असे झाले ‘संविधान चौक’ नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 08:07 PM2018-11-26T20:07:08+5:302018-11-26T20:19:21+5:30
नागपूर ही क्रांतीभूमी. माणसाला माणूसपण बहाल करणारी प्रवर्तनभूमी. खंगलेल्यांना जगण्याचे शक्तिशाली आयुध देणारी ऊर्जाभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याच्या तेजोमय कार्याने प्रकाशित झालेली धम्मभूमी. हजारो वर्षाच्या पाशवी गुलामीच्या शृंखला तोडणारी दीक्षाभूमी. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर या नागांच्या भूमीत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीत ‘संविधान चौक’ असे नाव लिहिलेला स्तंभ दिमाखात उभा आहे. भारतातील हे पहिले व एकमेव (बहुतेक) असे संविधान चौक. पूर्वीचा ‘आरबीआय चौक’ पुढे ‘संविधान चौक’ झाला. ही घटना ऐतिहासिक व सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने एक आठवणींचा उजाळा.
प्रा. महेंद्रकुमार मेश्राम
नागपूर ही क्रांतीभूमी. माणसाला माणूसपण बहाल करणारी प्रवर्तनभूमी. खंगलेल्यांना जगण्याचे शक्तिशाली आयुध देणारी ऊर्जाभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याच्या तेजोमय कार्याने प्रकाशित झालेली धम्मभूमी. हजारो वर्षाच्या पाशवी गुलामीच्या शृंखला तोडणारी दीक्षाभूमी. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर या नागांच्या भूमीत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीत ‘संविधान चौक’ असे नाव लिहिलेला स्तंभ दिमाखात उभा आहे. भारतातील हे पहिले व एकमेव (बहुतेक) असे संविधान चौक. पूर्वीचा ‘आरबीआय चौक’ पुढे ‘संविधान चौक’ झाला. ही घटना ऐतिहासिक व सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने एक आठवणींचा उजाळा.
नागपूरचा आरबीआय चौक हे शहराचे मध्यवर्ती ‘झिरो’ माईलचे ठिकाण. रिझर्व्ह बँक, विधानभवन व मॉरिस कॉलेज (वसंतराव नाईक समाज विज्ञान संस्था) या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण शीर्ष संस्थांसह भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा असलेले हे ठिकाण. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वंचितांचा आवाज, पीडितांचा आक्रोश, संघर्षाचा निर्धार, सत्याग्रहाची विविध आयुधे आणि क्रांतीचा एल्गार म्हणजे हे ठिकाण. महामानवाला अभिवादन करून येथे न्यायासाठीचे हुंकार भरले जातात. गल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्याचे हे स्थान म्हणजे शोषित, वंचित, पीडित, गरीब आणि अतिसामान्य माणसांचे हक्काचे ठिकाण.
बाबासाहेबांच्या याच पावन कर्मभूमीत सन २००५ मध्ये देशात पहिल्यांदाच संविधानाचा जागर सुरू झाला. आंबेडकरी विचार आपल्या अंत:करणात कोरून वंचितांच्या न्यायासाठी सदैव धडपडणाऱ्या ‘इ. झेड. खोब्रागडे’ या सनदी अधिकाऱ्याने नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शाळा-शाळांमधून सामूहिक वाचन हा ‘संविधान ओळख’ उपक्रम सुरू केला आणि याच आरबीआय चौकातून २६ नोव्हेंबर २००५ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने देशातली पहिली व अभूतपूर्व ‘संविधान रॅली’ काढली. शेकडो लोकांच्या उपस्थितीत आणि साक्षीने संविधान दिवस साजरा केला. पुढे, प्रशासनातील विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी हा संविधानाचा जागर लोकचळवळीत परिवर्तीत करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांच्या अविरत प्रयत्नामुळेच महाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबर २००८ रोजी शासन निर्णय निर्गमित करून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून घोषित केला.
