कोडग्या व्यवस्थेने घेतला गंगाभक्ताचा बळी!
By रवी टाले | Published: October 12, 2018 12:42 PM2018-10-12T12:42:18+5:302018-10-12T12:52:51+5:30
गंगा संरक्षणासाठी कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करताना, एका तपस्व्याचे अन्नपाण्यावाचून निधन व्हावे, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते?
गंगा नदीच्या संरक्षणाचा ध्यास घेतलेले पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल उपाख्य स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांनी अखेर गंगेसाठीच आपल्या जीवाची आहुती दिली. किंबहुना आपल्या देशातील कोडग्या व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला, असे म्हटले तर ते जास्त संयुक्तिक होईल. ‘मुझे मॉं गंगा ने बुलाया है’, असे सांगत गंगा तीरावरील वाराणसी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना, गंगा संरक्षणासाठी कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करताना, एका तपस्व्याचे अन्नपाण्यावाचून निधन व्हावे, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते?
प्रा. जी. डी. अग्रवाल हे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात सन्यस्त जीवन जगले असले तरी ते इतर सन्याशांसारखे नव्हते. ते उच्च विद्या विभूषित होते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे ते सेवानिवृत्त प्राध्यापक होते. त्याशिवाय त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य पदही भुषविले होते. भगिरथाने गंगा नदीला पृथ्वीतलावर आणले, अशी हिंदू धर्माची मान्यता आहे. प्रा. जी. डी. अग्रवाल स्वत:ला भगिरथाचा वंशज संबोधत असत. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य ते केवळ गंगेसाठीच जगले. गंगा नदीच्या पात्रात होत असलेले अवैध उत्खणन रोखावे, मोठ्या धरणांची निर्मिती करू नये आणि गंगा स्वच्छ व शुद्ध करून तिचा प्रवाह अविरत राखावा, यासाठी ते आग्रही होते. त्यासाठीच गंगेच्या संरक्षणासाठी कायदा पारित करण्याची ते मागणी करीत होते. त्या मागणीच्या पूर्ततेसाठी ते गत ११२ दिवसांपासून आमरण उपोषण करीत होते. मंगळवारपासून त्यांनी पाण्याचाही त्याग केला होता. त्यामुळे प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले होते; मात्र अखेर त्यांचे निधन झाले. गंगेच्या संरक्षणाच्या मुद्यावरच २०११ मध्ये स्वामी निगमानंद यांनीही ११५ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर प्राण त्यागले होते.
भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गंगा पुनरुज्जीवन हा मोठा मुद्दा बनवला होता. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमध्ये त्या पक्षाला त्याचा मोठा लाभही मिळाला; मात्र पुढील लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यावरही गंगेच्या स्थितीत तीळमात्रही फरक पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच प्रा. जी. डी. अग्रवाल प्रक्षुब्ध झाले होते. सरकारने नेहमीप्रमाणे त्यांना आश्वासने देऊन उपोषण समाप्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र यापूर्वीच्या उपोषणाच्या वेळी मिळालेल्या आश्वासनांचा अनुभव गाठीशी असल्याने यावेळी ते नमले नाहीत. त्यांनी २०१० मध्ये गंगेसाठी उपोषण केले होते तेव्हा अनेक धरणांचे काम थांबविण्यात आले होते; मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर थांबवलेल्या प्रकल्पांचे काम पुन्हा सुरू करण्यात आले होते. शेवटी कोडग्या व्यवस्थेने त्यांचा बळी घेऊनच समाधान मानले.
गंगा शुद्धीकरणासाठी सरकारी पातळीवर जे काही सुरू होते त्याबाबत प्रा. जी. डी. अग्रवाल कधीच संतुष्ट नव्हते. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये हाती घेतलेल्या ‘गंगा अॅक्शन प्लॅन’सारखीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘मिशन क्लीन गंगा-२०२०’ योजनेचीही गत होईल, दोन्ही योजनांमध्ये कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याशिवाय काहीही साध्य झाले नाही, असे त्यांचे ठाम मत होते. गंगा शुद्धीकरण मोहिमांसंदर्भात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न बोचणारे होते. ‘गंगा अॅक्शन प्लॅन’च्या अपयशासाठी एकाही अधिकाऱ्याला वा अभियंत्याला जबाबदार का धरण्यात आले नाही, या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. ते केवळ सरकारवरच शरसंधान करीत नव्हते, तर सर्वसामान्य लोकांवरही ताशेरे ओढत होते. सर्वसामान्य जनतेलाही गंगेच्या अवस्थेसाठी जबाबदार धरत होते. भगवा वस्त्रधारी सन्याशी असूनही, गंगेच्या पात्रात पूजा सामग्री सोडण्यासाठी ते सर्वसामान्यांवर टीका करीत असत.
प्रा. जी. डी. अग्रवाल सेवानिवृत्तीनंतर अगदी सुखासीन आयुष्य घालवू शकले असते; मात्र त्यांना गंगा शुद्धीच्या ध्येयाने झपाटले होते. दुर्दैवाने अशा ध्येयवेड्या लोकांना व्यवस्थेतील लोक वेड्यात काढतात. त्यांची दखल घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्यातूनच प्रा. जी. डी. अग्रवाल यांच्या मृत्यूसारख्या दुर्दैवी घटना घडतात. एक ८६ वर्षांचा वृद्ध तपस्वी तब्बल ११२ दिवसांपासून उपोषण करीत असूनही, त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न शासन व प्रशासनास करावा वाटत नाही, याला व्यवस्थेचा कोडगेपणा व निर्ढावलेपणा नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? व्यवस्थेकडून सर्वप्रथम अपेक्षा असते ती संवेदनशीलतेची! राज्यकर्त्यांच्याच संवेदना बोथट झाल्या तर अपेक्षा तरी कुणाकडून करायची? आता तरी शासन व प्रशासनाने जागे व्हावे आणि प्रा. जी. डी. अग्रवाल यांच्या स्वप्नातील गंगा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com