भाष्य - ‘वेणी’ अंधश्रद्धेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:55 AM2017-08-08T00:55:18+5:302017-08-08T00:55:33+5:30

सामूहिक उन्मादाचे रौद्ररूप आम्हा भारतीयांसाठी नवे नाही. अनेकदा आपल्याला त्याचे दर्शन घडत असते. तसेच ते अंधश्रद्धेच्या बाबतीतही आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आज जगभरात आपला झेंडा रोवला असला तरी येथील मोठा समूह अजूनही अंधश्रद्धेच्या बेड्यांमध्ये अडकला आहे.

Commentary - 'Benny' superstitions | भाष्य - ‘वेणी’ अंधश्रद्धेची

भाष्य - ‘वेणी’ अंधश्रद्धेची

Next

 सामूहिक उन्मादाचे रौद्ररूप आम्हा भारतीयांसाठी नवे नाही. अनेकदा आपल्याला त्याचे दर्शन घडत असते. तसेच ते अंधश्रद्धेच्या बाबतीतही आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आज जगभरात आपला झेंडा रोवला असला तरी येथील मोठा समूह अजूनही अंधश्रद्धेच्या बेड्यांमध्ये अडकला आहे. जादूटोणा, तंत्रमंत्र, करणी, पिशाच्च त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. अंधश्रद्धा आणि सामूहिक उन्माद हे दोन्ही एकमेकांना पूरक असून यातून निर्माण होणाºया अफवांच्या बाजारांनी सारे जनजीवन ढवळून निघत असते. मग बैलाविना बंड्या चालायला लागतात, श्रीगणेशाची मूर्ती अचानक दूध प्यायला लागते आणि समुद्राचे पाणीही गोड लागते. उत्तर भारतात सध्या अशाच एका ‘चोटी गँग’ने धुमाकूळ घातला आहे. कुणीतरी येते आणि बायकांच्या वेण्या कापून जाते. वेणी कापल्याची पहिली घटना गेल्या आठवड्यात राजस्थानच्या भरतपूरमध्ये ऐकिवात आली आणि बघताबघता संपूर्ण राजस्थान, त्यापाठोपाठ हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तिचे लोण पसरले. आतापर्यंत जवळपास ७५ घटना समोर आल्या आहेत. या महिलांना बेशुद्ध करून त्यांची वेणी कापली जाते, असे सांगतात. पण या वेणी कापणाºयाचे दर्शन अजूनही कुणाला झालेले नाही. वेणी गँगमुळे निर्माण झालेला हा सामूहिक उन्माद वाढत चालला आहे. आग्रात एका महिलेची वेणी कापणारी चेटकीण समजून सामूहिक हत्या करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडला. याशिवाय असंख्य लोक भीतीपोटी तंत्रमंत्राच्या आहारी गेले आहेत. यावर नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशात अलर्ट जारी करावा लागला असून तेथील पोलिसांनी अफवा पसरविणाºया दोघांना अटकही केली आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातही एका महिलेने स्वत:च स्वत:ची वेणी कापून अफवा पसरविल्याचे उघडकीस आले आहे. दुसरीकडे या निव्वळ अफवा आहेत की पूर्वनियोजित कट याचे रहस्य उलगडण्यात पोलीस अजूनही अपयशी ठरत आहेत. यापूर्वी २००१ मध्ये ‘मंकी मॅन’ची अफवा पसरली होती. दिल्लीत शेकडो लोकांवर या मंकी मॅनने हल्ला केला. कुणी त्याला धावताना, कुणी छतावरून उड्या मारताना बघितल्याचा दावा करीत होते. त्यानंतरच्या वर्षी उत्तर प्रदेशात ‘मूह नोचवा’ येऊन गेला. जनावरासारखा चेहरा असलेला एक माणूस लोकांचे चेहरे ओरबडून पळून जात असे. विशेष म्हणजे शोध घेऊनही पोलिसांना ते कधी सापडले नाहीत. गेल्या वर्षी तर नोटाबंदीदरम्यान अचानक बाजारातील मीठ संपल्याची अफवा पसरली आणि अवघ्या काही मिनिटात मीठ खरेदीसाठी दुकांनासमोर रात्री रांगा लागल्या. हा सामूहिक उन्माद लोकांना एवढा वेडेपिसा कसा करतो आणि मग त्यांचे सर्व शहाणपण, सद्सद्विवेकबुद्धी कुठे लुप्त पावते तेच कळत नाही.

Web Title: Commentary - 'Benny' superstitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.