देशाच्या समृद्धी व संपन्नतेसाठी, राष्ट्राच्या एकता व एकात्मतेसाठी, सामाजिक स्वातंत्र्यासाठी, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायासाठी बंधुत्वाचे, समतेचे ‘संविधान’ घरा-घरात आणि मना-मनांत पोहचविण्यासाठी इ. झेड. खोब्रागडे निरंतर प्रयत्नशील होते. सन २०११ मध्ये २६ नोव्हेंबरला संविधानदिनी संविधान रॅलीचे वेळी या चौकाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांनी ‘आरबीआय चौकाचे संविधान चौक’ असे नामकरण करण्यात यावे असे सुचविले. यावेळी इ. झेड. खोब्रागडे, डॉ. नितीन राऊत, भदन्त विमलकीर्ती गुणसीरी, भदन्त सदानंदजी यांचेसह अनेक मान्यवर साहित्यिक, विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. इ. मो. नारनवरे यांची सूचना महत्त्वाची व सुसंगत होती. उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
इ. झेड. खोब्रागडेंनी तसा प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेला दिला. महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला. महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. इ. झेड. खोब्रागडेंनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना भेटून विषय प्रभावीपणे मांडला. त्यावेळी निवृत्त पोलीस अधीक्षक टी.बी. देवतळे, शिवदास वासे, व्ही.व्ही. मेश्राम, राजरतन कुंभारे, पी. आर. पुडके, डॉ. प्रदीप आगलावे, अनिल हिरेखण, विलास सुटे व मी सोबत होतो. गडकरींनी आश्वासन दिले. महापौरांनी आश्वासन दिले. महानगरपालिकेकडून संविधान चौकाचा ठराव होणार असल्याचे संकेत मिळाले. लॉर्ड बुद्धा टी.व्ही. चॅनलने ‘प्रस्तावित संविधान चौक’ याच विषयावर लाईव्ह चर्चा घडवून आणली. त्यावेळी, रवी शेंडे या आंबेडकरी कार्यकर्त्याने ‘संविधान चौक’ नावाचा स्तंभ व संविधानाची प्रास्ताविका लावण्याची जबाबदारी स्वीकारली. पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरुच होता. मात्र, महानगरपालिकेच्या सभेत तसा प्रस्ताव आणला जात नव्हता. सत्ताधाऱ्यांच्या मनाला-बुद्धीला कदाचित ते पटत नसावे. मध्यंतरी चौकाला-मार्गाला वेगवेगळ्या नेत्यांची नावे देण्याबाबतच्या चर्चेला ऊत येऊ लागला. ही चर्चा इ. झेड. खोब्रागडेंना अस्वस्थ करीत होती. पाठपुरावा कायम सुरुच होता. पण अपेक्षित ठराव महानगरपालिका घेत नव्हती.
