Kathua Case: हिंदूंची बदनामी करणारे पाकड्यांचे कठुआतील 'खरे' साथीदार
By तुळशीदास भोईटे | Published: April 17, 2018 09:26 PM2018-04-17T21:26:20+5:302018-04-17T21:26:20+5:30
कठुआतील चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार झाले. निर्घृण हत्याही. संतापाचा वणवा भडकलाय. मात्र काही या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन संभ्रम निर्माण करण्याचा विखारी डाव खेळतायत.
पुन्हा एकदा देश पेटून उठतोय. दिल्लीच्या निर्भयाच्यावेळी पेटला होता तसाच. फरक एकच आहे. निर्भयाला न्यायासाठी पेटून उठून समाजाला चेतवणाऱ्यांपैकी काही आता भलतीच आग भडकवू पाहत आहेत. ही आग लेकींना न्याय मिळवून देऊन नराधमांना अद्दल घडवण्यासाठी नाही, तर धर्माच्या नावाने संभ्रम निर्माण करुन नराधमांचं पाप झाकण्याचा निर्लज्जपणा करणारी आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मेणबत्ती मोर्चांनंतर का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या अत्याचारांबद्दल मन की बात उघड केली. वाटलं होतं, किमान त्यानंतर तरी निर्लज्जपणे कठुआ प्रकरणाला धार्मिक रंग देऊ पाहणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर येईल. मात्र तसं घडताना दिसत नाही. उलट आता अधिकृत नसले तरी छुपेपणाने विषारी फुत्कार सुरुच आहेत. जहर पसरवलं, भिनवलं जातंय. निर्भयाच्यावेळी जो परमप्रिय तिरंगा अत्याचार करणाऱ्या नराधमांविरोधातील देशाच्या एकजुटीचं प्रतिक म्हणून फडकवला जात होता त्याच तिरंग्याची अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाईविरोधात वापरुन विटंबना करण्यात आलीय. सारं काही डोक्यात जाणारं.
हे सारं घडत बिघडत असताना, वाटलं होतं. पंतप्रधान पेटून उठतील. युतीतील मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना तात्काळ नराधमांच्या मुसक्या आवळून अद्दल घडवण्याचे आदेश देतील. पण तसं काही झालं नाही. ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर ज्या मौनासाठी कठोर आघीत करायचे त्यांचीच आठवण यावी तसे मौनात राहिले. नंतर ते बोलले. संवेदना जागे असलेल्या माणसासारखंच बोलले. मात्र त्यांना एका मोठ्या घातापाती वर्गानं गंभीरतेनं घेतलेलं दिसलं नाही. उलट एक सत्ताधारी असल्याचा निर्लज्ज माजच त्यांच्या नावावर निवडून गेलेल्या काहींनी दाखवला होता. ज्यांच्यावर बलात्काराचा, अमानुष अत्याचार करुन हत्येचा आरोप त्यांच्याच समर्थनार्थ मोर्चे. त्यात पुन्हा सहभाग सत्तेत बसलेल्या भाजपा नेत्यांचा. सारंच डोक्यात तिडिक जावी असंच.
कठुआच्या प्रकरणात धार्मिक रंग देऊन संभ्रम निर्माण करण्याचा निर्लज्ज प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्याबद्दल प्रथम. काय तर म्हणे हा पाकिस्तानचा कट आहे. हिंदूंना, त्यांच्या मंदिराला या पापात गुंतवून काश्मीरमध्ये असंतोष माजवण्याचा, हिंदूंना बदनाम करण्याचा कट आहे. असेलही तसं. मानलं पाकिस्तानचा कट आहे. त्यांना हिंदूंना बदनाम करायचं आहे. पण त्यात नवं काय? पाकड्यांची ती घातकी वृत्ती असतेच असते. असणारच. पण मग तुम्ही त्यांना पुरक का वागलात? होय, पुरक! जबाबदारीनंच लिहितोय. भावनावेगात किंवा वैचारिक अंधद्वेषातून नाही.
प्रथम, आजवर जे टीव्हीच्या पडद्यावर जाहीर सांगण्यात संकोच केला नाही ते पुन्हा लिहितो. होय, मी हिंदू आहे, हिंदू असण्याची काडीचीही लाज नाही, उगाच भंपकपणा करावं असं मला वाटत नाही. मात्र त्याचवेळी माझ्या धर्माचा राजकारणासाठी गैरवापर करुन कुणी बदनाम करु पाहत असेल तर ते खपवूनही घेऊ शकत नाही. काश्मीरात कठुआत तेच घडलंय.
