‘चले जाव’चा नारा सेवाग्रामातून तर घोषणा मुंबईतून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:26 AM2017-08-09T00:26:44+5:302017-08-09T00:26:44+5:30
वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात माती आणि गवतापासून तयार केलेल्या छोट्याशा खोलीत बसून गांधीजींनी सर्वात मोठ्या साम्राज्यवाद्यांविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाचा नारा दिला होता. ‘भारत छोडो’ आंदोलन मुंबईत ९ आॅगस्टला सुरू झाले, पण त्याचा प्रस्ताव १४ जुलै १९४२ रोजी वर्ध्याच्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पारित झाला.
- राजेश कुमार यादव
वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात माती आणि गवतापासून तयार केलेल्या छोट्याशा खोलीत बसून गांधीजींनी सर्वात मोठ्या साम्राज्यवाद्यांविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाचा नारा दिला होता. ‘भारत छोडो’ आंदोलन मुंबईत ९ आॅगस्टला सुरू झाले, पण त्याचा प्रस्ताव १४ जुलै १९४२ रोजी वर्ध्याच्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पारित झाला. या प्रस्तावाविरोधात सी. राजगोपालाचारी काँग्रेसमधून बाहेर पडले पंडित नेहरू व मौलाना आजाद हेही आंदोलनाबाबत साशंक होते. पण सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद व अनुग्रह नारायण सिन्हा हे नेते आंदोलनाचे समर्थन करीत होते. जयप्रकाश नारायण व अशोक मेहता या समाजवादी नेत्यांनीही आंदोलनाचे समर्थन केले होते. त्यानंतर ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा प्रस्ताव काही दुरुस्त्यांसह स्वीकारण्यात आला. ९ आॅगस्टच्या रात्री काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली होती.
लोहिया यांनी ट्रॉट्स्की यांच्या हवाल्याने लिहिले आहे की, रशियाच्या क्रांतीमध्ये एक टक्का लोकांनी भाग घेतला होता. पण भारतात आॅगस्ट क्रांतीमध्ये २० टक्के लोक सहभागी होते. ८ आॅगस्ट रोजी अधिवेशनात गांधीजींनी ७० मिनिटे भाषण केले. ते म्हणाले : मी एक छोटासा मंत्र देतो. प्रत्येक श्वासासोबत त्याचा जप करा. तो मंत्र आहे, ‘करो या मरो’. आम्ही भारताला स्वतंत्र करू वा स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राण देऊ. आम्ही डोळ्याने देशाला गुलामी आणि पारतंत्र्यात राहणे पाहणार नाही. प्रत्येक खरा काँग्रेसी, तो पुरुष असेल वा स्त्री, या दृढ निश्चयाने लढ्यात सहभागी होईल की, तो देशाला बंधनात आणि पारतंत्र्यात पाहण्यासाठी जिवंत राहणार नाही, अशी तुमची प्रतिज्ञा असली पाहिजे.
१८५७ पूर्वी स्वातंत्र्याच्या लढाईसोबतसुद्धा ‘भारत छोडो’ आंदोलनाचे सूत्र जोडले जाऊ शकतात. ‘भारत छोडो’ आंदोलन हिंसक होते वा अहिंसक, या प्रश्नावर अनेक वादविवाद झाले आहेत. गांधीजींनी ‘करो या मरो’चा नारा दिला होता आणि त्यांना त्याच रात्री अटक केली होती. त्यांनी लोकांना अहिंसक आंदोलनाचे आवाहन केले होते. ‘भारत छोडो’ देशाच्या स्वातंत्र्याकरिता चालविलेले समग्र आंदोलन निर्णायक व परिणामकारक होते.
(लेखक वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकाशन प्रभारी आहेत.)