मनाचिये गुंथी - माणसाचे सहा शत्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:28 AM2017-08-12T00:28:56+5:302017-08-12T00:29:13+5:30
बाह्य शत्रू हल्ला करून सारं उद्ध्वस्त करून टाकतात. माणसाचे मोठे शत्रू कोण? शत्रूंचे प्रकार कोणते? एकंदर शत्रू प्रकरण त्रासदायक आणि तापदायक! माणसाचे मोठे शत्रू सहा! हे ‘षड्रिपू’ बलवान असतात. छुपे हल्ले करण्यात हे तरबेज! मद, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर हे अंतर्गत असणारे प्रबल शत्रू! एकाचा बंदोबस्त केला तरी दुसरा हजर!
- कौमुदी गोडबोले
बाह्य शत्रू हल्ला करून सारं उद्ध्वस्त करून टाकतात. माणसाचे मोठे शत्रू कोण? शत्रूंचे प्रकार कोणते? एकंदर शत्रू प्रकरण त्रासदायक आणि तापदायक! माणसाचे मोठे शत्रू सहा! हे ‘षड्रिपू’ बलवान असतात. छुपे हल्ले करण्यात हे तरबेज! मद, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर हे अंतर्गत असणारे प्रबल शत्रू! एकाचा बंदोबस्त केला तरी दुसरा हजर! दुर्जनांमध्ये एकी चटकन होऊन टिकतेदेखील! सज्जनांची, त्यामध्ये विद्वानांची एकी कठीण! षड्रिपू एकत्र येतात आणि माणसाला माणुसकीपासून दूर नेतात.
‘काम’ म्हणजे न संपणाºया इच्छांचा साठा! सातत्यानं कामना निर्माण होत राहतात. दुसरा ‘काम’ म्हणजे मदनाचा-कामिनीचा! विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या कामरुपी मेनकेनं भंग केली. कामाची, वासनांची पूर्ती झाली नाही की क्रोध उफाळून वर येतो. कामामधून लोभाची निर्मिती! मानवता, माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये करण्यास धजावणारे कामपिपासू! क्रोध हा देखील माणसाला पशू बनवतो. रक्ताच्या नात्यांचा गळा घोटणारा क्रोध भयंकर! यामुळे विचारशक्ती खुंटते. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठेचा ‘लोभ’ अनावर होऊन अनाचार घडतो. सत्तेबरोबर संपत्ती व शारीरिक बळ असेल तर मद फोफावतो. मस्तवालपणा माजतो. मत्सराच्या अग्नीमध्ये शांती जळून भस्म होते. मोह केव्हा, कधी, कुणाला, कशाचा होईल सांगता येत नाही. एक पत्नी, एक वाणी, एक वचनी प्रभू श्रीरामाला सीतेमुळे कांचनमृगाचा ‘मोह’ झाला. कांचनमृगाला मारण्यासाठी श्रीराम गेले आणि पुढचे रामायण घडले.
लौकिक, व्यावहारिक, भौतिक जीवनात शांती, समाधानाला सुरुंग लावणारे हे षड्रिपू! यांच्या गुप्त कारवायांना ऊत आणणारं वातावरण सध्या आहे. कलीयुगात कली यांना जवळ करतो आणि वाईट कृत्य घडवून आणतो. मग मानवाचा दानव व्हायला किती वेळ लागणार? माणसाला नकळतपणानं नको ती कृत्ये करण्यास प्रवृत्त करणारे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ या षड्रिपूंच्या कारवाया थोपवून, संपवून टाकायच्या कशा? उपासनेशिवाय दुसरा प्रभावी अन्य उपाय नाही. सर्वांविषयी सावधपण, सजगपण यांना जवळ ठेवायचं. संतांच्या संगतीमध्ये फार मोठी ताकद आहे. परमार्थाच्या प्राप्तीसाठी हे अंतर्गत असणारे शत्रू घातक कारवाया करणारे आहेत. पारमार्थिक प्रगतीला बाधक ठरणारे! सतत खाली खेचणारे असतात. संत, महंत, भगवंत हे या विकारांना काबूत ठेवण्यास साहाय्य करतात. अक्षय आनंद, शांती, समाधान प्राप्त होण्यासाठी या सहा विकारांना निर्धारानं ठेचून काढावं लागतं. सद्गुरुंची कृपा प्राप्त झाली की या षड्रिपूंना तोंड काळं करण्याशिवाय अन्य मार्ग उरत नाही, एवढं मात्र नक्की.