दिवाळीची गुरूदक्षिणा !
By गजानन दिवाण | Published: October 11, 2017 12:26 PM2017-10-11T12:26:36+5:302017-10-11T12:35:18+5:30
संस्थाचालकांनी ज्यांच्याकडून लाखो रुपये घेतले, त्यासाठी वाढीव पटसंख्या दाखविली, हेच शिक्षक आता जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजित होतील आणि अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक त्याच ठिकाणी खितपत पडतील.
गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देण्याचा काळ कधीच गेला. आता गुरूंना दक्षिणा वगैरे देणे दूरच, त्यांच्याकडूनच ती कशी घेता येईल आणि ती न देणा-यांना अधिकाधिक अडचणीत कसे लोटता येईल असा हा काळ आहे. राज्यात गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेले शिक्षक समायोजन धोरण हा याचाच भाग आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
जवळपास २० वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि आपले आई-बाप, पत्नी-मुलांपासून दूर राहून शिक्षणाची गंगा वाहती ठेवणा-या राज्यातील जवळपास २२ हजार जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची लढाई ‘लोकमत’ने दोन वर्षे लढली. याच प्रश्नाने शिक्षक सहकार संघटना जन्माला घातली. राज्यभरातील शिक्षक एकवटले आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले.
१४ मार्च २०१७ रोजी शासनाने आंतरजिल्हा बदलीचे नवीन आॅनलाइन धोरण जाहीर केले. त्यानुसार तब्बल ५५०० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या एका क्लीकवर झाल्या. एकही पैशाचा व्यवहार न होता झालेल्या या बदल्या ऐतिहासिक ठरल्या. यामुळे अनेक राजकारण्यांचे बदल्यांचे दुकान उठले. यासाठी शासनाचे अभिनंदन करावे तेवढे कमीच. त्यामुळेच गेली अनेक वर्षे कुटुंबापासून दूर राहिलेल्या १६ हजार शिक्षकांच्या कुटुंबाजवळ जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या.
असे आनंदाचे वातावरण असताना अचानक दिवाळीच्या तोंडावर म्हणजे ४ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाने समायोजनाचा हा नवीन आदेश आणला. यानुसार खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खासगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. यामुळे रिक्त जागांवर आंतरजिल्हा बदलीने येणा-या शिक्षकांना स्थान मिळणार नसून ती जागा खासगी शाळेचे शिक्षक घेणार आहेत.
आता हे खासगी शाळेचे शिक्षक म्हणजे कोण? संस्थाचालकांनी ज्यांच्याकडून लाखो रुपये घेतले, त्यासाठी वाढीव पटसंख्या दाखविली, हेच शिक्षक आता जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजित होतील आणि अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक त्याच ठिकाणी खितपत पडतील. यापूर्वी शासनाने संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश दिले होते. त्याची कुठेच अंमलबजावणी झाली नाही. आता या संस्थाचालकाच्या प्रेमाचे राज्य सरकारला भरते आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या तोंडावर आपल्या शिक्षकांना दिलेली ही गुरुदक्षिणा नव्हे तर आणखी काय?