Karnataka Floor Test : भाजपाच्या सत्तेचे गाढवही गेले आणि नैतिकतेचे ब्रह्मचर्यही!
By तुळशीदास भोईटे | Published: May 19, 2018 05:39 PM2018-05-19T17:39:15+5:302018-05-19T17:39:15+5:30
कर्नाटकातील सत्ता नाटकाने भाजपाचे चांगलेच नुकसान केले. सत्तेचे गाढव तर गेलेच पण भाजपाने जपलेले नैतिकतेचे ब्रह्मचर्यही गेले. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या महासंग्रामात पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकूनही भाजपा हरली, तर हरूनही काँग्रेस मात्र आज तरी जिंकली!
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी चार वाजता बहुमत सिद्ध करण्याआधीच ते भाषण करण्यास उभे राहिले तेव्हाच त्यांची देहबोली बरेच काही सांगू लागली होती. लक्षात येऊ लागले होते की अडीच दिवसांपूर्वी भलत्याच उत्साहात असलेले येडियुरप्पा आतून खचलेले आहेत. बेल्लारीच्या रेड्डीबंधूपासून अगदी दिल्लीच्या नेत्यांपर्यंत साऱ्यांनीच वाट्टेल ते प्रयत्न करुनही भाजपचे संख्याबळ १०४च्या पुढे काही जाऊ शकले नाही. काँग्रेसने कधी नाही ती नैतिकतेची भूमिका घेत लढाई लढली. रेड्डीबंधूंच्या, एवढेच नव्हे तर येडियुरप्पांच्या कथित संभाषणांच्या सहा ऑडिओ रेकॉर्डिंग सादर केल्या. त्यातून भाजपा सत्ता टिकवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात असल्याचे चित्र उभे राहिले. त्यातूनच मिशन २०१९च्या तयारीत असलेल्या भाजपाच्या प्रतिमेला राष्ट्रीय पातळीवर फटका बसण्याची भीती निर्माण झाली. त्यातूनच मग अखेर सर्व मार्ग बंद झाल्याने शपथविधीनंतर तिसऱ्याच दिवशी येडियुरप्पांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीचा नवा विक्रम त्यांनी घडवला. ते अडीच दिवसाचे मुख्यमंत्री ठरले!
खरंतर सकाळी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारच्या हवाल्याने बहुमत चाचणीचे दूरचित्रवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्याचे सांगण्यात आले तेव्हाच कर्नाटकातले चित्र बदलले असल्याचे स्पष्ट होऊ लागले होते. एखादा सत्ताधारी पक्ष जेव्हा बहुमत नसतानाही बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचे सांगतो तेव्हा त्यांचा उद्देश लक्षात येऊ लागतो. जर जोड-तोड करुन समीकरण जुळवता येत असते तर ऐनवेळी काही अडथळे आले तर होणारा घाणेरडा गोंधळ, राज्याप्रमाणेच हंगामी अध्यक्षांमुळे सभागृहातील सत्ता हाती असल्याने वेगळे काही करावे लागले तर ते लोकांसमोर जाणे कोणत्याही सत्ताधारी पक्षाला परवडणारे नसते. भाजपालाही नाहीच नाही. त्यामुळे न्यायालयाने सांगण्यापूर्वीच ते थेट प्रक्षेपणाला तयार झाले, तेव्हा त्यांच्या कडवट समर्थकांच्याही मनात शंकेची पालच नाही तर भीतीची सुसर फिसकारली असणार. झालेही तसेच.
काँग्रेसचे इन मीन तीनही नाही तर फक्त दोन आमदार भाजपाने वळवले होते तेही काहीसेच. कारण, ते भाजपासाठी आमदारकी नक्की पणाला लावतील, तेही सध्याच्या परिस्थितीत हे कुणालाच खात्रीनं सांगता आलं नसतं. अगदी येडियुरप्पा किंवा भाजपाच्या ऑपरेशन लोटस पार्ट-२चे समन्वयक असणाऱ्या रेड्डीबंधूंनाही. घडलेही तसेच. दुपारपर्यंत ते दोन आमदार बंगळुरूच्या विधानसौंधात अवतरले. तेही काँग्रेसच्या गोटातच. त्यामुळे भाजपाकडे संख्याबळ जमलेले नाही हे स्पष्टच होऊ लागले होते. त्यातच काँग्रेसने एक नाही तर सहा ऑडिओ रेकॉर्डिंग उघड करत भाजपाची नैतिकता उघडी पाडण्यास सुरुवात केली होती.
