'ओरू आडार लव्ह'... प्रियाने उडवली भुवई अन् मोरूंना निषेधाची घाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 09:30 AM2018-02-17T09:30:31+5:302018-02-17T10:10:44+5:30

हिंदीतले ४० टक्के सिनेमे आजही दक्षिणी किंवा अन्य भाषक सिनेमांवर बेतलेले असतात. आपल्याला कुठे मूळ सिनेमांची नावं माहिती असतात? मग त्या सिनेमांमध्ये कोण कलावंत होते, त्यांनी किती जबरदस्त काम केलं, याच्याशीही आपला संबंध येण्याचं काही कारण नसतं.

Oru Adar Moru | 'ओरू आडार लव्ह'... प्रियाने उडवली भुवई अन् मोरूंना निषेधाची घाई!

'ओरू आडार लव्ह'... प्रियाने उडवली भुवई अन् मोरूंना निषेधाची घाई!

-मुकेश माचकर

‘ओरू आडार लव्ह’ या सिनेमाचा उर्वरित देशाशी थेट संबंध येण्याची शक्यता खरंतर फारच कमी होती...
...कारण, हा मल्याळी सिनेमा... टिपिकल टीनएज लव्हस्टोरी. ती केरळमध्ये अगदी हिट-सुपरहिट ठरली असती, तरी हिंदीत रिमेक होईपर्यंत आपला आणि तिचा काही वास्ता आला नसता. रिमेक झाल्यानंतरही तो फारसा आला नसताच. हिंदीतले ४० टक्के सिनेमे आजही दक्षिणी किंवा अन्य भाषक सिनेमांवर बेतलेले असतात. आपल्याला कुठे मूळ सिनेमांची नावं माहिती असतात? मग त्या सिनेमांमध्ये कोण कलावंत होते, त्यांनी किती जबरदस्त काम केलं, याच्याशीही आपला संबंध येण्याचं काही कारण नसतं.
पण, या सिनेमाच्या बाबतीत जरा आक्रितच घडलं. या सिनेमाचं नाव एका व्हिडिओ क्लिपमुळे केरळबाहेरच्या संपूर्ण देशाला कळलं. या क्लिपमुळे ‘गल्ली ते दिल्ली’ अशी सगळीकडे प्रकाशात आली ती या सिनेमाची एक नायिका प्रिया प्रकाश वरियर.
हे आक्रित क्रमांक दोन... कारण, ही काही ‘सैराट’सारखी एका जोडीची प्रेमकथा नाही. म्हणजे प्रिया ही काही सिनेमाची एकमेव नायिका नाही. सिनेमात कथा आहे पाच युवक आणि चार मुलींच्या प्रेमसाक्षात्काराची. त्यांच्यातली एक नायिका म्हणजे प्रिया. तिच्यावर सिनेमाचाही फोकस नाही आणि गाण्याचाही नाही. या गाण्यातली अवघ्या काही सेकंदांची जी क्लिप तिला देशप्रसिद्ध करून गेली, त्या गाण्यात ती तेवढाच वेळ आहे. 
आता या गाण्यात ती काय करते आणि कशामुळे लोकप्रिय झाली आहे, हे खरंतर सांगायची गरज नाही... ये तो देश का बच्चा बच्चा जानता है. पण, काही मोरू असू शकतात अजूनही कोरडे पाषाण. त्यांना द्यायलाच हवं हे ग्यान. ‘माणिक्य मलराय पूवी’ हे गाणं शाळेत सुरू असतं... एक वाद्यवृंद ते गाणं गात असताना शाळेत तिचा प्रियकर भुवई उंचावून तिला खट्याळपणे ‘काय मग, कसं काय’ असं नजरेनेच विचारतो. ती हे आव्हान स्वीकारून त्याला दोन्ही भुवया आळीपाळीने उंचावून दाखवते... मग तो आपल्या भुवया झटपट, लागोपाठ उंचावतो... यावर मात करण्यासाठी ती भुवयांच्या वक्रीकरणातूनच चक्क डोळा मारते... तिच्याकडून असं काही अपेक्षित नसल्याने प्रियकराची विकेट जाते... तिलाही खरंतर आपलं वर्तन अनपेक्षित असतं... तीही त्या मोकळ्या अभिव्यक्तीने कमालीची सुखावते... मिनिटभराच्याही नसलेल्या या क्लिपमध्ये प्रियाने मुक्त स्वच्छंद अभिव्यक्तीची कमाल केली आहे... 
