मनाचिये गुंथी - कुलूप आणि किल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:12 AM2017-08-11T00:12:25+5:302017-08-11T00:12:38+5:30
कधीतरी असा प्रसंग येतो की, आपल्याला कुलूप उघडायचे असते. हातात किल्ल्यांचा जुडगा असतो. आपण एकेक किल्ली लावून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा असे होते की, शेवटच्या किल्लीने ते उघडते. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. गोष्ट अतिशय छोटी आहे. पण आपल्याला ती काही सांगू पाहत आहे.
- प्रल्हाद जाधव
कधीतरी असा प्रसंग येतो की, आपल्याला कुलूप उघडायचे असते. हातात किल्ल्यांचा जुडगा असतो. आपण एकेक किल्ली लावून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा असे होते की, शेवटच्या किल्लीने ते उघडते. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. गोष्ट अतिशय छोटी आहे. पण आपल्याला ती काही सांगू पाहत आहे.
प्रयत्नांती परमेश्वर अशी एक म्हण आहे. परमेश्वर म्हणजे यश असे आपण समजू. ते प्रयत्नांच्या शेवटी मिळणार हा सर्वांचा अनुभव. म्हणजे त्यासाठी प्रयत्न करणे आलेच. प्रयत्नांचे महत्त्वही त्यामुळे लक्षात येते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले तर ते कुणाला नको आहे? पण सहसा असे होत नाही. कधी झालेच तर ते लॉटरी लागण्यासारखे असते. आपल्याला आजवर किती वेळा लॉटरी लागली हा प्रश्न, वाचकांनी स्वत:ला विचारून पहावा. एकदाही नाही असे त्याचे उत्तर येईल. एखाद्याला लागलीच कधी, तरी ती पुन्हा पुन्हा लागणे अशक्य हे कठोर वास्तवही लक्षात घेणे आवश्यक.
एकदा लॉटरी लागली की असा माणूस पुन:पुन्हा त्या सोप्या आणि बिनकष्टाच्या मार्गाला लागू पाहतो. लॉटरीचे व्यसन लागले तर असा माणूस कंगाल आणि निष्क्रिय होऊन जातो. जगण्याचे आणखी सोपे मार्ग शोधू लागतो. त्यातून त्याच्या अडचणी वाढत जातात. त्याच्या जगण्याची शोकांतिका होते. पहिल्या किल्लीने कुलूप उघडले नाही तर दुसरी लावून पाहिली पाहिजे, हा यशप्राप्तीचा अगदी साधा सोपा नियम, पण त्याचे पालन न केल्याने माणसाचे आयुष्य बरबाद होण्याची वेळ येते. अशी कितीतरी अपयशी माणसे आपल्या आजूबाजूला पहायला मिळतात. त्यांच्या नादी न लागता आपण आपल्यासाठी थोडा दूरचा, कष्टाचा मार्ग निवडायला काय हरकत आहे?
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हे विसरून हाती घेतलेले काम निर्धाराने पूर्ण करू, असा विश्वास मनात हवा. कामात अडथळे येतीलच पण ते पार करण्याची तयारी आधीपासूनच असायला हवी. तशी जाणीव कायम मनात जागी हवी. जो स्वत:ला मदत करतो त्यालाच तो हरी मदत करणार आह.
तो हरी असतो अर्थातच प्रयत्नरूपी ! कुलूप हे आव्हानांचे तर किल्ली हे त्या आव्हानांना सामोरे जायला शिकवणारे प्रतीक आहे. पहिल्या किल्लीने कुलूप उघडले नाही म्हणून निराश होण्यात काहीच शहाणपण नाही. इतर किल्यांचा मग उपयोग तरी काय?