मनाचिये गुंथी - सत्याची पारख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:00 AM2017-08-08T01:00:00+5:302017-08-08T01:00:09+5:30
‘सत्यमेव जयते’ हे भारतीय संस्कृतीचे घोषवाक्य आहे. म्हणजेच सत्याचाच विजय होतो. हे सत्य काय आहे व आपल्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडतो- अनादी काळापासून तत्त्ववेत्त्यांमध्ये हाच चर्चेचा विषय आहे.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय
‘सत्यमेव जयते’ हे भारतीय संस्कृतीचे घोषवाक्य आहे. म्हणजेच सत्याचाच विजय होतो. हे सत्य काय आहे व आपल्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडतो- अनादी काळापासून तत्त्ववेत्त्यांमध्ये हाच चर्चेचा विषय आहे.
मानवाचे चिंतन जसजसे विकसित होत गेले, तसतशीे शास्त्रांमध्ये वाढ होत गेली. सुरुवातीला केवळ एकच शास्त्र होते- तत्त्वज्ञान. या तत्त्वज्ञानात जीव, जग, इकार इ.ची चर्चा पाहायला मिळते. जसजशा चर्चा विस्तृत होत गेल्या व त्या विशिष्ट विषयावर अनुभवजन्य किंवा प्रयोगजन्य पुरावे मिळत गेले, तसतसे नवीन विषय निर्माण होत गेले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतीशास्त्र इ. आजही आपण पाहतो की एकाच शास्त्रापासून अनेक शास्त्र निर्माण झालेले आहेत. तसेच शास्त्राच्या अनेक शाखा विकसित झालेल्या आहेत व यासंबंधी जसजसे विचारप्रवाह सूक्ष्म व खोलवर होत जाईल, तसतसे त्या विषयाचे वेगवेगळे शास्त्र विकसित होत जाईल.
शेवटी शास्त्राच्या विकासाचा इतिहास जेव्हा आपण पाहतो, तेव्हा असे आढळून येते की शास्त्र हळूहळू लहान, खोलवर व सूक्ष्म होत आहेत. याचे उदाहरण आपण चिकित्सा-शास्त्राद्वारे देऊ शकतो. पूर्वी अशा चिकित्सकांची संख्या जास्त होती, जे सर्वच आजारांवर उपचार करीत असत. हळूहळू तज्ज्ञांची संख्या वाढत गेली परंतु एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आजाराचाच उपचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये दिसून येते. डोळ्याच्या वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे चिकित्सक पाहायला मिळतात. डोळ्याच्या एखाद्या आजाराचा तज्ज्ञ त्याच डोळयाच्या दुसºया आजारावर उपचार करू शकत नाही.
यावरून असे लक्षात येते की ज्ञानाच्या कक्षा हळूहळू अरुंद होताना दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर त्या अधिक खोलवर व सूक्ष्म सुध्दा होत आहेत. एका बाजूने त्याची खोली व सूक्ष्मता वाढत आहे तर दुसरीकडे ते लहान होऊन कमी-कमी होताना दिसते.
तत्त्वज्ञानी व विचारवंतांच्या मते परम सत्य हे अखंडित व अपरिमेय आहे. आपली इंद्रिये ज्याद्वारे आपण सत्याचा शोध घेतो, ते पूर्णत: मर्यादित आहेत. शेवटी या मर्यादित इंद्रियाद्वारे ज्या सत्याचा शोध घेतला जातो, ते सुध्दा मर्यादितच राहील. त्यासोबतच ही इंद्रिये भौतिक असल्याने नेहमीच डळमळीत व चंचल असतात व म्हणूनच या इंद्रियाद्वारे ग्रहण केलेले सत्य नेहमीच बदलत असते. याच कारणामुळे जगातील सर्व सत्य हे नेहमीच बदलत असतात व शेवटी ते अपूर्ण असतात.
जर या जगातील सर्व ज्ञान किंवा सत्य अपूर्ण असतील तर कोणते ज्ञान पूर्ण आहे? भारतीय ऋ षिमुनींच्या मते ते परम सत्य पूर्ण व अखंडित आहे, जे इंद्रियांकडून नाही तर अंतर्ज्ञानापासून मिळालेले आहे. ध्यानाच्या खोलवर अवस्थेत या अमर्याद, अनंत व अखंड सत्याचा अनुभव मिळतो.