या क्लिपमुळे प्रिया प्रकाश वरियर प्रसिद्धीच्या झोतात आली. ते गाणं लाखो लोकांनी पाहिलं आणि गाण्यामुळे ‘ओरू आडार लव्ह’ हा सिनेमा लोकांना माहिती झाला... या सिनेमाने अनेक मोरूंची अनेक प्रकारची पंचाईत करून ठेवण्याची आणि त्यांना असामान्य मोरू बनवण्याची ही सुरुवात होती...
या राष्ट्रीय पंचायतीचाच हा गुप्त अहवाल आहे... 
तर झालं असं... हे गाणं ऐन व्हॅलेंटाइन डेचा माहौल असताना रिलीझ झालं आणि राष्ट्रीय स्वयंघोषित संस्कृतिरक्षक गोगुंड संघटनांमध्ये खळबळ उडाली. एक देखणी, शाळकरी मुलगी शाळेच्या कार्यक्रमात शिस्तीने उभं राहण्याचं सोडून (समोर राष्ट्रगीत सुरू नसलं म्हणून काय झालं, शाळेत कोणतंही गाणं वाजत असताना ताठ उभंच राहिलं पाहिजे, असं देशाची शाळा करून ठेवलेल्या शिस्तभक्तांना वाटतं.) चक्क इकडे तिकडे पाहते आहे, एका मुलाशी नजरानजर करते आहे, त्याला डोळा मारते आहे, हे सगळं भारतीय संस्कृतीच्या विरोधात नाही का, असा सवाल आता देशभर विचारला गेला पाहिजे, त्यासाठी सर्व माध्यमांमध्ये सर्व प्रकारांनी या गाण्याचा निषेध केला गेला पाहिजे, हे कळल्यावर काही स्वयंसेवकांनी तर ‘आता हिंदीबरोबर प्रादेशिक सिनेमांच्या प्रसिद्धीचीही कामं घ्यायला लागलो का आपण, आनंद आहे, पण, पगार तरी वाढवा थोडा,’ अशी स्वत:शीच पुटपुट केली. मंडळी फेसबुक-व्हॉट्सअॅपसाठी निबंधांची आणि ट्विटरसाठी शिवीगाळीची डिक्टेशन घेत होती, तेवढ्यात कोणीतरी सांगितलं, पण, हा आधारसक्तीवरचा सिनेमा आहे. आधारबद्दल प्रेम व्यक्त करणारा सिनेमा आहे.
