क्रांतीलढ्यातील वैचारिक रागिणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:05 PM2018-10-08T13:05:10+5:302018-10-08T13:16:43+5:30
गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत नवा मानवतावादी सिद्धांत मांडणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
- धनाजी कांबळे
गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत नवा मानवतावादी सिद्धांत मांडणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष रस्त्यावरच्या चळवळीत लढणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते विद्यापीठीय चर्चासत्रात माणसाच्या जगण्याचे तत्वज्ञान मांडताना डॉ. गेल ऑम्वेट यांच्या पुस्तकांचा संदर्भ घेतला जातो. जात, वर्ग, पितृसत्ता आणि स्त्रीदास्य अंतासाठीच्या लढाईत वैचारिक दिशादर्शन त्यांच्या साहित्यातून दिसते. त्यांच्या या वैचारिक योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातर्फे डॉ. विद्युत भागवत यांच्या हस्ते त्यांचा नुकताच गौरव झाला.
...तू बुद्धाचा माग काढत आलीस
चंगळवादी स्वदेश सोडून
तू आमच्या लढ्याचा भाग झालीस
तू चोखोबाची हाडं गोळा केलीस
तू तुकोबाची गाथा शोधलीस
तू नामदेवांची पताका ऊंची केलीस आम्हाला दिसेलाशी
आणि एका प्राच्यबिंदूपासून ते मध्ययुगीन भक्ती चळवळीपासून ते
आधुनिक काळापर्यंतचे समतेचे वारकरी वाद प्रतिवाद करत
पण हातात हात घालून
आणलेस बेगमपुऱ्यात...
धम्मसंगिनी रमागोरख यांनी ‘कासेगावनिवासिनी गेल’ अशी कविता लिहिली आहे. त्या कवितेतील या काही ओळी डॉ. गेल ऑम्वेट यांच्या तत्वज्ञानाचा आणि वैचारिक परंपरांचा आवाका स्पष्ट करतात. माणसाचे जीवन दु:खमुक्त होण्यासाठी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विचारपावलांवर चालताना एकूण मानवमुक्तीच्या मार्गाचा शोध घेण्याच्या प्रवासात भारतातील समाजव्यवस्थेची चिकीत्सा डॉ. गेल यांनी केलेली आहे. भारतीय समाज हा जातीसमाज आहे. त्याचप्रमाणे तो पितृसत्ताक व्यवस्थेत विकसित होत असल्याने त्याच्यातून पुढे आलेल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या वाट्याला आलेले दास्य संपविण्यासाठी मार्क्स, फुले, आंबेडकरांपासून ते कॉ. शरद पाटील यांच्यापर्यंत झालेली मांडणी विचारात घेऊन समताधिष्टीत समाज निर्मितीमधील अडथळे कोणते, याचा ऊहापोह त्यांनी केल्याचे दिसते. त्यांनी त्यांच्या लेखनातून मांडलेला वसाहतवाद, जातिव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि जातीय उतरंडीच्या निर्माणाची पार्श्वभूमी याची चिकीत्सा करीत आता २१ शतकात बदललेले संदर्भ आणि दृष्य-अदृश्य स्वरुपातील अवशेष यांचा विचार दोन दिवस विद्यापीठात झालेल्या सेमिनारमध्ये करण्यात आला. शोषित आणि शोषक यांच्यातील व्यवस्था आणि समाजघटक यासंदर्भात सध्याच्या काळात त्याचे विश्लेषण कसे करणार, किवा जातिव्यवस्था, स्त्रीदास्य अंताच्या दृष्टीने कशापद्धतीने पुढे जायला हवे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारित समाज कसा असायला हवा. त्यासाठी आधीच्या विचारवंत, कार्यकर्त्यांनी, महानायकांनी काय मांडणी केली आहे, याचा विचार करून आताच्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीची सैद्धांतिक मांडणी असायला हवी. त्यादृष्टीने गेल यांनी कोणता आशावाद उद्धृत केला आहे, यावर दोन दिवस खल करण्यात आला. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्कॉलर व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणजे त्यांच्या कामाची ही एकप्रकारची पोचपावतीच आहे.
भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी स्कॉलर येतात. मात्र, त्यांना हवे असलेले संदर्भ मिळाल्यानंतर ते निघून जातात. आपले संशोधन सादर करतात. अधिक खोलात जात नाहीत. गेल ऑम्वेट मात्र वास्तवाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या संशोधक दृष्टी आणि सामाजिक भान त्यांना तपशीलात डोकावायला भाग पाडते. त्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थिती ज्या श्रेणीबद्ध समाजव्यवस्थेवर उभी राहिलेली आहे. त्या व्यवस्थेचे आकलन करताना त्यांनी केलेल्या मांडणीवर चिकीत्सात्मक पद्धतीने विविधांगांनी चर्चा करण्यात आली. मतभेद मान्य करून आताच्या परिस्थितीत त्याचे विश्लेषण कसे करावे, किंवा त्या वेळी समाजव्यवस्थेचे विश्लेषण करताना कोणत्या परिस्थितीत करण्यात आले याचा विचार करून आता काही प्रमाणात त्यात बदल केला पाहिजे, अशीही मांडणी अनेकांनी केली. माणूस ज्या सांस्कृतिक, सामाजिक वातावरणात वाढतो, त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा त्याच्यावर निश्चितपणे परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचे भवताल काय होते, हे देखील पाहणे महत्त्वाचे असते.
गेल ऑम्वेट यांचा जन्म अमेरिकेतला. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्या भारतात आल्या. संशोधनासाठी भारतात आल्यावर इथल्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यास त्यांनी केला. हे करतानाच कष्टकऱ्यांच्या चळवळींचा त्या कधी भाग बनून गेल्या, हे त्यांनाही समजले नसेल. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे, यासाठी लढणाऱ्या माणसांच्या चळवळींचा वैचारिक पाया भक्कम करण्यास मदत करतात. त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहतात. केवळ ज्ञानच नव्हे, तर सारे आयुष्य राबणाऱ्या कष्टकरी माणसांच्या चळवळीसाठी समर्पित करतात. चळवळींमध्ये काम करतानाच समाजाचे आकलन करून घेताना भारतीय समाज हा जातिव्यवस्थेच्या पायावर उभा आहे. माणूस कोणत्या जातीत जन्माला आला त्यावरून त्याची जात ठरते, त्याने कोणते काम करायचे हे तो ज्या जातीत जन्माला आला त्यावरून ठरते. या भयंकर वास्तवाने त्या अंतर्मुख होत गेल्या. त्याचप्रमाणे भारतीय समाजात केवळ वर्गीय आणि लैंगिक शोषण होते असे नाही तर इथे जातीय शोषणही होते हे त्यांनी अधोरेखीत केले. याबाबत त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमांतून ठामपणे मांडले आहे. भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार त्यांनी मांडला आहे. विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली. भारतात सुरु असलेल्या परिवर्तनाच्या चळवळीने भारावून गेलेल्या गेल यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न घेऊन कष्टकरी जनतेच्या लढ्यात झोकून देऊन, झपाटून काम करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत विवाह केला. स्वत:ची नोकरी, लेखन, संशोधन सांभाळत त्यांनी संसाराची धुराही चांगल्या पद्धतीने पेलली. महाराष्ट्रात आता श्रमिक मुक्ती दलाचे जे कार्य उभे राहिलेले दिसते. त्यात डॉ. गेल यांचा मोलाचा वाटा आहे.
एकीकडे चळवळीचे लढे सुरु असतानाच कार्यकर्त्यांचे काम, शोषणावर आधारित व्यवस्था जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. भारतातील नवी सामाजिक चळवळ, दलित आणि लोकशाही क्रांती, जातीविरोधी चळवळ आणि भारतीय संस्कृती- दलित दृष्टीकोन, ब्राम्हण्यवाद आणि जातीवाद विरुद्ध बुद्धवाद, भारतीय स्त्रियांचा संघर्ष यासह तुकोबांची गाणी अशी विविध ग्रंथसंपदा त्यांनी लिहिली आहे. महात्मा फुले यांचे स्त्रीवादी योगदान त्यांनीच पुढे आणले आहे. समाजशास्त्राबरोबर साहित्य कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य सभा असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळ या चळवळींची भूमिका विकसित करण्यात डॉ. गेल यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. इतकेच नव्हे, तर बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्यासोबतचा त्यांचा स्नेह सर्वपरिचित आहे.
