बाबासाहेबांच्या नजरेतील भारत.....
By Namdeo Kumbhar | Published: April 14, 2018 09:56 AM2018-04-14T09:56:22+5:302018-04-14T09:56:22+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे. तरीही हा छोटासा प्रयत्न करतो आहे.
शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे. तरीही हा छोटासा प्रयत्न करतो आहे.
शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असे आपल्या समाजबांधवांना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णांच्या जुलमांविरुद्ध उगारलेली वज्रमूठच. आंबेडकर म्हणजे जातिभेदावर,विषमतेवर, धर्ममार्तंडांच्या वर्चस्वावर, समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमत्त त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न.
बाबासाहेबांचं कार्य, कर्तृत्व खूप मोठं. ते शब्दात मांडता येणं थोडं कठीणच आहे. पण तसा छोटासा प्रयत्न करतो आहे. या लेखाशी सर्वजण सहमत असतील असेही नाही, पण यामधून कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही.
बाबासाहेब यांनी भारतासाठी खूप काही केलं. त्यांना भारतीय लोकांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण त्या आपल्यातील काही समाजकंटकांमुळे आणि राजकाराणातील कलहामुळे अपुऱ्या राहिल्या. आज भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. बाबासाहेबांनी पाहिलेला भारत आपण सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करुयात. त्यांच्या 127व्या जयंतीचं औचित्य साधून मी भारतातील सर्व नागरिकांना ही विनंती करतो आहे.
आज समाजात असे काही लोक आहेत जे महापुरुषांच्या विचारांचा वापर स्वार्थासाठी करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण मोठी होती, पण भलतेच मुद्दे पुढे आणले जात आहेत. जुन्या प्रश्नांच्या भांडवलावर नवे प्रश्न निर्माण केले जात आहेत. जातीय तेढ वाढविण्याचा घाट घातला जातोय. मतांच्या लालसेपायी जातीचं राजकारण केलं जातंय.
बाबासाहेबांना समाजात बदल हवा होता पण तो असा नाही? प्रत्येकांनी याचा थोडा विचार करावा. आंबेडकर देशातील सर्वात मोठे धर्मपुरुष होते. त्यांनी लिहिलेल्या बौद्ध व त्यांचा धम्म हा भारतीय तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. आपण तो अभ्यासायला हवा. बाबासाहेबांच्या विविध पैलू, ध्येयापैकी काही खाली नमूद करतो आहे.
बाबासाहेबांचे शैक्षणिक ध्येय : - समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी . समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे. १९४६ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले .
बाबासाहेबांचे सामाजिक ध्येय : - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते . जातिभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे , असे ते मानत . ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही , असे ते समजत. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळ व मोर्चे काढण्यास सुरुवात केली . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय मिळवून दिला. १९४२ साली नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दूर राहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा, अंधश्रद्धा नष्ट करा.
बाबासाहेबांचे राजकीय ध्येय : - राजकारण हे वर्गीय जाणिवेवरच उभे असायला हवे. वर्गीय जाणिवेशिवाय केले जाणारे राजकारण ही भोंदूगिरी आहे." मात्र भारतीय समाजात केवळ संपत्ती हीच सत्तेचा एकमेव स्त्रोत होऊ शकत नाही. तिच्याबरोबरच धर्म आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचाही विचार करायला हवा.
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या . १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक,राजकीय, कायदेशीर दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. इ . स . १९२० च्या दशकात आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले . जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले.
दलितांसाठी त्यांनी नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला. मागासवर्गीयांनी काँग्रेस आणि ब्रिटीश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले . त्यांनी मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली .
बाबासाहेबांचे धार्मिक ध्येय : - आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती. आंबेडकर कितीही बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठांचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभुतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो . ज्या धर्मात स्वतंत्र्य , समता , बंधुता नाही त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही , म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता . म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि 'साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन' अशी गगनभेदी भीमगर्जना त्यांनी केली होती. त्यांची ही राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न त्यांचे काही अनुयायी करत आहेत.
डॉ . आंबेडकर म्हणजे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्त्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांच्याकडून आपण जेवढं शिकू ते कमीच आहे. अशा या महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय . डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.
बाबासाहेब आज असते तर त्यांनी आजच्या समस्यांवर काय तोडगा काढला असता याचा अंदाज करता येतो. कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देताना त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणांबद्दल आणि परराष्ट्र धोरणांबद्दल प्रश्न उपस्थित केले होते आणि चीन व काश्मीरबाबतची पाकिस्थानची डोकेदुखी हे पुढच्या काळातील फार तापदायक समस्या असतील असे भाकीत केले होते. ते पुढे किती अचूक ठरले ते आपण पाहिले आहे.