सगळे चमकले. डिक्टेशन थांबलं. सगळ्यांनी सिनेमाचं नाव पाहिलं. करेक्ट. ओरू आधार लव्ह! भाषा मल्याळी. घबाडच हाती आलं. हजारो स्वयंसेवकांनी प्राणांची आहुती देऊन (म्हणजे राजकीय खुनाखुनीत आपण इतरांना भोसकण्याआधी त्यांच्याकडून भोसकले जाऊन) केलेल्या संघर्षाला आता गोमटी फळं येतायत. केरळच्या भूमीत कम्युनिस्टांची गुंडगिरी झुगारून देऊन आधारची सक्ती कशी योग्य आहे, असं दाखवणारा सिनेमा येतो आहे, त्याची ही क्लिप सर्व स्वयंसेवकांमध्ये व्हायरल करा (जणू ते या आदेशासाठी थांबलेच होते, निम्म्यांची डोकी तर हे प्रवचन सुरू असतानाही मोबाइलवरच झुकलेली होती.) असे आदेश निघाले. ‘आग की तरह फैला दो’ म्हणून ही ज्वालाग्रही क्लिप सगळीकडे पोहोचली आणि मल्याळी स्वयंसेवकांनी इकडच्यांना फैलावर घेतलं. असलं काहीतरी ठरवण्याआधी आमच्याशी तरी बोलायला हवं होतं ना? ‘ओरु आडार लव्ह’चा आधार कार्डाशी तेवढाच संबंध आहे, जेवढा आपल्या संघटनेचा संस्कृतीशी आहे, असं त्यांनी सांगितल्यावर सगळ्यांचं धाबंच दणाणलं. ओरु आडार लव्ह म्हणजे असामान्य प्रेम, जगावेगळं प्रेम. ही एक टिपिकल टीनएज प्रेमकथा आहे, हे कळल्यावर भूमिका बदलायची वेळ आली.
मग कुणीतरी सांगितलं, हे पाहा, झालं ते बरंच झालं. असेही आपण व्हॅलंटाइन डेला जे राडे करतो, ते करण्यात आता आपल्याच पोरांना इंटरेस्ट नाही. एकतर आपल्या निरुद्योगी आणि हिंस्त्र मनोवृत्तीच्या पोरांना कोणतीही पोरगी जवळ करत नाही, त्याने फ्रस्ट्रेट होऊन ते निव्वळ असूयेने प्रेमीयुगुलांना मारहाण करतात, हे गुपित आता सगळ्या देशाला कळलं आहे. शिवाय पब्लिक आता इतकं वैतागलंय की यावेळी व्हॅलंटाइन डेला हुशाऱ्या केल्या तर पब्लिककडून आपल्यालाच मार पडण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण प्रेमाच्या सार्वजनिक आविष्काराच्या विरोधात असलो तरी प्रेमाला आपला विरोध नाही, असं दाखवून द्यायचा हा चांगला मार्ग आहे, त्याने झाकली मूठ सव्वा लाखाची राहील. शिवाय ती मुलगी हिंदू आहेच.
ही कल्पना संघटनेच्या धुरिणांच्या पसंतीला उतरते ना उतरते, तोच एक आगी लावण्यात पटाईत काका छद्मीपणे हसत म्हणाले, वा वा वा, असेही आपण दुटप्पीपणासाठी प्रसिद्ध होतो. आता तुम्ही त्यावर शिक्कामोर्तब करा. 
म्हणजे काय?
म्हणजे असं की आपले सर्वोच्च नेते दुसऱ्यांना हिंदुत्वाचे पाठ देत असताना आपल्या मुलामुलींची लग्नं म्लेंच्छ-यवनांशी लावून देत होतेच. आता आपण लव्ह जिहादला पाठिंबा देऊ या.
काका, हे फेसबुक नाही आणि समोर कोणी फुरोगामी, फेक्युलर नाहीत. त्यामुळे उगाच बाल की खाल काढून वळणावळणाने अंत पाहू नका. काय ते स्पष्ट बोला.
अहो, ती छबकडी हिंदू आहे, हे तुम्हाला कळलं. पण, ती कुणाकडे पाहून डोळे मोडतेय, त्याची चौकशी केली का? तमाम उदारमतवादी आईबापांप्रमाणे पदरात गोल टोपी जावई आल्यानंतरच जागे होणार आहात का? आपल्या त्या हिंदू भगिनीकडे (म्हणजे तुमची भगिनी हो) वाईट नजरेने पाहणारा, तिला आव्हान देणारा, फूस लावणारा तो पोरगा रोशन अब्दुल रहूफ नावाचा आहे... हा सरळ सरळ लव्ह जिहादला चिथावणी देण्याचा प्रकार आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक ओमार नावाचा मुस्लिम आहे, हे आश्चर्य नाही. या असल्या प्रकाराचं आपण समर्थन कसं करायचं?