विद्यापीठाने पुढाकार घेऊन त्यांच्या योगदानाची दखल घेतली. हा महत्त्वपूर्ण उपक्रम केवळ पुरस्कारापुरता मर्यादीत न ठेवता, त्यांच्या साहित्याचा आणि योगदानाची वैचारिक चिकीत्सा घडवून आणली. यात प्रामुख्याने संत परंपरा आणि इतिहासाचे आकलन, धर्म आणि क्रांती-प्रतिक्रांतीचा विचार, चळवळीचा सिद्धांत, जात, वर्ग, लिंगभाव विषयक विचार, मार्क्स, फुले आंबेडकरी विचार, गेल यांच्या विचारांची समर्पकता आणि मर्यादा, तुलनात्मक अभ्यास याबद्दल ऊहापोह करण्यात आला. यात सम्यक पद्धतीने सर्वांनीच वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष व्यवहार तसेच आजची उपयोगिता यावर मंथन करण्यात आले. आजची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती ज्या एका टप्प्यावर आलेली आहे, तिथे मागे वळून पाहताना आजही जाती, धर्माच्या राजकारणात सामान्य माणसांच्या वाट्याला शोषणावर आधारित विषमता पाहायला मिळते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याची लढाई आजही लढावीच लागत आहे. विकासाच्या मूळ प्रवाहापासून आजही दलित, आदिवासी, कष्टकरी बहुजन समाज कोसोदूर असताना २१ व्या शतकातील पिढीसमोर आपण कोणता आदर्श ठेवणार आहोत, असा प्रश्न आहे. समताधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जे लोक आजही रस्त्यावरची चळवळ करीत आहेत, शोषित, श्रमिक जनतेला लढण्याचे बळ देत आहेत, अशा माणसांना ताकद देण्याची गरज आहे. मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारपरंपरांच्या खांद्यावर उभे राहून सम्यक दृष्टीने शोषणमुक्त, मानवतावादी समाजाचे स्वप्न घेऊन हे उलगुलान गावोगावी क्रांतीची मशाल बनून पोचवावे. आताची तरुण पिढी हे काम नेटाने करेल, असा आशावाद डॉ. गेल ऑम्वेट आजही मोठ्या विश्वासानं मांडताना खंबीरपणे लढणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरच्या आंदोलना सहभागी होतात.
स्त्री दास्याचा तुरुंग फोडिते!
परदेशी संस्कृती आणि जीवनपद्धती अंगवळणी पडलेली असली तरी परित्यक्ता स्त्रियांचा लढा उभारताना क्रांतिविरांगणा इंदूताई पाटणकर यांच्यासोबत त्यांनी गाव न् गाव पिंजून काढले आहे. मराठमोळ्या माणसाची मराठी भाषा त्यांनी अवगत केली. इंदूताईंना चळवळीची गाणी मुखोद्गत होती. स्त्री मुक्ती चळवळीची बांधणी सुरू असताना इंदूताई जिथे जातील, तिथे बायांना चळवळीची गाणी म्हणायला सांगत. स्वत: हाताच्या मुठी आवळून ताई ‘युगायुगाची गुलामी चाल, सांभाळीत चूल न् मूल, दास्याचा तुरुंग फोडिते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडिते’ असं गाणं म्हणायच्या तेव्हा गेल त्यांच्याबरोबरीने त्यात ताल धरायच्या. पुढे ‘वुई शाल स्मॅश द प्रीझन’ नावाचं पुस्तकचं गेल यांनी लिहिलेले आहे. राबणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या मेळाव्यात भाषण करताना गेल मराठीत बोलायच्या तेव्हा समोरची जनता आवाक व्हायची. आजही गेल समोरचा समूदाय कोण आहे, त्यानुसार आपल्या भाषणाची भाषा निवडतात.