‘मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणात रिपब्लिकन्सची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर २२ नोव्हेंबर २०१२ ला इ. झेड. खोब्रागडेंनी बानाईच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित केली. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या कार्यकर्त्यांसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी तेथे उपस्थित होती. मी कार्यशाळेचा संयोजक होतो. इ. झेड. खोब्रागडे यांनी सादरीकरण केले. बजेट, शिष्यवृत्ती, विकासाच्या योजनांचे वास्तव मांडले. विविध प्रश्नांवर खुली चर्चा होत असताना इ. झेड. खोब्रागडे यांनी संविधान चौकाचा प्रश्न चर्चेसाठी आणत ‘महानगरपालिका ठराव घेत नाहीये. संविधान दिवस येत आहे. तेव्हा, आपणच संविधान चौकाचा स्तंभ उभारावा’ असा प्रस्ताव ठेवला. काहींनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. आम्ही एकमेकांना सूचक इशारा करीत चर्चा तेथेच थांबवली. कार्यशाळा संपल्यानंतर इ.झेड. खोब्रागडे, पी.एस. खोब्रागडे, शिवदास वासे व मी, आम्ही निवडक कार्यकर्त्यांसह आरबीआय चौकात गेलो. आम्ही ‘संविधान चौक’ नाव लिहिलेले स्तंभ उभारण्यासाठी जागेची निश्चिती केली. २५ नोव्हेंबरच्या रात्री स्तंभ उभारण्याचे ठरले. ‘पोलिसांनी अडवले व कुणाच्या सांगण्यावरून करताय अशी विचारणा केली तर माझे नाव सांगायचे’ असे इ. झेड. खोब्रागडेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांना हिंमत आली. मनोबल वाढले. उत्साह संचारला. २५ नोव्हेंबरच्या रात्री , रातोरात स्तंभ उभारले गेले. रवी शेंडे, राजन वाघमारे, नरेश वाहने, बाळू घरडे व त्यांचे मित्र-कार्यकर्ते या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी हे घडवून आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी, २६ नोव्हेंबर २०१२ रोजी ‘संविधान दिन’ कार्यक्रमात महापौर, उपमहापौर यांचे उपस्थितीत इ. झेड. खोब्रागडे यांनीच आरबीआय चौकाचे संविधान चौक असे नामकरण झाल्याची घोषणा केली. इ. झेड. खोब्रागडे यांच्या निरंतर व अथक प्रयत्नांमुळे आणि वरील आंबेडकरी कार्यकर्त्यांमुळेच ‘संविधान चौक’ लिहिलेला स्तंभ आज डौलात उभा दिसतो आहे. महानगरपालिकेने नंतर ठराव करुन २०१३ मध्ये रितसर समारंभपूर्वक ‘संविधान चौक’ असे नाव दिले.
संविधान चौक आता सर्व परिवर्तनवाद्यांच्या आंदोलनाचे, चळवळीचे केंद्रस्थान झाले आहे. येथूनच सामाजिक चळवळींचा एल्गार केला जातो. संविधान चौक आता बाबासाहेबांना अभिप्रेत सामाजिक परिवर्तनासाठी लढावयाच्या युद्धाची आयुध निर्माणी झाले आहे. संविधान चौकातील विविध प्रश्नांच्या संदर्भात संविधान फाऊंडेशनचे शिष्टमंडळ महापौर नंदा जिचकार यांना भेटले होते. महापौरांच्या अध्यक्षतेखाली व संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत १) संविधान चौकात भारतीय राजमुद्रा-अशोक स्तंभासह मराठी, हिंदी व इंग्रजी, तिन्ही भाषेत संविधान प्रास्ताविकेचे स्तंभ उभारण्यात यावे. २) दि. २५ व २६ नोव्हेंबरला रोषणाई करण्यात यावी. ३) संविधानदिनी स्टेजची व्यवस्था असावी. स्टेज विनामूल्य देण्यात यावे. ४) शुध्द पिण्याचे पाणी व स्वच्छ स्वच्छतागृहाची सोय असावी, इत्यादी संविधान फाऊंडेशनच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र, मागील वर्षी केलेली रोषणाई वगळता इतर बाबी पूर्ण केल्या नाहीत. महानगरपालिकेने आश्वासन पाळावे. संविधानावरील निष्ठा दाखवण्याची ही संधी आहे. ठरल्याप्रमाणे संविधान स्तंभ उभारावे. म्हणजे ज्याप्रमाणे, संविधानाचा जागर करणारे, संविधान चौक असलेले नागपूर हे भारतातील पहिले शहर ठरले त्याप्रमाणेच भारतीय राजमुद्रा-अशोक स्तंभासह तिन्ही भाषेत संविधान प्रास्ताविका स्तंभ असलेले नागपूर हे भारतातील पहिले शहर ठरेल व त्याचा महानगरपालिकेला आणि समस्त नागपूरकरांना अभिमान वाटेल.
संविधान फाऊंडेशन, नागपूर