निवडणूक लढवताना जेवढी काँग्रेस चतुराईने वागली नसेल तेवढी गेले अडीच दिवस भाजपाची सत्ता घालवण्यासाठी वागत होती. सुरुवात तिसऱ्या क्रमांकावरील जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन झाली. त्यामुळे निकालाच्या दिवशीच भाजपाच्या जल्लोष थंडावू लागला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई. तेथे शनिवारी ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश हा सर्वात मोठा विजय ठरला. येडियुरप्पांनी एक आठवडा मागितल्यावर राज्यपाल वजुभाई वालांनी एकावर एक फ्रीची दोन आठवडे मुदत दिल्याने मस्त नियोजनबद्ध जमवा-जमव करण्याचे भाजपाचे बेतच फिसकटले. कमी कालमर्यादेतील जमवाजमवीच्या घाईत फोनवरच सेटिंगचा धोका पत्करावा लागला. ऑडिओ पुरावे तयार झाले. आजवर सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा, कोणत्याही अनैतिकतेला नैतिकच मानणारा अशी प्रतिमा असणाऱ्या काँग्रसला त्यामुळे नैतिक भूमिका घेता आली.
राजीनामा घोषीत करण्यापूर्वी विधानसभेत केलेल्या येडियुरप्पांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण झाले. त्या भाषणात त्यांनी अनेक भावनेला हात घालणारे मुद्दे मांडले. त्यांना मानणाऱ्या लिंगायत समाजाच्या, अन्य भाजपाप्रेमी मतदारांच्या काळजाला त्या भाषणातील कातर स्वराने हातही घातला असेल. पण एकंदरीतच त्यांनी कितीही काही म्हटले. तुम्ही ११३ जागा दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती असे सांगून मतदारांनी चूक केली असे सांगण्याचा प्रयत्न करुन पुढच्या निवडणुकीसाठी पेरणीचा प्रयत्नही केला. मात्र अखेर झाले ते झालेच. गेले ते गेलेच. त्यातही सत्तेचे गाढव तर गेलेच पण भाजपाने जपलेले नैतिकतेचे ब्रह्मचर्यही गेले. नव्हे नैतिकतेचे ते सोवळे टराटरा फाडले गेले. तेही आणखी कुणाकडून नाही तर स्वत:कडूनच. त्यामुळे आजवर ज्या काँग्रेसला आजवर अनैतिक ठरवले त्या काँग्रेसच्या अध्यक्षांना राहुल गांधींना भाजपावरच तो अनैतिकतेचा आरोप करता आला. तसेच जास्त जागा असूनही दोन पावले मागे येणारी काँग्रेस, भाजपा समान शत्रू असणाऱ्या प्रादेशिक पक्षांना जास्त स्वीकारार्ह असेल. थोडक्यात भाजपच्या मिशन २०१९साठी हाही एक मोठा फटकाच ठरु शकेल. कर्नाटकातील सत्तेच्या महासंग्रामात पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकूनही भाजप हरली, तर हरूनही काँग्रेस मात्र आजतरी जिंकली!
आज तरी यासाठी कारण तिसऱ्या क्रमांकावरील जनता दल (धर्मनिरपेक्ष)शी भाजपाला रोखण्यासाठी थाटलेला संसार तसा सोपा नाही. स्वत:च्या पक्षाच्या आमदारांना सतत संतुष्ठ राखणेही अवघडच. किमान २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी काँग्रेसला जनता दलासोबत ही कसरत करतच राहावी लागणार आहे. नाहीतर कर्नाटकात हरूनही मिळालेला विजय अल्पजीवीच ठरु शकेल.