बेचाळीसचे क्रांतिपर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:35 AM2017-08-09T00:35:20+5:302017-08-09T00:35:31+5:30
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्ट १९४२ रोजी दिलेला ‘चले जाव’ हा नारा पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकारी तरुणांनी प्रत्यक्ष स्वत:च्या कानांनी ऐकला होता. ‘चले जाव’ हा नारा इंग्रजांसाठी होता आणि भारतीय तरुणांसाठी आवाहन होते की, ‘करो या मरो’.
- वसंत भोसले
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्ट १९४२ रोजी दिलेला ‘चले जाव’ हा नारा पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकारी तरुणांनी प्रत्यक्ष स्वत:च्या कानांनी ऐकला होता. ‘चले जाव’ हा नारा इंग्रजांसाठी होता आणि भारतीय तरुणांसाठी आवाहन होते की, ‘करो या मरो’. वास्तविक, संपूर्ण अहिंसात्मक आंदोलनावर निष्ठा असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या या आवाहनाचा स्वीकार सातारा, सांगलीच्या तरुणांनी शब्दश: केला. ९ आॅगस्ट १९४२च्या मुंबईत झालेल्या गोवालिया टॅँकवरील अधिवेशनाला हजर राहून परतलेले नाना पाटील, जी. डी. लाड, नागनाथ नायकवडी, किसन वीर आदी तरुण गावोगावी प्रचार करीत होते. परिणामी, तासगाव, इस्लामपूर, कºहाड, वडूज, गारगोटी, आदी तहसील असलेल्या गावांत मोर्चे निघू लागले.
एक-दोन मोर्चांचा प्रतिसाद वाढत असलेल्या इंग्रजांना धोका जाणवू लागला. त्यांनी इस्लामपूरच्या मोर्चावर बेछूट गोळीबारच केला. त्यात दोघे हुतात्मे झाले. वडूज आणि गारगोटीतही असाच प्रकार घडला.
महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक आंदोलनावर निष्ठा असणारे तरुण इंग्रजांच्या दडपशाहीला तोंड कसे द्यायचे, या विचारात होते. त्यांनी भूमिगत राहून हिंसेला हिंसेने उत्तर देण्याचा निर्धार केला. याला यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाºयांचा विरोध होता. त्यांनी शरण जाण्याचा निर्णय घेतला. हा सशस्त्र संघर्ष करण्यासाठी साधने लागणार होती. बंदुका, दारूगोळा, काडतुसे, आदींची गरज होती. ती मिळविण्यासाठी पैसा लागणार होता. या भूमिगत गटाने लोकांकडून पैसा बळजबरीने न घेता, सरकारी खजिने लुटण्याचा निर्णय घेतला. बॅँका, सरकारी खजिना, रेल्वे लुटण्यात येऊन तो पैसा सशस्त्र संघर्ष उभा करण्यात वापरण्यात येऊ लागला.
दरम्यान, या परिसरात दरोडा घालणाºया टोळ्या होत्या. त्यांनीही ‘चले जाव’चा नारा देत भूमिगत कार्यकर्ते असल्याचे भासवत दरोडे घालण्यास सुरुवात केली. लोकांचा भूमिगत कार्यकर्त्यांवरील विश्वासच उडू लागला. चोरीची तक्रार केल्यानंतर पोलिस हात वर करीत आणि तुमचेच भूमिगत स्वातंत्र्यवीर हा प्रकार करतात, असे सांगून चळवळ बदनाम करू लागले. तेव्हा प्रतिसरकार स्थापन करून आपणालाच जनतेला संरक्षण द्यावे लागेल, हा विचार पुढे आला आणि इंग्रजांबरोबरच दरोडे घालणारे, स्त्रियांची अब्रू लुटणारे यांचा बंदोबस्त करण्याचा मोठा कार्यक्रम प्रतिसरकार स्थापन करून घेण्यात आला. लोकांचा त्रास वाचला, त्यांना संरक्षण मिळू लागले. तसे प्रतिसरकारच्या चळवळीला पाठबळही मिळू लागले. लोकसहभाग वाढला. विशेषत: स्त्रियांनी भूमिगत कार्यकर्त्यांना आश्रय दिला. त्यांच्या लपण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कारण, दरोडेखोरांचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना होता. या सामाजिक जबाबदारीमुळेच लोकसहभाग वाढल्याने साताºयाचे प्रतिसरकार देशातील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार होते. प्रतिसरकारची सविस्तर कार्यकारिणी ठरली होती. कायदा-सुव्यवस्था पाहणारी ‘तुफान सेना’ होती. सरकारी, गावगुंड आणि इंग्रज प्रशासनाकडून होणाºया अन्यायला न्याय देणारी ‘ग्रामन्याय’ व्यवस्था तयार केली होती. ग्रामस्वच्छता, लोकराज्य आदी संकल्पना प्रतिसरकारने राबविल्या होत्या. त्यामुळे लोकांना ते आपले वाटत होते. इंग्रजांशी लढताना गावागावांत गावगुंडापासून संरक्षण देण्याचा मोठा कार्यक्रम राबविल्याने नाना पाटील आणि त्यांच्या सहकाºयांना लोक दैवतच मानत. ‘चले जाव’चा अहिंसात्मक मार्गाने करायचा लढा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे आणि गावगुंडाच्या दहशतीमुळे सशस्त्र करावा लागला.
तो एक सर्वात मोठा यशस्वी लढा होता. म्हणून नाना पाटील प्रकट झाले तेव्हा स्त्रिया ओव्या म्हणायच्या की, नाना पाटील पुढारी आले! चला ओवाळू गं!!