ही बस चुकवून चालणार नाही!
By रवी टाले | Published: September 24, 2018 06:25 PM2018-09-24T18:25:19+5:302018-09-24T18:27:47+5:30
पहिल्या तीनही औद्योगिक क्रांतींची सर्वाधिक फळे चाखलेली अमेरिका आज चवथ्या औद्योगिक क्रांतीची फळे चाखण्यासाठीही सिद्ध आहे. आमच्या देशात मात्र त्या दृष्टीने अंधारच दिसत आहे.
भारत सध्या नाट्यमय बदलांच्या टप्प्यातून जात असून आज घेतलेले निर्णय केवळ निकटच्या भविष्यावरच नव्हे, तर कदाचित या शतकाच्या उर्वरित कालखंडावरही प्रभाव टाकतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही दिवसांपूर्वी बेळगावी येथे केले. चवथ्या औद्योगिक क्रांतीच्या नांदीमुळे आमच्या जगण्याच्या, काम करण्याच्या पद्धतींमध्ये आणि सोबतच आमच्या युवकांच्या आकांक्षांमध्येही आमुलाग्र बदल होत आहेत, असेही ते म्हणाले. भारतीय युवकांच्या आकांक्षांमध्ये बदल होत आहेत, हे राष्ट्रपतींचे विधान अगदी बरोबर आहे; पण केवळ आकांक्षा बदलून चालणार नाही, तर त्या आकांक्षा मूर्त रुपात आणण्यासाठी आम्ही तयार आहोत का, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
गत काही वर्षांपासून चवथ्या औद्योगिक क्रांतीची चर्चा सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी भारत पारतंत्र्यात खितपत पडलेला होता. त्यामुळे त्या क्रांतींचा लाभ भारताला मिळण्याची शक्यता नव्हतीच; पण साधारणत: १९८० च्या आसपास सुरू झालेल्या तिसºया औद्योगिक क्रांतीचाही लाभ भारत हवा तसा उठवू शकला नाही. चवथ्या औद्योगिक क्रांतीला नुकताच प्रारंभ झाला असून, सध्याच्या घडीला जगातील सर्वात तरुण राष्ट्र असलेल्या भारताने ही संधीही चुकवली, तर काळ आपल्याला क्षमा करणार नाही आणि जगावर ठसा उमटविण्याची आपली इच्छा अपुरीच राहील!
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींप्रमाणेच चवथी औद्योगिक क्रांतीही नव्या तंत्रज्ञानांच्या पायावर उभी असेल; मात्र यावेळचे तंत्रज्ञान आधीच्या तंत्रज्ञानांच्या तुलनेत खूप वेगळे असेल. यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, इंटरनेट आॅफ थिंग्ज, जैव तंत्रज्ञान, थ्री डी प्रिंटिंग आणि स्वयंचलित वाहने ही चवथ्या औद्योगिक क्रांतीची देण आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. ही क्रांती मनुष्यजातीला कोठवर घेऊन जाईल, याची सध्याच्या घडीला कल्पनाही करणे अशक्य आहे.
आधीच्या तीन औद्योगिक क्रांतींनी काही नव्या रोजगार संधी निर्माण केल्या आणि त्याच वेळी अनेकांचे रोजगार हिरावलेही! त्या दृष्टीने चवथी औद्योगिक क्रांतीही वेगळी नसेल. यंत्रे मनुष्याएवढी ‘स्मार्ट’ बनण्याचा दिवस आता फार दूर नाही. यंत्रमानवाने कारखान्यांनंतर आता घरांमध्येही प्रवेश केला आहे. लवकरच घरातील सर्व किरकोळ कामांची जबाबदारी यंत्रमानव घेतील, असे दिसत आहे. कारखान्यांमधील अर्धकुशल कामगारांसोबतच सॉफ्टवेअर इंजिनीअर, स्टॉक टेÑडर्स, टॅक्सी चालक अशा अनेक घटकंचे रोजगार लवकरच यंत्रे हिरावतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आॅक्सफोर्ड विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला, की येत्या २५ वर्षात चीनमधील ७७ टक्के, भारतातील ६९ टक्के आणि अमेरिकेतील नोकºया संपुष्टात आलेल्या असतील. या प्रक्रियेस यापूर्वीच प्रारंभ झालेला आहे. काही वर्षांपूर्वी प्रमुख रोजगार निर्मिती क्षेत्र ठरलेल्या भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार निर्मिती घटली आहे. तिकडे चीनमधील कारखान्यांमध्ये मनुष्यबळापेक्षा जास्त यंत्रमानव घेतल्या जात आहेत.
वेगाने लोकसंख्या वाढत असलेल्या भारतात आजच बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. चवथी औद्योगिक क्रांती जसजशी जगाला आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ करेल, तसतशी बेरोजगारीची समस्या अधिकाधिक अक्राळविक्राळ रूप धारण करू शकेल. हे होऊ द्यायचे नसेल, तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे या क्रांतीच्या लाटेवर स्वार होणे! त्यासाठी भारतात गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, अॅपल, टेस्लासारख्या कंपन्या उभ्या होण्याची गरज आहे. अशा कंपन्या उभ्या राहण्यासाठी उच्चतम दर्जाची विद्यापीठे असणे अत्यावश्यक ठरते. अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या उपरोल्लेखित कंपन्या विद्यापीठांमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या पोरासोरांनीच उभारल्या आहेत. जगाच्या अर्थकारणालाच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला नवे आयाम देत असलेल्या या सर्व कंपन्या अमेरिकेतच का उभ्या झाल्या? कारण त्या देशात त्यासाठी पूरक वातावरण आहे. त्यामुळेच जगभरातील प्रज्ञावंत तरुण अमेरिकेकडे धाव घेतात आणि तो देशही अशा प्रज्ञावंतांचे स्वागत करण्यास नेहमीच उत्सूक असतो. जगभरातील प्रज्ञावंतांनी अमेरिकेत येऊन केलेल्या संशोधनाच्या व्यापारी वापरासाठी आवश्यक असलेले उद्योगस्नेही वातावरणही तिथे आहे.
पहिल्या तीनही औद्योगिक क्रांतींची सर्वाधिक फळे चाखलेली अमेरिका आज चवथ्या औद्योगिक क्रांतीची फळे चाखण्यासाठीही सिद्ध आहे. आमच्या देशात मात्र त्या दृष्टीने अंधारच दिसत आहे. ना आमच्या देशात जागतिक दर्जाची विद्यापीठे व संशोधन संस्था आहेत, ना दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व आहे, ना अस्सलतेचा ध्यास असलेले उद्योग आहेत! ही परिस्थिती लवकरच बदलली नाही तर तिसºया औद्योगिक क्रांतीप्रमाणेच चवथ्या औद्योगिक क्रांतीची बसही चुकेल आणि मग पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काहीच नसेल!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com