तत्पर ‘आधार’, रुग्ण निराधार
By गजानन दिवाण | Published: October 3, 2017 11:06 AM2017-10-03T11:06:03+5:302017-10-03T11:09:02+5:30
बेटी धन की पेटी, असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील या बेटीने तर जन्मानंतर अवघ्या सहाव्या मिनिटाला तिथल्या महिला शासकीय रुग्णालयाला आणि त्यातील डॉक्टरांनाही आकाश ठेंगणे करून टाकले. येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी मुलगी जन्मत:च अवघ्या सहाव्या मिनिटाला तिचे आधार काढले. आधी हा विक्रम मध्यप्रदेशातील झाबुवा या गावच्या नावे होता.
बेटी धन की पेटी, असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील या बेटीने तर जन्मानंतर अवघ्या सहाव्या मिनिटाला तिथल्या महिला शासकीय रुग्णालयाला आणि त्यातील डॉक्टरांनाही आकाश ठेंगणे करून टाकले. येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी मुलगी जन्मत:च अवघ्या सहाव्या मिनिटाला तिचे आधार काढले. आधी हा विक्रम मध्यप्रदेशातील झाबुवा या गावच्या नावे होता. तिथल्या एका मुलीच्या जन्मानंतर २२ व्या दिवशी तिचे आधार कार्ड काढले होते. पाल्याचे शाळेत नाव टाकण्यापासून ते पासपोर्ट मिळविण्यापर्यंत आणि गॅस सिलिंडर भरून आणण्यापासून ते शासकीय योजनेतील सवलत घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डची सक्ती केल्याने हे असे होणारच. केंद्राची आणि तीही मोदी सरकारची योजना म्हटल्यानंतर शासकीय कर्मचाºयांची अशी तत्परता असणारच. या तत्परतेला आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. उलट ती दाखविणारे रुग्णालय आणि तेथील डॉक्टर-कर्मचारी मोठ्या कौतुकाचे धनी आहेत. म्हणूनच उद्या या रुग्णालयाला वा तेथील एखाद्या डॉक्टरला केंद्राचा मोठा पुरस्कार मिळाला तर नवल वाटायला नको. मूळ आक्षेप आहे तो शासकीय कर्मचाºयांच्या दररोजच्या कामातील तत्परतेचा. त्यातही शासकीय रुग्णालये आणि तेथील कर्मचाºयांच्या कार्यपद्धतीचा. योगायोग पाहा, उस्मानाबादकरांनी हा विक्रम केला त्याच्या दुसºयाच दिवशी हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एका महिलेची प्रसूती झाली. साफसफाईच्या नावाखाली या रुग्णालयाचे मुख्यद्वार बंद ठेवले होते. या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाºयांकडे दरवाजा उघडण्याची बरीच विनवणी केली. कोणालाच पाझर फुटला नाही. रुग्णालयाच्या दारातच तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नशीब त्या महिलेचे आणि बाळाचेही म्हणून दोघे सुखरूप राहिले. एका पोलिसाने शल्यचिकित्सकाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर बाळ-बाळंतिणीला रुग्णालयात घेण्यात आले. हे असे एकट्या हिंगोलीतच घडते असे नाही. मराठवाड्याचाच विचार केला तर अनेक शासकीय रुग्णालयांत हे असे घडतच असते. तेच इथे घडले. आधार कार्ड काढताना उस्मानाबादकरांनी दाखविलेली तत्परता हिंगोलीतील वैद्यकीय कर्मचा-यांना दाखवता आली नाही. उपचार दूरच, पोटकळांनी विव्हळणाºया महिलेला रुग्णालयात घ्यावेसे त्यांना वाटले नाही. वैद्यकीय कर्मचा-यांची तत्परता इथे आवश्यक असते. सर्वसामान्यांना शासकीय रुग्णालयांचा तोच तर खरा ‘आधार’ असतो; पण कर्मचा-यांची तत्परता नसेल तर तो निराधार ठरतो.