नाथसागरातील मगरीचा संसार माणसांनी उठविला !
By गजानन दिवाण | Published: November 19, 2017 10:50 AM2017-11-19T10:50:57+5:302017-11-19T10:52:53+5:30
अनोळखी माणसाने दार ठोठावलेलेही आम्हा माणसांना आवडत नाही. आम्ही मात्र एखाद्याच्या घरात घुसायचे. त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्याच्याच घरातून त्याला हुसकावून लावायचे. हा कुठला न्याय? जायकवाडी अर्थात नाथसागरात सुखाने संसार सुरू असलेल्या मगरीला आम्ही असेच केले. अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी आम्हा माणसांना पोलिसांपासून न्यायव्यवस्थेपर्यंत अनेक पर्याय आहेत. या मुक्या प्राण्यांनी दाद कुठे मागायची? त्यांच्यासाठी वकिली कोणी करायची?
कोणी कुठल्या घरात राहायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. हे सरळ साधे तत्त्व माणसांच्या बाबतीत पाळले जाते. मग प्राण्यांनी कुठे राहायचे हे ठरविण्याचा अधिकार आम्हा माणसांना दिला कोणी? त्याठिकाणी राहण्यामुळे या प्राण्यांपासून आम्हाला काही त्रास होत असेल, तर विचार होईलही कदाचित; पण तेही कधी, तर त्या प्राण्याने माणसाच्या वस्तीत येऊन अतिक्रमण केले असेल तर! आम्ही माणसांनीच त्याच्या घरावर अतिक्रमण करायचे आणि तिथेही त्याचा त्रास होतो म्हणून त्याला दुसºयाच ठिकाणी नेऊन सोडायचे, या हुकूमशाही वृत्तीला काय म्हणायचे? पैठणच्या नाथसागरातील मगरीच्या बाबतीत वन विभागाने हेच केले.
स्थानिकांनी विरोध केला म्हणून या अधिका-यांनी एका दिवसात मगरीला विदर्भात नेऊन सोडून दिले. विरोध होतो म्हणून आज मगरीला सोडले. उद्या या नाथसागरातील साºयाच जलचरांना विरोध झाला तर त्यांनाही बाहेर सोडणार काय?
मगरीला तिच्या घरातून बाहेर काढल्याचे दु:ख आहेच. वन आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी ज्यांची नियुक्ती केली गेली त्या अधिका-यांनीच असे करावे, याचे दु:ख अधिक आहे. हा प्रश्न एकट्या मगरीचा किंवा नाथसागराचा नाही. जंगलातील प्राण्यांनी जंगलात आणि जलचरांनी पाण्यात नाही राहायचे तर कोठे राहायचे? त्यांच्या तिथे राहण्याला माणसांचा विरोध कसा असू शकतो? नाथसागरातील मगरीला तो होता. या घटनेनंतर तो आणखी वाढणार आहे. जंगलात वाघ असणे हे जसे चांगल्या जंगलाचे लक्षण समजले जाते अगदी तसेच तलाव-धरण-नदीत मगर असणे समजले जाते. आम्ही याच मगरीला विदर्भातील तोतलाडोहमध्ये सोडून दिले.
नाथसागरात गेल्या ४० वर्षांपासून मगर दिसते. त्यांची संख्या किती? कुठल्या भागात त्यांचा अधिवास आहे, याचा कुठलाही अभ्यास आतापर्यंत केला गेला नाही.
त्या रात्री ही मगर नाथसागराच्या किनारी असलेल्या रस्त्यावर काहींना दिसली. उत्साही कार्यकर्त्यांनी तिला पिंजराबंद केले. या मगरीने माणसांच्या हद्दीत प्रवेश केला होता की माणसांनी तिच्या हद्दीत याचा विचार झाला नाही. अवैध शेती, अवैध मच्छीमारी आणि पाण्याचा अवैध उपसा या माध्यमातून आम्ही माणसांनी या मगरीच्या पाण्यातील स्वातंत्र्यांवरच घाला घातला. साºया जलचरांचेच आयुष्य धोक्यात आणले. या सर्व जलचरांनी गेली अनेक वर्षे हे सहन केले.
नाथसागरात मगरीने वा अन्य कुठल्या जलचराने माणसावर हल्ला केल्याची घटना ४० वर्षांत घडल्याचे ऐकिवात नाही. किनारी येऊन मोकळा श्वास घेणे हा तिचा दैनंदिन जीवनाचा भाग. असे असताना तिला पिंजराबंद करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिका-यांनी पैठणला जाऊन मगरीला ताब्यात घेतले आणि औरंगाबादच्या प्रादेशिक कार्यालयाच्या रोपवाटिकेत आणून ठेवले. नागपूरच्या मुख्यालयातून परवानगी मिळताच दुसºयाच दिवशी विदर्भात नेऊन तिला सोडण्यात आले. स्थानिकांचा विरोध होता म्हणून तिला हलविण्यात आले. त्यामागील कारण काय याच्या खोलात जावे, असे ना स्थानिक अधिका-यांना वाटले ना नागपूर मुख्यालयात बसलेल्या अधिका-यांना वाटले. झटपट निर्णय घेऊन सारेच मोकळे झाले.
जवळपास नऊ वर्षांनंतर यंदा नाथसागर भरले. अवैध मासेमारी, जलाशयात पंप टाकून पाणीउपसा आणि उसाची अवैध शेती सुरू होतीच. ती आता झपाट्याने वाढेल. धरण मृतसाठ्यात असताना हे राजरोसपणे व्हायचे. यंदा तर निसर्गाने भरभरून दिले आहे. मग त्यांना कोण रोखणार? पाण्यातील वावर निर्धोक व्हावा, यासाठी लोकांना ही मगर नकोच होती. त्यांची ती भावना एक वेळ आपण समजूनही घेऊ. वन अधिका-यांनीही त्यांचीच री ओढली. मुळात अवैध मासेमारी आणि धरण क्षेत्रात होणारी शेती थांबविण्याचे धाडस आतापर्यंत कुठलाही अधिकारी दाखवू शकला नाही. त्याचे कारण शोधण्यात ‘अर्थ’ नाही.
या लोकांना मगरीचा काहीसा धाक होता. तिलाच हलविल्याने तोही राहिला नाही. आता नाथसागर सर्वांसाठी मोकळे रान झाले आहे. कोणीही, कधीही जावे आणि अतिक्रमण करावे.