मनाचिये गुंथी - शब्द फेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:25 AM2017-08-07T00:25:35+5:302017-08-07T00:26:56+5:30
एक दु:खद बातमी. दिल्ली विद्यापीठातून मराठी हद्दपार. आपण वाचली. हळहळलो. मराठी भाषेचा प्रचंड अभिमान असलेले मनातल्या मनात खवळले. मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन करणारे प्राध्यापक चुकचुकले. त्यांनी आपापसात बातमी शेअर केली. चक्क लाईक केली. आपण जबाबदारी समोरच्या माणसावर टाकण्यात पटाईत आहोत.
- किशोर पाठक
एक दु:खद बातमी. दिल्ली विद्यापीठातून मराठी हद्दपार. आपण वाचली. हळहळलो. मराठी भाषेचा प्रचंड अभिमान असलेले मनातल्या मनात खवळले. मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन करणारे प्राध्यापक चुकचुकले. त्यांनी आपापसात बातमी शेअर केली. चक्क लाईक केली. आपण जबाबदारी समोरच्या माणसावर टाकण्यात पटाईत आहोत. मग दिल्लीतले मराठी खासदार, नंतर मराठी मुख्यमंत्री, विधानसभा आणि परिषदेतील मराठीचा कळवळा असणारे आमदार, मंत्री, मराठी भाषिक सारे, एक निषेध करून थांबलो का? की अजून काही केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा असता तर हे घडले नसते कदाचित असे म्हणतात. म्हणजे पुन्हा प्रश्न दिल्लीच्याच कोर्टात. इकडे अजून एक वाङ्मय जगविण्याचा प्रयत्न. प्रत्येक महाविद्यालयात वाङ्मय मंडळ असावंच, म्हणजे तरुणांची गोडी वाढेल. हे छान. वरतून मराठीची गळचेपी आणि खालून तिचा पुरस्कार. मधले सगळे निरामय, निश्चिंत. मराठी वाचविणे आणि वाढविणे आपले काम हे आपण सातत्याने म्हटलं पाहिजे. पण या अधिकाºयांना कुणी सांगायचं. आपण एकाच वेळी माफक शूर आणि पुळचटही असतो. म्हणजे मुंबईत मराठी पाटी पाहिजे म्हणून मोर्चा काढणार आणि पदोपदी हिंदी किंवा इंग्रजीच बोलणार. नुकतीच टिळक पुण्यतिथी झाली. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ म्हणताना त्यांनी देशाची, परिस्थितीची जाणीव लोकमान्यांनी करून दिली. एकीकडे पुस्तक कमी वाचली जाताहेत ही ओरड करायची आणि वारेमाप पुस्तकं बाजारात आणायची. एकीकडे ग्रांथिक व्यवहार वाढवायचे आणि दुसरी भाषिक गळचेपी. ही पिढी पुस्तकं कमी वाचते ओरडायचं आणि ई-बुक वाढवायची. तिचे माणसापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे. तरुण ते जास्त वाचतात. नवीन पुस्तक बाजारात येताना ते प्रथम ई-बुक होते का पाहिले जाते. ही स्वागतार्हता भाषावृद्धीसाठी कठोरपणे का राबविली जात नाही. मराठी खेड्यांपुरती राहिली तर मग खेडी कुठे आहेत? जागतिकीकरणात सर्वच गोष्टी झपाट्याने बदलत असताना मराठीनेही बदलावे, इतर भाषांचा वापर करून त्यांच्यासह जनमानसात मुसंडी मारावी, ती लोकाभिमुख व्हावी हे आपण नेटाने कधी म्हणणार? एखादी बाब वारंवार बोलली पाहिजे तर तिच्या संतत आघाताने मराठीद्रोह फाटेल, तुटेल, नष्ट होईल. पण पहिला दगड कुणी उचलायचा? दगड फेकतीलही पण आपल्याला मराठी शब्द फेकायचाच जनतेच्या अंगावर, त्याचा टणत्कार व्हायला हवा. विधानसभा, परिषदा, सामाजिक संस्था, इंग्रजी माध्यम शाळांना लाडावून ठेवलेले शिक्षणतज्ज्ञ, गळचेपीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे समाजधुरीण! उठा! जागे व्हा! पहिला शब्द फेकायला सज्ज!