पेट्या पोहोचोत ना पोहोचोत, या सिनेमाला खरोखरचा विरोध केलाच पाहिजे, अशा निष्कर्षावर सगळी संघटना पोहोचली आणि नव्याने डिक्टेशन सुरू झालं. सततच्या बदलांनी कातावलेल्या मंडळींना नीरव मोदीचा मॅटर सॉल्व्ह झाला की ओव्हरटाइम देऊ, असं आश्वासन दिलं गेलं. तेवढ्यात एकजण धावत पळत येऊन धापा टाकत ओरडला, थांबा, यावेळी आपण अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बाजू उचलून धरलीच पाहिजे.
सुबुद्धपणे बोलणाऱ्या कोणत्याही इसमाला पाहिल्यावर त्याला फटकावण्याची जी इच्छा स्वयंसेवकांमध्ये प्रबळ होते, तीच आताही बळावली होती, दोन मिनिटांत त्याचे कपड्यांची लक्तरं होतील, अशी परिस्थिती होती. तेवढ्यात तो म्हणाला, हे गाणं ‘त्यांच्या’ भावना दुखावणारं आहे.
अरेच्चा, आता ही काय भानगड आहे?
अहो, हे गाणं मलबारी मुसलमानांच्या पारंपरिक लोकसंगीतातलं गाणं आहे. मापिल्ला पाट्टू या नावाने ओळखलं जाणारं हे लोकसंगीत मल्याळी आणि अरबी, फारसी, ऊर्दू आणि तामिळ शब्दांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या मापिल्ला या तिकडच्या स्थानिक मुसलमानी बोलीतलं संगीत आहे. माणिक्य मलराय पूवी हे काही नवं गाणं नाही, हे त्या संगीतातलं लोकप्रिय गाणं आहे. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे, हे गाणं प्रेषित पैगंबर आणि त्यांची पत्नी आणि शिष्या खदिजा यांच्यातल्या प्रेमभावनेचं गाणं आहे. त्यात माणिक्य मलराय पूवी म्हणजे खदिजाचं वर्णनच मोत्यांच्या फुलासारखी स्त्री असं केलेलं आहे. ही खदिजा पैगंबरांना पाहताच त्यांच्या प्रेमात पडते, त्यांच्या काकांकडे पैगंबरांसाठी विवाहाचा प्रस्ताव पाठवते आणि गाण्याच्या शेवटी ती विवाहासाठी तयार होत असते...
अरे वा, भलताच स्फोटक प्रकार आहे हा!
तेच तर सांगतोय. आता प्रेषितांच्या प्रेमगीतात हे असले डोळे मारण्याचे छचोर धंदे ‘ते’ खपवून घेतील का? त्यांनी आताच बवाल सुरू केलाय. आता आपण अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बाजू घ्यायला नको का?
अरे, पण मग आपल्यालाही आपल्याकडच्या पद्मावतीवर न पाहताच आक्षेप घेण्याचं स्वातंत्र्य राहील का?
अरे देवा, भलतीच ही पंचाईत. काय करावं आता?
काही नाही. मिशीवाले काकांना सांगू. ते किंवा त्यांचे गोवेकर शिष्य काहीतरी निरर्थक वाद सुरू करून हे प्रकरण छोटं करून टाकतील आणि आपली सुटका होईल... हुश्श, आता जरा ते दुसरं गाणं पाठव. ती बोटांची पिस्तुल करून गोळी झाडते ते... गंमती गंमतीत का होईना, तिने म्लेंछवध केलाय, हे कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही रे!
तर असे हे ओरु आडार मोरू... म्हणजे मोरूत्वाला सीमाच नसलेले असामान्य मोरू!

Web Title: Oru Adar Moru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.