कोरोनाचा धसका अन् प्रशासनाची हलगर्जी!

By रवी टाले | Published: March 7, 2020 12:10 PM2020-03-07T12:10:03+5:302020-03-07T12:14:15+5:30

कोरोना : वेळीच संपूर्ण खबरदारी न घेतल्यास परिस्थिती कधी नियंत्रणाबाहेर जाईल, हे सांगता येणार नाही!

Corona Fobia and administration negligence | कोरोनाचा धसका अन् प्रशासनाची हलगर्जी!

कोरोनाचा धसका अन् प्रशासनाची हलगर्जी!

Next
ठळक मुद्देनागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, यासंदर्भात आता सरकारकडून सल्ले दिले जात आहेत. सभा-समारंभ, यात्रांचे आयोजन टाळण्यास अथवा पुढे ढकलण्यास सांगण्यात येत आहे. आश्चर्यकारक रितीने भारताने तब्बल दोन ते तीन महिने कोरोनास शिरकाव करू दिला नाही.

कोरोना विषाणूच्या भीतीने आता संपूर्ण देशाला आपल्या कवेत घेतले आहे. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधून प्रसारित होत असलेल्या माहितीवरून कुणालाही त्याची प्रचिती येईल. वस्तुत: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर, तो लवकरच भारतात हातपाय पसरेल, अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र सुदैवाने त्यावेळी तसे झाले नाही. उलट भारतापेक्षा अधिक विकसित आणि दर्जेदार आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला; परंतु गत तीन-चार दिवसांपासून भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, केवळ नागरिकच नव्हे, तर शासन आणि प्रशासनही धास्तावले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, यासंदर्भात आता सरकारकडून सल्ले दिले जात आहेत. पर्यटन टाळण्यास सांगितले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रादुर्भावाची शक्यता वाढत असल्याने सभा-समारंभ, यात्रांचे आयोजन टाळण्यास अथवा पुढे ढकलण्यास सांगण्यात येत आहे. पाश्चात्य संस्कृतीची देण असलेल्या हस्तांदोलनाऐवजी पारंपारिक नमस्कार अंगिकारण्याचा सल्ला दिला जात आहे. वारंवार हात धुण्यास सांगण्यात येत आहे. या सल्ल्यांमुळे आणि समाजमाध्यमांवरील त्यांच्या प्रसारामुळे कोरोनासंदर्भातील धसका वाढायलाच मदत होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झालेल्या भारतीय नागरिकांची संख्या शुक्रवारी ३१ वर पोहचली. त्यामध्ये प्रामुख्याने इटलीतून आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वप्रथम चीनमधील वुहान प्रांतामध्ये झाला. त्यानंतर आतापर्यंत जगातील ७५ देशांमध्ये या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोणत्याही नव्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा धोका, जास्त लोकसंख्येच्या आणि गरिबीमुळे आरोग्यविषयक सेवा व सुविधांचा अभाव असलेल्या देशांमध्ये जास्त असतो.
भारत उपरोल्लेखित निकषांमध्ये बसत असल्याने, कोरोना विषाणूचा भारतात प्रवेश झाल्यास त्याचा झपाट्याने प्रादुर्भाव होण्याची भीती प्रारंभी व्यक्त केली जात होती; मात्र आश्चर्यकारक रितीने भारताने तब्बल दोन ते तीन महिने कोरोनास शिरकाव करू दिला नाही. दरम्यानच्या काळात, इटलीसारख्या विकसित देशांमध्ये गणना होत असलेल्या देशात कोरोनाने बरेच बळी घेतले. त्यामुळे भारत कसा वाचला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच, अखेर कोरोनाचा भारतातही शिरकाव झाल्याचे वृत्त थडकले आणि मग दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढत, शुक्रवारी रुग्णांचा आकडा ३१ वर जाऊन पोहचला!
यापूर्वी केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळले होते आणि त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करून त्यांना बरे करण्यात आले होते. चीनमध्ये अडकून पडलेल्या काही नागरिकांना भारत सरकारने मायदेशी परत आणून त्यांच्यावर ‘आयसोलेशन कॅम्प’मध्ये यशस्वी उपचार केले होते. चीन, इटलीसारखे पुढारलेले व संपन्न देश कोरोनास अटकाव करण्यास अपयशी ठरले असताना, भारताने मात्र कोरोनास दूर राखण्यात यश मिळविल्याबद्दल शासन व प्रशासनाची प्रशंसाही झाली होती; मात्र तब्बल दोन ते तीन महिने कोरोना विषाणूस शिरकाव करू न दिलेल्या भारतात अखेर या जीवघेण्या विषाणूस चंचूप्रवेश मिळण्यामागे प्रशासनाची हलगर्जीच कारणीभूत ठरली!
युरोप दौरा आटोपून एक भारतीय नागरिक २५ फेब्रुवारीला मायदेशी परतला. त्याने इटलीलाही भेट दिली होती. भारतात परतल्यावर, त्याची दिल्ली विमानतळावर वैद्यकीय तपासणी झाली नाही आणि तो त्याच्या नियमित दिनचर्येस लागला. त्या व्यक्तीने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका मेजवाणीचेही आयोजन केले. त्यामध्ये राजधानीतील दोन शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. आता त्या दोन्ही शाळा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या आहेत. हीच खबरदारी ती व्यक्ती मायदेशी परतली तेव्हा घेतली असती, तर आज देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कदाचित झालाच नसता!
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी, इटलीतून भारतात आलेल्या पर्यटकांनाही जबाबदार मानण्यात येत आहे. पर्यटकांच्या त्या गटातील सर्व १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता त्या पर्यटकांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाने हीच खबरदारी आधी घेतली असती, तर कदाचित आज कोरोनाचा धसका घेण्याची पाळीच भारतीयांवर आली नसती!
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव चीननंतर इटलीमध्ये झाला आहे, हे सर्वविदित सत्य असताना, तब्बल दोन ते तीन महिने कोरोनास भारतापासून दूर ठेवण्यात यश मिळविलेल्या सरकारने इटलीतून आलेल्या भारतीय अथवा विदेशी नागरिकांची विमानतळावरच काटेकोर वैद्यकीय तपासणी न करण्याची हलगर्जी का केली, हे अगम्य आहे. किमान यापुढे तरी अशी हलगर्जी होणार नाही, यासाठी सर्व संबधितांना कडक तंबी देण्याची नितांत गरज आहे. सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भारतीय व विदेशी नागरिकांना ‘आयसोलेशन कॅम्प’मध्ये ठेवून त्यांच्यावर सर्वोत्तम इलाज करण्याची गरज आहे! सव्वाशे कोटींच्या देशात ३१ रुग्ण हा फार मोठा आकडा नक्कीच नाही; मात्र वेळीच संपूर्ण खबरदारी न घेतल्यास परिस्थिती कधी नियंत्रणाबाहेर जाईल, हे सांगता येणार नाही!


- रवी टाले    
ravi.tale@lokmat.com  















 

Web Title: Corona Fobia and administration negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.