावखेड्यात जो देशी-हातभट्टी घेतो तो बेवडा ठरतो आणि मुंबईसारख्या मेट्रो सिटीत जो दररोज पार्ट्या झोडतो, तो एक स्टेटसचा भाग असतो. एखाद्या पंचतारांकित हॉटेलातून स्कॉच रिचवून बाहेर पडणारा माणूस श्रीमंत आणि उच्चशिक्षित भासत असतो आणि देशीच्या दुकानातून किंवा एखाद्या हातभट्टीच्या अड्ड्यावरून बाहेर पडलेला माणूस बेवडा-वाया गेलेला भासत असतो. अशा स्थितीत दारू पिणे हे वाईट कसे म्हणता येईल? तो कुठली दारू पितो, यावरून त्याचे सामाजिक स्टेटस ठरत असते. मग हातभट्टी-देशीवाल्याला आपण उगीच का टोमणे मारतो?
या सामाजिक स्टेटसला राजकारण्यांपासून पोलिसांपर्यंत सर्वांचीच मान्यता असते. यामागेही एक मोठे अर्थकारण असते. परळीपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर असलेल्या धारावती तांड्यावरील शांताबाई राठोड यांना मात्र हे स्टेटस समजलेले नाही. जवळपास ६०० उंबरे आणि १८५० लोकसंख्येचे हे गाव. या तांड्यावर गेल्या अनेक वर्षांपासून हातभट्टी चालते. पन्नासावर घरांत बायका-पुरुष आणि पोरांचाही हाच उद्योग. परिसरातील पाच-सहा तालुक्यांना ही हातभट्टी पुरविली जाते. या हातभट्टीने तांड्यावरील शंभरावर संसार उद्ध्वस्त केले. पन्नासावर बळी घेतले.
शांताबार्इंचा सुखी संसारही सोडला नाही. आश्रमशाळेत शिक्षक असलेल्या पतीचा या दारूने बळी घेतला. त्या आश्रमशाळेवरील दारूचा बळी ठरणारे ते पाचवे शिक्षक. लग्नानंतर चौथ्याच वर्षी पती गेला. स्वत:च्या कष्टातून मुलाला उभे केले. मुलीचे लग्न केले. आपल्यासारखे हाल इतर महिलांचे होऊ नयेत म्हणून तांड्यावर चार वर्षांपूर्वी दारूबंदी महिला मंडळ स्थापन केले. पोलिसांना माहिती देऊन पाहिली. पोलीस येतात, पण त्यापूर्वीच ते येण्याचा निरोप आलेला असतो. आता तर त्यांच्या समक्ष खुलेआम दारू गाळली जाते.
या तांड्यावर मोठ्या प्रमाणात हाच उद्योग चालतो. पोलीस काही करीत नाहीत, हे पाहून शांताबार्इंच्या मंडळाने स्वत:च जवळपास ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या; मात्र त्या कायमच्या बंद होऊ शकल्या नाहीत. गेल्या चार वर्षांत शांताबार्इंनी ३२ ठिकाणी निवेदने दिली. आश्वासनांपलीकडे हाती काहीच पडले नाही. त्यांना धमक्या येतात. हल्ले केले जातात. तरीही एकट्या बाईने ११ महिला सदस्यांच्या मदतीने ही लढाई सुरू ठेवली आहे. सरपंचापासून विभागीय आयुक्तांपर्यंत दाद मागितल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर हे निवेदन पोहोचेल, याची शाश्वती नाही. पोहोचले तरी दखल घेतलीच जाईल, असेही नाही.
पोलिसांपासून सरपंचापर्यंत आणि तांड्यावरील जवळपास ६० टक्केघरांना हातभट्टीचीच गरज असेल तर शांताबार्इंनी आणि त्यांच्या मंडळातील ११ महिलांनी काय करायचे? तांड्याला हातभट्टीच्या वाटेवर सोडून कुठलेतरी शहर निवडायचे. राज्यात कुठेही गेले तर त्यांना दारू भेटेल. उद्ध्वस्त झालेले संसारही भेटतील. फरक फक्त हातभट्टीची जागा कुठल्यातरी ब्रॅण्डेड दारूने घेतलेली असेल.
मराठवाडी तडका
देशभरात दारूमुळे दररोज १५ बळी जातात, असे राष्टÑीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी सांगते. यातही महाराष्टÑ नंबर वन आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दारू पिण्याचे प्रमाण १६ टक्के असून आपल्या देशात ते ११ टक्क्यांवर पोहोचले आहे. एखाद्या दारू पिणाºयाला त्याचे परिणाम सांगा. त्याचे उत्तर ठरलेले असते. ‘आपल्या गल्लीतला तो गण्या गेल्या आठवड्यात कॅन्सरने वयाच्या पस्तीशीत गेला. साधी सुपारीही खात नव्हता तो. मग खाऊन-पिऊन गेलेले काय वाईट?’ या त्याच्या खुलाशावर न घेणाºया माणसाने काय करायचे? त्याला त्याच्या मरणाच्या वाटेवर सोडून द्यायचे, आणखी काय?