मनाचिये गुंथी - गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:25 AM2017-08-10T00:25:26+5:302017-08-10T00:26:20+5:30
गाव किंवा ग्राम हा भारतीय लोकजीवनाचा आत्मा आहे. वाडी, वस्ती, पडळ, माळ, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर अशा विविध ठिकाणी माणसाने निवासाला सुरुवात केली आणि मानवी जीवनाला एक प्रकारची स्थिरता लाभली. भारतात आजही सात लाखांहून अधिक खेडी आहेत.
- डॉ. रामचंद्र देखणे
गाव किंवा ग्राम हा भारतीय लोकजीवनाचा आत्मा आहे. वाडी, वस्ती, पडळ, माळ, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर अशा विविध ठिकाणी माणसाने निवासाला सुरुवात केली आणि मानवी जीवनाला एक प्रकारची स्थिरता लाभली. भारतात आजही सात लाखांहून अधिक खेडी आहेत. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तत्त्वांशी अनुबंध साधून स्वत:चे अस्तित्व टिकवून आहेत. प्रत्येक गावाला एक वेगळी परंपरा आणि संस्कृतीचा एखादा वारसा लाभला आहे. भारतात तर नवपाषाण युगापासून म्हणजे अंदाजे सनपूर्व ८००० वर्षांपासून गावे अस्तित्वात असल्याचे संदर्भ आहेत. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण आहे.
अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, शेती, उद्योग, कला, कारागिरी, उत्सव, सण, देवालये या सर्वांतून ग्रामजीवनाचा आनंद घेत, गावे समर्थपणे उभी आहेत. गावच्या चारी बाजूला जी जमीन असे तिचे ‘सीत्या, गोचर व ऊषर’ असे भाग केलेले असत. सीत्या जमिनीत धान्य पेरीत. गोचर जमिनीत पशु चारीत तर ऊषर जमीन नापीक असल्याने तेथे सरपण, इंधन, गवत या गोष्टी उपलब्ध होत असत. जमिनीचे हे प्रयोजन कधी बदलत नसे. त्यावर इतरांचे आक्रमण होत नसे. आज शासनाचे नियम आणि नियंत्रण असतानाही अनेक गावातील गायराने गायब झाल्याचे आपण पाहतो. सार्वजनिक सुविधांसाठी राखून ठेवलेल्या ‘मुºहाळा’सारख्या जागा कुणीतरी अनाधिकाराने बळकावलेल्या आपण पाहतो.
वेदकाळापासून गावचे नियंत्रण आणि अर्थकारण गावातच होते. ‘मानसाद’ या ग्रंथात ग्रामाचा वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्यात गावाचे दंडकग्राम, सर्वतोभद्र ग्राम, नद्यावर्त ग्राम, पद्मक ग्राम, स्वस्तिक ग्राम, प्रक्तर ग्राम, कार्मुक ग्राम आणि चतुर्मुख ग्राम असे आठ प्रकार पाडले होते.
क्षेत्राने आणि वस्तीने जरी ते लहान असले तरी त्यात नांदणारी संस्कृती, लोकाचार, सहजीवन यातून ते खूप उत्तुुंग असायचे. वेदामध्येही गावांचा ठायी ठायी उल्लेख आहे. त्यात ग्रामस्थांनी गावासाठी देवाजवळ प्रार्थना केली आहे.
‘‘विश्वं पृष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम्।’’ आमच्या गावात निरोगी, परिपुष्ट विश्वाचे दर्शन घडावे. ‘अनातुरम्’ म्हणजे कोणी रोगी असू नये. विश्वात जो आनंद आहे, भव्यता, उदारता, व्यापकता आहे ती आमच्या गावात यावी. आमचे गाव विश्वाचे प्रतिनिधी व्हावे, अशी वैदिक ऋषी प्रार्थना करीत. ग्रामजीवनात विश्वधर्माचा अर्थ सामावला होता. ग्राम हे लहानसे विश्व आहे. ग्रामधर्माचे पालन हेच विश्वधर्माचे पालन होते. गावचं विश्वरुप व्हावे आणि त्यासाठी स्वग्रामधर्म पाळला जावा या भूमिकेतून उभी राहिलेली ग्रामसंकल्पना आणि आजचे बदललेले गाव पाहता दोहोतील अंतर कसे कमी होणार हाच खरा प्रश्न आहे.