प्रतिसरकारची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:40 AM2017-08-09T00:40:29+5:302017-08-09T00:40:33+5:30
वर्धा येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक १४ जुलैै १९४२ रोजी झाली. त्यामध्ये ‘इंग्रजांनी ताबडतोब हिंदुस्थान सोडून जावे’ असा ठराव करण्यात आला.
वर्धा येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक १४ जुलैै १९४२ रोजी झाली. त्यामध्ये ‘इंग्रजांनी ताबडतोब हिंदुस्थान सोडून जावे’ असा ठराव करण्यात आला. मुंबईत ८ आणि ९ आॅगस्ट रोजी अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. महात्मा गांधी यांनी तरुणांना आवाहन केले की, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे आणि ‘करा किंवा मरा’ हा एकमेव नारा असेल. त्याला पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचेच प्रतिसरकारमध्ये रूपांतर झाले. महात्मा गांधींच्या ‘चले जाव’च्या घोषणेला प्रतिसाद मिळू लागला. गावोगावी मोर्चे निघू लागले.
३ सप्टेंबर १९४२ तासगावचा मोर्चा
महात्मा गांधी यांच्या आवाहनानुसार भूमिगत राहून काम करणाºया स्वातंत्र्यवादी तरुणांनी ३ सप्टेंबर रोजी नाना पाटील, कृष्णराव कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले. जवळच निमणी गावात इंग्रज अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेला
डाक बंगला मोर्चेकऱ्यांनी जाळला.
६ सप्टेंबर १९४२ कऱ्हाडचा मोर्चा
तासगावचा मोर्चा यशस्वी होताच दादासाहेब पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली.
८ सप्टेंबर १९४२ : इस्लामपूरचा गोळीबार
तासगाव आणि कऱ्हाडच्या मोर्चांना प्रतिसाद मिळाल्याने इस्लामपूरमध्ये मोठा मोर्चा निघाला. नाना पाटील यांनी गावोगावी बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली होती. गोविंदराव खोत, पांडू मास्तर, उमाशंकर पंड्या, बारबटे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. इंग्रजांनी दडपशाहीचा मार्ग स्वीकारून बेछूट लाठीमार आणि गोळीबार केला. त्यात उमाशंकर पंड्या आणि बारबटे यांना हौतात्म्य पत्करावे लागले.
९ सप्टेंबर १९४२ वडूजचा मोर्चा
सातारा जिल्ह्यातील वडूजला दुसऱ्याच दिवशी मोर्चा होता. त्याचे नेतृत्व गौरीहर सिंहासने, बंडोपंत लोमटे, परशुराम घारगे आदींनी केले. इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला. त्यात पाच जण हुतात्मा झाले. सुमारे ७० जण गंभीर जखमी झाले.
१३ डिसेंबर १९४२ गारगोटी गोळीबार
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीत तहसील कचेरीवर जोरदार हल्ला करण्यात आला. मोर्चातील असंतोष उफाळून आला होता. पोलिसांनी पुन्हा बेछूट गोळीबार केला. त्यात सात तरुण धारातीर्थी पडले. याचे तीव्र पडसाद कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरात उमटले.
२६ एप्रिल १९४३ कुंडल बँक लुटली
भूमिगत राहून लढा देण्यासाठी शस्त्रांची गरज होती. शस्त्रास्त्रे विकत आणण्यासाठी पैसा हवा म्हणून जी. डी. लाड, नागनाथ नायकवडी, आण्णा लाड, एस. बी. पाटील, शंकर परुळेकर आदींनी कुंडल बँकेतील सुमारे पन्नास हजारांचा ऐवज लुटला.
७ जून १९४३ शेणोलीत रेल्वे लुटली
सातारच्या क्रांती कार्याला लागणारा निधी उभारण्यासाठी कऱ्हाड ते मिरजदरम्यान पगार घेऊन जाणारी रेल्वेगाडी १३ तरुण स्वातंत्र्यसैनिकांनी लुटली. यात १९ हजार रुपये मिळाले.
१४ एप्रिल १९४३ धुळे खजिना लुटला
धुळ्यातील डॉ. उत्तमराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लीलाताई यांचा ‘चले जाव’ आंदोलनातून सातारच्या भूमिगत कार्य करणाºया तरुणांशी संबंध आला होता. त्यांच्या मदतीने धुळ्यातून निघणारी पगाराची गाडी लुटण्याची योजना आखली. चिमठाणा स्टँडवर गाडी येताच, त्यावर हल्ला करून जी. डी. लाड, धोंडिराम माळी, नागनाथ नायकवडी, उत्तमराव पाटील आदींनी चार लाख ३१ हजार रुपये लुटले.
२४ जुलै १९४३ सांगलीच्या तुरुंगातून पलायन
सांगली परिसरात भूमिगत राहून ‘चले जाव’चा लढा तीव्र लढणारे वसंतदादा पाटील यांच्यासह ११ जणांना अटक करून तुरुंगात ठेवले होते. त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवरून उड्या मारून पलायन केले. भरदिवसा हा प्रकार घडला होता. कृष्णा नदीला पूर होता, त्या दिशेने जाऊन पुरातून उड्या टाकून नदी पार केली; पण पोलिसांच्या गोळीबारात अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबूराव जाधव हे दोन सहकारी धारातीर्थी पडले.
३ आॅगस्ट १९४३ प्रतिसरकारची स्थापना
इंग्रजांची दडपशाही वाढल्याने भूमिगत राहून प्रतिसरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव कामेरीत (ता. वाळवा जि. सांगली) झालेल्या एका बैठकीत मांडण्यात आला. यशवंतराव चव्हाण आणि त्यांना मानणाºया गटाचा विरोध होता. त्यांच्यासह ११ जण शरण आले. ३ आॅगस्ट रोजी पणुंब्रे येथे व्यापक बैठकीत प्रतिसरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला. नाना पाटील आणि किसन वीर प्रमुख डिक्टेटर म्हणून निवडले गेले.
२० आॅगस्ट १९४३ दोन हजार तारा तोडल्या
प्रतिसरकारच्या स्थापनेनंतरचा पहिला कार्यक्रम. पुण्याजवळ नीरा नदीपासून कोल्हापूरच्या सीमेवरील वारणा नदीजवळ टोपपर्यंतच्या पुणे-बंगळुरू मार्गावरील चारही ठिकाणी दोन हजार तारा तोडण्यात आल्या. हे प्रतिसरकार पावणेचार वर्षे टिकले. हिंदुस्थानात मदिनापूर (बंगाल), बालिया (उत्तरप्रदेश), भागलपूर (बिहार) आणि सातारा (महाराष्ट्र), अशाप्रकारे चार ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाली होती. त्यातील सर्वाधिक काळ टिकले ते साताºयाचे प्रतिसरकार.
७ मे १९४६ नाना पाटील प्रकटले
प्रतिसरकारच्या पावणेचार वर्षांच्या काळात प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी भूमिगत राहून कार्यरत होते. नाना पाटील ७ मे रोजी कऱ्हाड जवळच्या कोणगावमध्ये प्रकट झाले. इतर सहकारी आपापल्या भागांत प्रकट झाले. त्यांचे जनतेने प्रचंड स्वागत केले.