अनाथांचे नाथ व्हा !
By गजानन दिवाण | Published: April 10, 2018 12:23 AM2018-04-10T00:23:26+5:302018-04-10T00:23:26+5:30
राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी राज्य शासनाने घेतला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकºयांसाठी हे आरक्षण लागू असेल. जन्म घेतला त्याचक्षणी आई-बापाने नाकारलेल्यांसाठी केवढा मोठा हा निर्णय? आई-बापाच्या मायेची ऊब कशानेच भरुन निघू शकत नाही. त्यांचे हे दु:ख या मायबाप सरकारने जाणले आणि आरक्षण लागू करून टाकले. कोणीच आमच्या पाठिशी नाही, ही अनाथांची भावना या निर्णयातून सरकारने पुसून टाकली. अनाथांना जगण्याचे मोठे बळ या निर्णयातून मिळाले. रक्ताच्या नात्याने नाकारले त्यांना सरकारने स्वीकारले, असेच म्हणावे लागेल. महिला व बालकल्याण विभागाने यासंदर्भात तात्काळ जीरआरदेखील काढला. महिला आणि बालकल्याण विभागाकडून देण्यात येणारे अनाथाचे प्रमाणपत्र यासाठी आवश्यक करण्यात आले आहे. ज्या मुलांच्या कागदपत्रावर आई-वडील, काका-काकू, आजी-आजेबा व इतर नातेवाईक यांच्याबाबत माहिती उपलब्ध नाही आणि त्यावर कुठल्याची जातीचा उल्लेख नाही असेच प्रमाणपत्र आरक्षणासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात बालगृह आणि अनाथाश्रमांत राहणाºया मुलांची माहिती घेतली, तेव्हा एकाही अनाथ मुलाकडे हे प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. प्रमाणपत्र नसल्याने ही अनाथ मुले स्वत:ला अनाथ म्हणून सिद्ध करू शकणार नाहीत. त्या त्या जिल्ह्यात महिला व बालकल्याण अधिकाºयांनी अनाथ मुलांच्या प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. थोड्याच दिवसांत हे प्रस्ताव पाठविले जातील. यानिमीत्ताने ‘मास्तर तुमचंच नाव लिवा’ म्हणणारे ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे आठवले. तेदेखील अनाथच. १९२६-२७मध्ये मुंबईतील चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा हा अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला आणि या अनाथ पोराला ‘नारायण’ हे नावही दिले. अनेक आश्रमशाळांमध्ये अनाथांना आपलेच नाव देणारे अनेक मास्तर आजही आहेत. नव्या आरक्षणाच्या कसोटीत यातला एकही अनाथ बसणार नाही. सरकारी कामकाज कसे चालते हे सर्वांनाच ठाऊक. मायबाप सरकार, अहवाल पाठविताना-प्रमाणपत्र देताना जन्मदात्यांनी नाकारलेल्यांनाही हा अनुभव येऊ नये. अनाथांचे नाथ होण्याचा निर्णय आपण घेतला आहेच. त्या शब्दाला जागून कागद काळे करा, एवढीच अपेक्षा.