बाप्पाने घुसळण करायची बुद्धी द्यावी, सर्वसामान्यांनाही आवडेल असं लिहू-बोलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 03:11 AM2017-08-28T03:11:52+5:302017-08-28T03:12:59+5:30
बाप्पा ये! नाचत ये, नाचवत ये, सगळ्यांचे दुरित दूर करण्याचे बघ बाबा! आता असं म्हणून थोडीच मनं सावरणार, परिस्थिती सुधारणार! पण आपण आशा आणि अपेक्षा करायची.
किशोर पाठक
बाप्पा ये! नाचत ये, नाचवत ये, सगळ्यांचे दुरित दूर करण्याचे बघ बाबा! आता असं म्हणून थोडीच मनं सावरणार, परिस्थिती सुधारणार! पण आपण आशा आणि अपेक्षा करायची. सगळे इको फ्रेंडली गणपती बसवतात. पर्यावरणाचे संतुलन सांभाळा म्हणतात. प्रदूषण टाळा, आवाज मर्यादेत ठेवा म्हणतात. अगदी पोलीस कमिशनरपासून सगळे आवाहन करतात. मोठमोठ्या घोषणा करतात. चांगले सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेसे वाटतात. पण कार्यक्रम म्हणजे आॅर्केस्ट्रा, गीतमंच, गाणी बजावणी थोडक्यात धांडगधिंगा! हो, तोच हवा लोकांना मनमुक्त, असे म्हणणारे आहेतच! पण बंद करा हा भयभीत आवाज, उन्मादनृत्य, अचकट-विचकट गाणी, आपण लोकगीतांच्या आडोशाला काय देत आहोत त्याचा विचार करणार आहोत का? पूर्वी व्याख्यानं असायची हे लिहिताना दु:ख तर होतेच, पण नवे सारे चांगले आणि पूर्वीचे वाईट हे उघड म्हणणाºयांसाठी आज माणसांना खरोखरीच उत्कृष्ट वक्तृत्व, विचारचिंतन नकोय? की केवळ टाइमपास म्हणून प्रचंड रोषणाईत गुदमरलेला गणपती, कर्णकर्कश स्वरांनी कानबंद पडलेली जनता. गाणी तर सर्वांना आवडतातच. पण त्यातही गणपतीला विविध चालीवर, तालावर नाचवताहेत ते प्रयोग म्हणून ठीक, पण ते प्रयोग स्वागतार्ह हवेत. एकीकडे नवी पिढी लेखन, वक्तृत्व, संगीतात वेगळं काहीतरी भरीव देऊ पाहते आहे, मग असा प्रयोग पन्नास तरुणांनी एकत्र येऊन का करू नये. नाही होणार फार गर्दी. सुरुवातीला पन्नासच माणसं असतील. नंतर हे ऐकायलाच हवं ही भावना लोकांमध्ये बळावेल. शंभर होतील असं का ठरवीत नाही आपण? पूर्वी आतासारखी तांत्रिक प्रगती नव्हती; पण आठ आणे, एक रुपया ते पाच रुपये तिकिटे लावून भाषणे-व्याख्यानमाला व्हायच्या. आपण ठरवून हा प्रयोग का करू नये. लोक येत नाहीत हे सगळे ठरतात, पण असं म्हणणाºयांना त्या वाद्यांचा कलकलाटही नको असतो. मग ती माणसे या शांत विचारमंथनाला नक्की येतील. हा विचार भाबडा, अप्रागतिक वाटेलही. जग कुठे चाललं आणि हे व्याख्यानात अडकले. जग कुठेच जात नाही, आपण नेऊ तिकडे जाते जग. हे पक्क ठरवलं तर माणसांना आपण एकत्र आणू शकतो. फक्त एका गटाची व्याख्यानं व्हायला नकोत. मग त्यांचीच चार डोकी. असे हजार विषय आहेत ज्यावर घुसळण होऊ शकते. चांगले विषय माणसांना हसवतील, रडवतील, चांगला श्रवणानंद देऊ शकतील. फक्त आपलीही तयारी असायला हवी. चांगलं ऐकण्याची आणि ऐकवण्याची. बाप्पाने ही घुसळण करायची बुद्धी द्यावी. सर्वसामान्यांनाही आवडेल असं आपण लिहू-बोलू शकतो. मग बाप्पा निदान हा वैचारिक घुसळणीचा विचार पक्का व्हायला हवा! बाप्पा जय हो!