जर कठुआची लेक गायब होताच भाजपा नेत्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली असती तर कदाचित ती वाचली असती. केवळ एक लेक वाचली नसती तर ते ज्या हिंदू धर्माच्या बदनामीचं कारस्थान म्हणतात ते रचण्याची संधी ते ज्यांच्याकडे बोट दाखवतात त्या पाकड्यांना मिळाली नसती. चला कदाचित तेव्हा नसेल लक्षात आलं. होऊ शकतं तसं. त्यानंतर कठुआच्या लेकीचा मृतदेह सापडल्यानंतर तरी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी काही केलं? तसं केलं असतं तर नंतर जे नराधम जनप्रक्षोभ उसळल्यानंतर गजाआड गेले त्यांच्या मुसक्या आधीच आवळल्या गेल्या असत्या. समजा वादाकरता गृहित धरलं की ते तसे नाहीत तर पुढे कायदेशीर प्रक्रियेत सिद्ध झालं असतं ना. अत्याचारी नराधमांच्याविरोधाऐवजी ज्यांच्यावरआरोप त्यांच्यासाठीच गळे काढून घातपातच केला गेला.
10 जानेवारीला जेव्हा अवघ्या आठ वर्षांची चिमुरडी गायब झाली तेव्हा भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प बसले. तिच्या तपासाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले म्हणून संताप होऊ लागला तेव्हाही ते कुठच्यातरी बिळात लपून बसले होते. त्यानंतर 17 जानेवारीला जेव्हा त्या चिमुरडीचा अत्याचारानं लचके तोडलेला आणि दगडानं डोकं ठेचलेला मृतदेह सापडला तेव्हाही कुठे होते हे नेते? जर भाजपाच्या सत्तेतील या नेत्यांनी वेळीच या अमानुष अत्याचाराचा मुद्दा हाती घेतला असता तर पाकड्यांना असंतोष भडकवण्याची संधीच कशी मिळाली असती? त्यामुळेच उलट जर सांगितलं जातंय तसं भारताविरोधात, हिंदूंविरोधात असंतोष भडकवण्याचा पाकड्यांचा काही कट असला तर ते हे नेते त्या कटासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी पूरकच वागले आहेत. जर इतर कुणी असं वागलं असतं तर याच नेत्यांनी तसं वागणाऱ्यांना पाकड्यांचं हस्तक ठरवलं असतं. खरंतर भाजपापेक्षा मोठी जबाबदारी जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही होती. मात्र भाजपाच्या नेत्यांच्या चाळ्यांमुळे त्यांनाही राजकारणाची संधी मिळाली.
कठुआबद्दल लिहिताना कोपर्डीची आठवण होणे स्वाभाविकच. नगरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यावेळी फोनवर दिलेली माहिती अशीच डोक्यात संतापाचा लाव्हा उसळावा अशीच होती. सुरुवातीच्या काळात झाले तसे दुर्लक्ष झाले नसते तर राज्यभर असंतोषाचा वणवा भडकला नसता.
मात्र, कोपर्डी ते कठुआ...लेकींसाठी भय काही संपताना दिसत नाही. आणि सत्तेत बसलेल्यांपैकी अनेक बिनडोकांचा निर्लज्जपणाही. भाजपातील संमजस नेत्यांनी अशांना वेळीच आवरावे.
जाता जाता सध्या सुरु असलेल्या छुप्या अपप्रचारातील एका व्हिडिओ क्लिपचा उल्लेख आवश्यकच. क्लिपमध्ये एका मौलानाला धार्मिक स्थळात जाऊन एक बुरख्यातील महिला काठीनं बडवताना दिसतेय. लैंगिक अत्याचाराचंच प्रकरण. क्लिपसोबत एकदम कडक प्रश्न. त्यातूनच छुपा अजेंडा उघड होतो. "मंदिरात काही घडलं तर प्रतिक्रिया व्यक्त करणारे आता या मौलानाबद्दल मात्र गप्प बसणार का?"
कुणीच गप्प बसणार नाही. अत्याचार करणारं कुणीही असो हा देश त्यांना नराधमच मानतो. मग तो दशग्रंथी रावण असो वा गावच्या लेकीवर अत्याचार करणारा रांझ्याचा पाटील. एकाला प्रभू रामानं संपवलं. तर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा चौरंग केला तो आपल्या शिवछत्रपतींनी! परंपरा आहे ती अशी. पाप करणाऱ्याकडे पाहून पापाची शिक्षा देणं या मातीतील माणसांच्या स्वभावातच नाही. त्यामुळे मौलाना असो की महंत...पाप केलं की बडवणारंच!
त्या क्लिपमधील बुरखेधारी महिला मौलानाला जसं बडवते ते काहीच नाही. पुन्हा जर अत्याचारी नराधमांच्या समर्थनार्थ कुणी प्राणप्रिय तिरंगा हाती घेऊन त्याच्या विटंबनेचा प्रयत्न केला तर सामान्य भारतीय तिरंगा सन्मानानं उंच फडकवतील आणि त्याच काठ्यांनी अशा निर्लज्जांना बडवतील. वळ असे उमटतील की जन्मभर अत्याचारी नराधमांच्या समर्थनासाठी मूठ आवळण्याची हिंमत आणि ताकतही उरणार नाही. मग देशाची आणि धर्माचीही बदनामी करणं दूरच राहिलं!